shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घरापासून महिलांच्या सन्मानाची सुरुवात व्हावी: पल्लवी निर्मळ..!

जिल्हा निवडणूक शाखा व महिला,बाल कल्याण विभागाच्या वतीने महिला दिन साजरा

 अहमदनगर : स्त्री-पुरुष असमानतेचा पहिला धडा कुटुंबातच गिरवला जातो. त्यामुळे मुला-मुलींमध्ये भेद न करता आपल्या घरापासूनच महिला सन्मानाची सुरुवात करायला हवी, असे आवाहन जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले.

 जिल्हा निवडणूक शाखा आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात निर्दोष मतदार यादी कामी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या प्रतिनिधींचा सन्मान महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी निर्मळ बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील होते.  यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुधीर पाटील,परिविक्षा अधिकारी संध्या राशिनकर,निवडणूक शाखेचे तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, डिस्ट्रिक प्रोबेशन एन्ड आफ्टर केअर असोसिएशन संचलित मुला-मुलींचे बालगृह या संस्थेच्या मानद सचिव डॉ. शकील फातेमा शेख, अॅ़ड. प्रज्ञा हेंद्रे, अनिता कर्पे, बागेश्री जरंडीकर, मेघना टेपाळे,अर्जुन नेहरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख,अमोल वाघमोडे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, अंबिका नक्का, माधव गायकवाड आदी उपस्थित होते.

 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लोकशाही बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या निर्दोष मतदार यादीच्या कामी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,स्वयंसेवी संस्था महिला प्रतिनिधी,क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी बजावणारी खेळाडू कु. तन्वी शेंडकर आणि उत्कृष्ट वार्तांकनाबद्ल पत्रकार महेश देशपांडे यांचा सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कोरोना संदर्भातील प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे भान बाळगून जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटनेच्या वतीने संचलित निरीक्षण बालगृह येथील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

 कार्यक्रमाच्या आरंभी महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रमुख अतिथी आणि सन्मानपात्र महिला भगिनींचा गौरव करण्यात आला.

 यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना पल्लवी निर्मळ म्हणाल्या,महिलांच्या हक्क अधिकारांसठी ८ मार्च १८०८ रोजी देण्यात आलेल्या लढ्याची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. भारतात १९४३ पासून महिला दिनाचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. मुला-मुलींना सारखी वागणूक घरातच मिळणे अपेक्षित आहे. आपण शिकलो. मात्र, अंधश्रद्धेच्या चक्रात अडकल्याने आजही आपण आपल्या अधिकाराबद्दल जागरूक नाहीत. शिक्षणाचा उपयोग करीत घरापासूनच महिला सन्मानाच्या संस्काराची उजळणी व्हायला हवी,असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात पत्रकार श्री.देशपांडे यांनी  स्वरचित 'माझी बहीण' या कवितेचे गायन केले. राजमाता जिजाऊ, संत मुक्ताई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई, रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या महनीय मातांच्या कार्याचा उल्लेख या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी केला. कार्यक्रमाचे समयोचित आणि प्रवाही सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. वैभव देशमुख यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन केले.

 बाल न्याय मंडळाच्या सदस्य प्रज्ञा हेंद्रे,अनिता कर्पे, बाल कल्याण समितीच्या सदस्य बागेश्री जरंडीकर,मेघना टेपाळे यांनी महिलांविषयी असणारे कायदे, हक्क व अधिकार याविषयी विस्तृत विवेचन केले. 

 निवडणूक शाखेच्या वतीने यावेळी मतदार यादीच्या कामी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महिला बीएलओ संगीता निमसे, भारती तांबे,स्नेहल लवांडे, प्रीती देशपांडे, निता माने तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी मंगल झावरे, संगीता घनवट,सरोज ओव्हळ, अलका हासे,डॉ. ऋचा शिंदे यांचा तसेच ४० अंगणवाडी सेविकांचा सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला.
close