shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएल खेळण्यासाठी अकरा इंग्लिश खेळाडू भारतातच थांबले......!!

मागील दोन महिन्यांपासून भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाला ४ कसोटी, ५ टि-२० व ३ वनडे सामने असलेला भरगच्च दौरा नुकताच संपला. इंग्लंड संघाने कसोटी मालिका विजयाने सुरु केली परंतु तेच विजयी अभियान त्यांना राखता न आल्यामुळे त्यांना कसोटी मालिका १-३ अशी गमवावी लागली. तीच गत त्यांची टि-२० सामन्यात झाली. पहिला व तिसरा सामना त्यांनी जिंकून आशादायक वातावरण निर्माण केले होते.


                   डॉ. दत्ता विघावे


 मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. परिणामतः ती मालिकाही त्यांनी २-३ अशी गमावली.  त्यानंतरच्या ३ सामने असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणली. तिसरा व निर्णायक सामना अतिशय रंगतदार झाला त्या सामन्यात भारताचे ३२९ धावांचे मोठे आव्हान इंग्लंडच्या आवाक्यात आले होते मात्र भारताने तेथेही त्यांच्यावर कुरघोडी करत २-१ ने बाजी मारून या संपूर्ण दौऱ्याचा विचार करता इंग्लंडला व्हाईटवॉश देत रिकाम्या हाताने मायदेशी पाठविले.

इंग्लंडचा १७ सदस्यीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात होता. दौरा संपल्यानंतर त्यातील केवळ सहा खेळाडूच मायदेशी परतले. तर अकरा खेळाडू भारतातच राहीले. त्याचे कारण म्हणजे येत्या ९ एप्रिलपासून जगातील सर्वात मोठी क्रिकेटची लिग आयपीएल भारतात सुरू होत असून इंग्लंडचे १२ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे. यापैकी जोफ्रा आर्चर सध्या इंग्लंडमध्ये असून त्याच्या मनगटात काच घुसल्याने त्याचे नुकतेच ऑपरेशन झाले असून आयपीएलच्या अंतिम पर्वात तो त्याचा संघ राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

 इंग्लंडचे अकरा खेळाडू भारताविरूध्दच्या मालिकेनंतर तेथील बायो बबल मधून थेट आपापल्या फ्रँचाईजींच्या बायो बबलमध्ये लगेच दाखल झाले आहेत. आज आपण आयपीएलच्या विविध फ्रँचाईजींच्या संघातून खेळणाऱ्या इंग्लिश खेळाडूंबद्दल जाणून घेऊ या.जोस बटलर, बेन स्टोक्स व लियाम लिव्हींगस्टोन हे इंग्लंडचे तीन वलयांकित खेळाडू  राजस्थान रॉयल्सच्या जथ्थ्यात सामील झाले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी जलदगती गोलंदाज टॉम करन व मधल्या फळीतील फलंदाज सॅम बिलिंग्ज दिल्ली संघात दाखल झाले आहेत.भारताविरूध्दच्या शेवटच्या वनडे सामन्यात अपयशी झुंज देणारा अष्टपैलू खेळाडू सॅम करन व फिरकी गोलंदाज मोईन अली चेन्नई सुपर किंग्ज संघात पोहोचले आहेत.

टि २० च्या आयसीसी मानांकनातील अव्वल फलंदाज डेव्हीड मलान व जलदगती गोलंदाज ख्रिस जॉर्डन पंजाब किंग्जकडून खेळणार आहेत.भारताविरूध्द एकदिवसीय सामन्यात तडाखेबाज खेळ करून मालिकाविराचा खिताब पटकविणारा जॉनी बॅरिअस्टो आपल्या नियमित सनरायझर्स हैद्राबाद संघात दाखल झाले आहेत.

सफेद चेंडूच्या खेळातील इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन भारताविरूध्द पहिल्या वनडे सामन्यात जखमी झाल्यामुळे नंतरच्या दोन सामन्यांना मुकला. मॉर्गन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणार असल्याने तो केकेआरच्या ताफ्यात सामील झाला आहे.

आयपीएल मध्ये एकूण आठ संघ सहभागी होत असून त्यातील सहा संघांमध्ये इंग्लिश खेळाडू खेळताना दिसतील. मात्र मुंबई इंडियन्स व रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर या संघात एकाही इंग्लिश खेळाडूचा समावेश नाही. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई इंडियन्स व आरसीबी या दोन संघातील सामन्यानेच चौदाव्या आयपीएल सत्राचा उदघाटनाचा सामना ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे होणार आहे.
close