इथेनॉलची निर्मिती वाढविण्याची साखर उद्योगास संधी - हर्षवर्धन पाटील
फोटो:- निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 22 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
-नीरा भीमा कारखान्याची ऑनलाईन वार्षिक सभा संप्पन्न
इंदापूर: प्रतिनिधी दि.21/3/21
देशात साखर उद्योगाचे स्वरूप बदलत चालले आहे. केंद्र सरकारने पाच वर्षासाठी इथेनॉलचे अतिशय चांगले धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलची निर्मिती वाढविण्याची साखर उद्योगामध्ये संधी निर्माण झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शहाजीनगर येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2019-20 वर्षाची 22 वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर रविवारी (दि.21) उत्साहात पार पडली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. यावेळी सभेत मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20 टक्के करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्रिगटाची अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, या मागणीवर केंद्र सरकार सकारात्मक आहे. तसेच केंद्र सरकारने 60 लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी दिलेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व मंत्रिमंडळाचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
आगामी वर्षमध्ये नीरा भीमा कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने बायो सीएनजी गॅस निर्मितीचा देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला प्रकल्प उभारणार आहे, सदरचा प्रकल्प देशात आदर्शवत असा असणार आहे, अशी माहिती देऊन हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.
ते पुढे म्हणाले, सन 2020-21 या गळीत हंगामामध्ये कारखान्याने बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉलची निर्मिती केली आहे. ऑइल कंपन्यांकडून कारखान्यास 1कोटी 10 लाख लिटर इथेनॉल पुरवण्याचे टेंडर मिळाले आहे. इथेनॉलचे ऑइल कंपन्यांकडून पैसे मात्र टप्प्याटप्प्याने मिळत आहेत. परिणामी, कारखान्यास इथेनॉलची मोठी रक्कम येणे बाकी असल्याने सध्या ऊस पेमेंट करण्यास अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे लवकर देण्यासाठी नियोजन सुरू आहे. बँकांनी थर्ड पार्टी करार करून इथेनॉल वरती 85 टक्के कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे धोरण बँकांच्या विचाराधीन आहे. आगामी काळामध्ये नीरा भीमा कारखाना 1 लाख 5 हजार केएलटीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारणार असल्याचे यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी ऑनलाईन वार्षिक सभेचे व कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. या वार्षिक सभेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, विलासराव वाघमोडे, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, चंद्रकांत भोसले, राजेंद्र गायकवाड, शिवाजी शिंदे, शंकर घोगरे, नामदेव किरकत उपस्थित होते. या सभेत विषयांचे वाचन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले. आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले. सभा खेळीमेळीत संपन्न झाली.

