पिंपरी चिंचवड:-एखाद्या ठिकाणी घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असेल आणि पोलीस शोध घेत असल्याचा संशय आल्यास तो थेट नजिकच्या पोलीस ठाण्यात हजर व्हायचा. अशा पद्धतीने त्याने आजवर तब्बल 87 घरफोड्या केल्या. हा कुविख्यात चोर भोसरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडे चौकशी करून पोलिसांनी मागील वर्षातील घरफोडी आणि वाहन चोरीचे पाच गुन्हे उघड केले आहेत.
जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 32, रा. औंध, पुणे) असे कुविख्यात चोराचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार सचिन धनराज पवार (वय 28, रा. आदर्शनगर, मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
भोसरी पोलिसांनी दोन्ही आरोपींची माहिती काढून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी भोसरी परिसरात चार घरफोड्या आणि एक वाहन चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून सहा लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील घरोफोडीचे चार आणि वाहन चोरीचा एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी जयड्या हा सराईत चोर आहे. एखाद्या ठिकाणी घरफोडी करत असताना त्याचा गुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यास तो तात्काळ स्थानिक पोलिसांसमोर हजर होत असे. त्याने आतापर्यंत पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहरात 87 गुन्हे केले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, आर व्ही बोयणे, गणेश सावंत, बाळासाहेब विधाते, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, संतोष महाडिक, अजय डगळे, सागर भोसले, आशिष गोपी, राजू जाधव, स्वामी नरवडे यांच्या पथकाने केली.

