भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटीतील अपयशी प्रतिकार आता टि २० मालिकेत रूपांतरीत होणार आहे. येत्या १२ मार्च पासून या दोन संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर पाच सामन्यांची मालिका खेळली जाणार असून भारताचा संघ मायदेशात नेहमी प्रबळ सिद्ध झाला आहे. तर इंग्लिश संघ वनडेचा विद्यमान विजेता आहे. आयसीसीच्या टि २० क्रमवारीत इंग्लंड सध्या अव्वल स्थानी असून भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन संघात आतापर्यंत १४ सामने झाले असून त्यामध्ये दोन्ही संघ प्रत्येकी ७ विजयांसह बरोबरीत आहे. परंतु सध्या दोन्ही संघ येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भारतातच होणाऱ्या टि २० मालिकेच्या दृष्टीने तयारीचा एक भाग म्हणून या मालिकेकडे बघत आहे. तरी या दोन संघात नेहमी अटीतटीचे सामने झाले आहेत. आज आपण त्याच अनुषंगाने या दोन संघातील काही अविस्मरणीय सामन्यांवर एक नजर टाकूया.
१९ सप्टेंबर २००७ च्या डरबन येथे झालेल्या पहिल्या टि-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत व इंग्लंड यांच्यातील सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला. हा या दोन संघामधील पहिला टि-२० सामना होता. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत होता. सेहवाग ६८, व गंभीर ५८ यांनी १५ षटकात १३६ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर पुढील ३ षटकात भारताचे ३ गडी बाद झाले. त्यावेळी भारताची धावसंख्या होती ३ बाद १५५. अशा प्रसंगी १७ व्या षटकात कर्णधार धोनी सोबत खेळण्यास युवराजसिंग आला. अठराव्या षटका दरम्यान फ्लिंटॉफ व युवराज यांच्यात गंभीर बाचाबाची झाली. शेवटी पंचानी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र त्या नंतर युवराजने आपला सगळा राग १९ व्या षटकात गोलंदाजी टाकणाऱ्या ख्रिस ब्रॉडवर उतरवला. युवराजने ब्रॉडच्या त्याच्या सहा चेंडूंना सिमारेषेपार पिटाळत टि २० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका षटकात सहा षटकार मारण्याचा महापराक्रम केला. शिवाय युवराजने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला, तो आजही अबाधीत आहे. हा रोमहर्षक सामना भारताने १२ धावांनी जिंकला.
दुसरा किस्सा आहे सन २००९ च्या इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टि २० स्पर्धेतील. १४ जून रोजी लंडनमधील सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५३ धावा जमविल्या. प्रत्युत्तरात भारताने ११ षटकात ३ प्रमुख फलंदाज गमावले. त्यानंतर कर्णधार धोनीची इथे एक चाल चुकली. युवराजसिंगच्या अगोदर त्याने रविंद्र जडेजाला प्रथम फलंदाजीस पाठविले. परंतु जडेजाने ३५ चेंडूत केवळ २५ धावांची धिमी खेळी केली. त्यानंतर युवराजने ९ चेंडूत १७, धोनीने २० चेंडूत ३०, युसुफ पठाणने १७ चेंडूत ३३ धावा फटकविल्या. तरीही तो उत्कंठावर्धक सामना भारनाने केवळ ३ धावांनी गमावला.
सन २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात भारत केवळ एक टि - २० सामना खेळला. ७ सप्टेंबर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने ७ बाद १८० धावा केल्या. विजयासाठी १८१ धावांचा पाठलाग करताना भारत खराब सुरुवातीनंतर कोहली ६६ व धवन ३३ यांच्या बळावर चांगल्या स्थितीत पोहोचले. भारताला शेवटच्या बारा चेंडूत २६ धावा हव्या होत्या. तेंव्हा धोनी व अंबाती रायडू मैदानावर होते. १९ व्या षटकात धोनीने दोन चेंडूवर ५ तर रायडूने ४ चेंडूत दोनच धावा काढल्या. अखेरच्या षटकात १७ धावांची गरज असताना धोनीने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर २ धावा निघाल्या. तिसऱ्या चेंडूवर एक धाव निघत असताना धोनीने ती घ्यायला नकार दिला, चौथ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. दोन चेंडूत पाच धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर परत एकदा धोनीने एक धाव घेतली नाही. सहाव्या चेंडूवर षटकार मारून विजयी मिळविण्याची धोनीची आशा त्यावेळी धुळीस मिळाली जेव्हा शेवटच्या चेंडूवर त्याचा मोठा फटका चुकला. अशा रितीने हा सामना भारताला धोनीच्याच चुकीमुळे गमवावा लागला.
सन २०१७ या नागपूर येथील सामन्यात भारताने प्रथम खेळताना केएल राहुलच्या शानदान ७१ धावांच्या जोरावर आठ बाद १४४ धावा बनविल्या. त्यानंतर इंग्लंड २० षटकात ६ बाद १३९ धावा बनवू शकला. इंग्लंडला शेवटच्या षटकात आठ धावांची गरज असताना जसप्रित बुमराहाने ज्यो रूट व जोस बटलरला बाद करत केवळ दोन धावा खर्च केल्या. अशा रितीने भारत ५ धावांनी विजयी झाले.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

