shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय संघात खरंच खेळीमेळीचं वातावरण आहे.



इंग्लंडविरूध्द ३-१ अशी कसोटी जिंकल्यानंतर पाच सामन्यांची टि-२० मालिका सुरू झाली. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या टि -२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर निवड समितीने १९ जणांचा संघही चांगला निवडला. कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल उंच व्हायला पाहीजे होतं. परंतु तसं न होता पहिल्या टि-२० सामन्यात भारताला एक लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. त्या पराभवानंतर संघ प्रबंधनाने फार मोठी कारवाई केल्याप्रमाणे संघात दोन बदल केले. त्याचे फळही विजयाच्या रूपात मिळाले. त्यामुळे असे वाटले होते की संघाची गाडी विजयीपथावर आली व संघात सर्व काही आलबेल आहे. परंतु तिसऱ्या सामन्यातील आणखी एका दारूण पराभवानंतर अनेक प्रश्न तयार झाले.


दुसऱ्या सामन्यात संघात घेतलेल्या सुर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी न देताच त्याला तिसऱ्या सामन्यातून वगळले. वास्तविक दुसऱ्या सामन्यात कोहली यादवला फलंदाजीस पाठवू शकला असता. परंतु त्याने त्याला संधीच दिली नाही. हा त्याच्यावर फार मोठा अन्याय आहे. तर मागील ४ डावात ०, १, ०, ० अशी कामगिरी करणाऱ्या के.एल राहुलला खेळवून कोहली काय साध्य करू इच्छितो हे त्यालाच माहीती ?

कोहलीचे राहुलविषयीचे मित्रप्रेम येथेच थांबले नाही तर दुसऱ्या सामन्यात पदार्पणातच शानदार खेळी करणाऱ्या इशान किशनला सलामी ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर पाठविले. राहुल या सामन्यातही अपयशी ठरला. त्याचा ताण किशनच्या खेळावर पडला व तोही स्वस्तात परतला. शिवाय फॉर्मात असलेल्या रोहीत शर्माला दोन सामन्यात निष्कारण सक्तीची विश्रांती दिल्यामुळे त्यालाही आपली लय सापडली नाही. परिणामतः ३ बाद २४ असा भारत संकटात सापडला. 

एक फलंदाज म्हणून कोहलीही विशेष फॉर्मात नाही.०, ६२,०, २७, ०, ७३ अशी त्याची मागील सहा डावातील कामगिरी आहे. या सामन्यातही तो सुरूवातीला चाचपडत खेळत होता. शिवाय त्याच्या चुकीमुळे फॉर्मात असलेला रिषभ पंत धावबाद झाला. त्यानंतर त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली व शेवटच्या काही चेंडूंवर आक्रमक खेळून स्वतःच्या खात्यात ७७ धावा जोडल्या. त्यामुळे त्याचे रेकॉर्ड सुधारले. परंतु संघाला विजय मिळवून देण्याएवढी धावसंख्या फुगविण्यात तोही अपयशी ठरला.
                      
टि -२० सामन्यात कमीत कमी पाच गोलंदाजांना गोलंदाजी करावीच लागते. त्यातील एखाद दुसरा गोलंदाज अपयशी ठरला तर त्याला पर्याय म्हणून संघात आणखी एक गोलंदाज आवश्यक असताना कोहलीने पाचच गोलंदाज संघात निवडले. त्यापैकी त्याचा आरसीबीचा सहकारी यजुवेंद्र चहलची कामगिरी दिवसें दिवस खालावत चालली असताना कोहली त्यालाच सातत्याने खेळवत आहे. परिणामतः भारताची गोलंदाजी निष्प्रभ ठरत आहे. विशेष म्हणजे हा चहल गोलंदाजीही धड करत नाही, त्याला फलंदाजीही नीट येत नाही व क्षेत्ररक्षणात झेलही सोडत आहे. संघात राहुल चहर, अक्षर पटेल सारखे गोलंदाज उपलब्ध असताना या चहलचे नेमके लाड कशासाठी चालले आहे ?
                      
वॉशिंग्टन सुंदर सारखा टि २० स्पेशालिस्ट गोलंदाज पावर प्ले मध्ये प्रभावी ठरत असताना पहिल्या सामन्या प्रमाणे या सामन्यातही त्याला उशिरा गोलंदाजी दिली. त्यामुळे इंग्लिश सलामीवीर सुसाट सुटले. दुसऱ्या सामन्यात सुंदरने पावर प्लेमध्ये शानदार गोलंदाजी करून आपली छाप सोडली होती. तरीही कोहली अनुभवातून काही शिकताना दिसत नाही.
                      
संघ निवड करताना गोंधळ घालणं हे आता कोहलीचं नित्याचंच झालं आहे. शक्यतो इतर कर्णधार विजयी संघात बदल न करता मागच्या सामन्यातील संघच पुढच्या सामन्यात खेळवितात. परंतु कोहलीने एखादा अपवाद वगळता आतापर्यंत त्याच्या कर्णधार पदाच्या कार्यकाळात प्रत्येक सामन्यात विनाकारण बदल केले आहेत.
                        
संघ निवडताना कोहली कोणाच्या दबावात संघ निवडतो का ? संघात गटबाजी आहे का ? की ड्रीम इलेव्हन या सट्टेबाज कंपनीशी त्याचं काही साटंलोटं आहे ? असे नानाविध प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनात येत आहेत.
                         
देशाच्या संघ हितासाठी कोहलीने त्याला मिळालेल्या कर्णधार पदाच्या अधिकाराचे योग्य उपयोग करणे गरजेचे आहे. संघात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी त्याने स्वतःच्या काही गुणांना मुरड घालणेही गरज आहे. अन्यथा इतका चांगला संघ हाताशी असूनही त्याला कधीच आसीसीची कोणतीच विश्वचषक स्पर्धा जिंकता येणार नाही. अजून वेळ गेली नाही. तेंव्हा कोहलीने आपल्या कोषातून लवकर बाहेर निघावे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close