आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या जगभरातील नामवंत खेळाडूंच्या अप्रतिम खेळाला क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीकडून दरवर्षी मानाचे विविध पुरस्कार दरवर्षी दिले जातात. परंतु आयसीसीने आता प्रत्येक महिन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला महिन्याचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू हा पुरस्कारही सुरू केला आहे.
नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी २०२१ या महिन्यात सर्वोत्तम खेळाडू बनण्याचा मान भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन आश्विन याने पटकविला आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्या या मालिकेत इंग्लंड भारतात ४ कसोटी, ५ टि-२० व ३ वनडे सामने खेळणार आहे. त्यापैकी कसोटी मालिका नुकतीच संपन्न झाली. ही मालिका भारताने ३-१ अशी जिंकली आहे. या मालिकेतील ३ कसोटी सामने फेब्रुवारी महिन्यात झाले.
मुळतः फिरकी गोलंदाज असलेल्या रवीचंद्रन आश्विनने या चार कसोटी सामन्यांच्या फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय खेळ करून मालिकावीर पुरस्कारच मिळविला नाही तर भारताला पिछाडीवरून ३-१ अविश्वसनीय विजय मिळवून देताना कसोटीच्या विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
चेन्नईच्या पहिल्या कसोटीत ९, चेन्नईमधीलच दुसऱ्या कसोटीत ८, अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटीत ७, अहमदाबादच्याच चौथ्या कसोटीत ८ असे एकूण ३२ बळी त्याने मिळविले. त्यातील २४ बळी फेब्रुवारी महिन्यात मिळवले आहेत. तसे चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत एक फलंदाज म्हणून १०६ धावांची शतकी खेळी करताना १७६ धावा जमविल्या. याच महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत खेळताना स्वतःचे ४०० बळीही पूर्ण केले आहेत.
आयसीसीच्या " प्लेअर ऑफ दि मंथ " या पुरस्कारासाठी रवीचंद्रन आश्विनसह इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट व वेस्ट इंडिजचा काईल मेयर्स यांचेही नामांकन होते.
दर महिन्यात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी आयसीसीने एक निवड समिती नियुक्त केलेली आहे. त्यामध्ये वरिष्ठ पत्रकार, माजी खेळाडू, आयसीसीच्या हॉल ऑफ फेमधील निवडक खेळाडू यांचा समावेश आहे. यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व क्रिडा पत्रकार मोना पार्थ सारथी व माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण हे करतात.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रुटनेही आश्विन प्रमाणेच फलंदाजी व गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. रूट फेबुवारी महिन्यात भारताविरूध्द तीन कसोटी सामने खेळला. त्यामध्ये ३३३ धावा ६ बळी त्याने मिळविले. जानेवारी महिन्याच्या यादीत अव्वल ठरलेल्या रूटने फेबुवारी महिन्यात चेन्नईतील पहिल्या कसोटीत २१८ व ४० धावा बनविल्या होत्या. त्यानंतर त्याच्या बॅटने मौन स्विकारलं. दुसऱ्या कसोटीत ६ व ३३, अहमदाबादच्या तिसऱ्या सामन्यात १७ व १९ तर चौथ्या कसोटीत पाच व ३० धावा तो काढू शकला.
या नामांकन यादीतील तिसरा खेळाडू होता वेस्ट इंडिजकडून केवळ पहिलीच कसोटी खेळणारा काईल मेयर्स. या पदार्पणवीर खेळाडूने दणकेबाज द्विशतक ठोकत बांगलादेशने दिलेले ३९५ धावांचे अशक्यप्राय आव्हान पार केले. या खेळीत त्याने नाबाद २१० धावा ठोकत इतिहास घडविला होता.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

