प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई: एका गरीब महिलेच्या दोन्ही डोळ्यांना मोती बिंदू झाल्याने तिला अंधत्व आले. आता उरलेले आयुष्य असेच जाणार असे वाटत असताना सामाजिक बांधिलकी जपत सोनईतील डाॅ.बाबासाहेब शिरसाठ यांनी स्वखर्चाने महिलेच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणला आहे.
सोनई- सायरा शेख सह डाॅ. बाबासाहेब शिरसाठ व नेत्रतज्ञ डाॅ. संदीप निमसे .
सोनई जवळील मुळा कारखाना गट परीसरातील दरवेसनगर येथे राहत असलेल्या सायरा निजाम शेख राहतात. रानोरान फिरुन गवताचं गठोडं आणून त्या आपले कुटुंब चालवत होत्या. दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होवून त्यांना अंधत्व आले. मात्र पैसे नसल्याने त्यांनी अंधारमय जीवनच जगणे पसंत केले होते.
पत्नी सायराची दृष्टी गेल्याने निजाम शेख व परीवारात चिंता होती. आपली कैफियत त्यांनी अनेकांना सांगितली होती. मुळा कारखाना गट परीसरात डाॅ.बाबासाहेब शिरसाठ उसतोडणी कामगारांच्या आरोग्यासाठी तीन तास थांबत असतात. त्यांना हा विषय समजल्यानंतर शेख कुटुंबास आधार आला.
सायराच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होता. त्यांना दम्याचा आजार असल्याने शस्त्रक्रिया करणे अवघड असल्याचे नगरच्या डाॅक्टरानी सांगितले होते. मात्र डाॅ.शिरसाठ यांनी त्यांना स्वखर्चाने राहुरी येथील नेत्रतज्ञ डाॅ.संदीप निमसे यांच्या कडे नेले. लेंस घेवून दिली. डाॅ.निमसे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शस्त्रक्रिया मोफत केली आणि अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची वाट निर्माण झाली.
सायरा शेख यांना दिसू लागल्याने कुटुंब व नातेवाईकांना खुप हायसे वाटले. डाॅ. शिरसाठ गेल्या अनेक वर्षापासून गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात. कोरोना संसर्ग.काळात त्यांनी कशाचीही पर्वा न करता अनेक लहान गावात जावून सेवा दिली. या विशेष कार्याबद्दल ग्रामस्थांनी डाॅ.शिरसाठ व डाॅ.निमसे यांना धन्यवाद दिले आहे.

