डॉ. दत्ता विघावे यांचे नाव " ग्रेट इंडियन " बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये समाविष्ठ
श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान संघ ( अमेरिका ) यांचे भारताचे मिडीया को -ऑर्डिनेटर व महाराष्ट्र चॅप्टर (श्रीरामपूर ) अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांना " ग्रेट इंडियन " बुक ऑफ रेकॉर्डसने कोरोना संक्रमण काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल आपल्या विक्रमांच्या पुस्तकात समाविष्ट करून घेतले आहे.
सन २०२० या संपूर्ण वर्षभरात संपूर्ण जगभरात कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. त्या कालखंडात संपूर्ण जगभर जनजीवन विस्कळीत झाले होते. त्या संक्रमण काळात भारतातही समाज जीवन विस्कळीत झाले होते. नेमके त्याच काळात भारताच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातील सामाजिक संस्था, समाजसेवक, पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, सिस्टर्स, आरोग्य सेवक, महानगरपालिका, नगरपालिका, तलाठी, ग्रामसेवक, व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जम्मू काश्मिर ते तामिळनाडू पर्यंतच्या प्रत्येक राज्यातील कोरोना योध्द्यांना वर्ल्ड पार्लमेंट (डब्ल्यूसीपीए ) तर्फे प्रोत्साहन म्हणून व त्यांच्या अप्रतिम कार्याची दखल घेऊन " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स इंटरनॅशनल " अवॉर्ड देऊन सन्मानीत केले.
डॉ. दत्ता विघावे यांनी या देशसेवा करणाऱ्या देशभरातील सुमारे पंधरा हजार देशभक्तांना त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याची पावती म्हणून
"वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स इंटरनॅशनल " अवॉर्ड ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रदान केला. या पुरस्कारामुळे संबंधीत पुरस्कारप्राप्त लोकांना आणखी समाजकार्य करण्यास प्रोत्साहन मिळाले. डॉ. विघावे यांनी सदर पुरस्कार विनामूल्य व प्रत्येकाच्या कामाचे मुल्यांकन करून दिला.
समाजसेवा करणाऱ्या देशभक्तांना एवढया प्रमाणात प्रोत्साहीत करणारी डब्ल्यूसीपीए ही भारतातील एकमेव संस्था आहे. तिचे महाराष्ट्राच्या श्रीरामपूर सारख्या ग्रामिण भागातून नेतृत्व करणाऱ्या डॉ. दत्ता विघावे यांच्या कार्याची दखल घेऊन " ग्रेट इंडियन " बुक ऑफ रेकॉर्डसने आपल्या विक्रमांच्या पुस्तकात स्थान दिले आहे. तशा आशयाचे प्रमाणपत्र डॉ. दत्ता विघावे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

