ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रिषभ पंत दोन वर्षापासून भारतीय संघासोबत नियमीतपणे असायचा. परंतु भारताच्या अंतिम अकरा जणांच्या संघात तो निवडला जाईलच याची कोणतीही शाश्वती नव्हती. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याच्या फलंदाजीत नसलेली एकाग्रता. फटके निवडण्यात होत असलेली चुक, अनेकदा डावाच्या सुरुवातीलाच किंवा जम बसतोय असे वाटत असतानाच बेजबाबदार फटके मारून बाद होणे, संघाच्या परिस्थितीनुसार न खेळणे. शिवाय तो ज्या मुख्य कामासाठी संघात होता ते यष्टीरक्षण व्यवस्थित न होणे, सोपे झेल सोडणे, यष्टीचितच्या संधी दवडणे, या सर्व बाबी त्याच्या विरोधात असल्या तरी संघ प्रबंधन त्याच्यातील गुणवत्ता जाणून असल्याने त्याला वारंवार संधी देत होते. सतत संधी देऊन कायम फेल होऊनही संघ प्रबंधन त्याची पाठराखण करत होते ते केवळ तो आज ना उद्या आपल्या खेळात सुधारणा करेल याच एकमेव आशेवर. रिषभ पंत हा असा एकमेव खेळाडू आहे की जो इतक्या वेळा फलंदाजी व यष्टीरक्षणात अपयशी होऊनही त्याला संघाबाहेर कधीच घालविले नाही. किंबहुना त्याच्या इतकी संधी भारतातल्या कुठल्याच खेळाडूला कधीच मिळाली नसेल.
१९ डिसेंबर २०२० रोजी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाविरूध्द अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावात सर्वबाद झाला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये फार मोठे बदल झाले. नियमीत कर्णधार कोहली बायकोच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतल्यानंतर हंगामी कर्णधार अजिंक्य राहणेने रिषभला विश्वासात घेऊन त्याच्यातील गुणवत्तेची जाणीव करून दिली व शेवटच्या तीनही कसोटयात त्याला अंतिम संघात खेळवण्याची हमी दिली. तसेच त्याला ठरल्या प्रमाणे संधी दिली. तत्पूर्वी त्याच दौऱ्यात ३ वनडे, ३ टि २० व पहिल्या कसोटी सामन्यात त्याचा दिल्लीवासी कर्णधार विराट कोहलीने त्याला एकाही सामन्यात न खेळवून त्याचा आत्मविश्वास ठेचला होता. परंतु अजिंक्य राहाणेने त्याला संधी दिली व त्याच्या कारकिर्दीलाच कलाटणी मिळाली.
ऑस्ट्रेलियात भारताने जिंकलेल्या मेलबोर्न कसोटीत त्याची फलंदाजी विशेष उल्लेखनीय झाली नसली तरी यष्टीमागे त्याने चांगली कामगिरी बजावली. त्यानंतर सिडनीत हमखास होणाऱ्या भारताच्या पराभवाला विजयाची आस दाखवली व झंझावाती ९७ धावा ठोकून कांगारूंच्या तोंडचे पाणी पळविले होते. तो बाद झाल्याने भारताचा पराभव हुकला पण आश्विन व हनुमान विहारीने केलेला जिगरबाज खेळ भारताला तो ऐतिहासीक सामना अनिर्णित ठेवण्यास आधार ठरला.
ब्रिस्बेनच्या वुलन गाबा मैदानावर चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदर यांच्या ठोस कामगिरीनंतर रिषभने ८९ धावांची नाबाद खेळी करत ३२ वर्षानंतर कांगारुंना गाबावर पराभवाची धूळ चारण्यास हातभार लावला. या खेळीनंतर तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला.
ऑस्ट्रेलिया दौरा संपतो तोच इंग्लंड संघ भारतात येऊन दाखल झाला. इंग्लंडविरुद्ध चारही सामन्यात त्याची फलंदाजी नेत्रदिपक झाली शिवाय त्याच्या सकारात्मक फलंदाजीचा लाभ त्याला यष्टीरक्षणात झाला. स्टंप्स मागील त्याची कामगिरी मोठया प्रमाणात सुधारली शिवाय स्टंप्स मागून गोलंदाजांना प्रोत्साहीत करण्यास त्याची भूमिका महत्वाची सिध्द झाली. याचे फळ म्हणजे भारताने कसोटी मालिका केवळ गोलंदाजांच्या बळावर जिंकली.
इंग्लंडविरुद्ध टि २० मालिकाही त्याला चांगली गेली. त्याच्या स्टंप्सच्या मागील व पुढील कामगिरीने भारताला इंग्लंडला ३-२ असे लोळविण्यात मदत झाली. त्या पाठोपाठ भारताने वनडे मालिकाही २-१ अशी जिंकली.
याच वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात रिषभला आराम देऊन के एल राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली. राहुलही त्या सामन्यात चांगला खेळला. परंतु मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करताना सिमारेषेवर जखमी झाला. दुर्देवाने त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने अय्यर पुढील २ वनडे सामन्यांना मुकला तसेच आयपीएल स्पर्धाही त्याला खेळणं शक्य होणार नव्हतं.
अय्यरच्या जागेवर पुढील दोन वनडे मध्ये खेळताना पंतने झंझावाती ७७ व ७८ धावा ठोकून भारताला मालिका विजय मिळवून देण्यात महत्वाचे काम केले.
आयपीएल स्पर्धा येत्या ९ एप्रिल पासून सुरू होत असून रिषभ पंत खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा श्रेयस अय्यर नियमित कर्णधार होता. परंतु अय्यरच्या दुखापतीमुळे रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची संधी अचानक उपलब्ध झाली. वास्तविक दिल्ली कॅपिटल्समध्ये अजिंक्य राहाणे, रविचंद्रन आश्विन, स्टीव्हन स्मिथ यांच्याबरोबरच मुंबईला विजय हजारे चषक जिंकून देण्यात यशस्वी ठरलेला कर्णधार पृथ्वी शॉ सारखे अनुभवी दावेदार असताना रिषभ पंतला संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळणे यासारखे आनंददायक काय असू शकते ?
सन २०१६ पासून आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या रिषभला दिल्ली संंघाने सन २०१८च्या मेगा ऑक्शन पूर्वीच रिटेन केले होते. विशेष म्हणजे त्या सत्रात रिटेन होणारा तो पहिला खेळाडू होता. तेवीस वर्षाचा पंत आयपीएल इतिहासातला पाचवा तरूण कर्णधार आहे.
मागचे तीन महिने रिषभ पंतच्या क्रिकेट जीवनाला कलाटणी देणारे ठरले आहेत. त्यामुळे जगभर त्याचे कौतुक होत असून अनेक माजी कर्णधार खेळाडू व क्रिकेटप्रेमींसाठी तो कुतुहलाचा विषय बनला आहे. आगामी आयपीएलमध्ये कधीही विजेते न बनलेल्या दिल्ली संघाचे नशिब रिषभ पंतमुळे उजळते का ? हे बघणे मनोरंजक ठरेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

