पंत व सुंदरच्या खेळाने इंग्लंडचा हिरमोड
नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आज इंग्लंडविरूध्दच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सामना पुन्हा एकदा भारताच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना पुन्हा एकदा स्पिनिंग शॉक दिल्यानंतर भारताच्या फलंदाजांना आपले काम चोखपणे बजावयाचे होते.
परंतु पहिल्या दिवशीच भारताचा सलामीवीर शुभमन गिल शुन्याचा धनी बनला.
पहिल्या दिवसाची नाबाद असलेली फलंदाजांची जोडी रोहीत शर्मा व चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव दुसऱ्या दिवशी सुरू केल्यानंतर रोहीत शर्मा त्याच्या स्वाभाविक खेळाच्या विपरीत म्हणजे शांत व संयमाने खेळत होता. तर दुसऱ्या बाजूने भारताच्या फलंदाजीचा कणा असलेला चेतेश्वर पुजारा चाचपडत होता. त्या गडबडीत तो इंग्लिश फिरकीपटू जॅकलिचचा या मालिकेत चौथ्यांदा बळी बनला. त्याच्या पाठोपाठ कर्णधार कोहली शुन्यावर परतला. कोहलीची या मालिकेत शुन्यावर बाद होणाची ही दुसरी वेळ आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोहलीचा दिल्लीचा साथीदार शुभमन गिलही या सामन्यात शुन्यावर बाद झाला. विशेष म्हणजे कोहली आणि गिल चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीतही शुन्यावर बाद झाले होते.
उपकर्णधार अजिंक्य राहाणे चांगलाच रंगात आला होता पण जिमी अँडरसनने त्याच्या रंगाचा बेरंग करत भारताची ४ बाद ८० अशी अवस्था केली. रोहीत शर्मा एक बाजू लावून धरत हळूहळू धावाही जमवत होता, परंतु अर्धशतकाला एक धाव कमी असताना पंचांच्या सदोष निर्णयाचा बळी ठरला. त्यानंतर भरवशाचा आश्वीनही लवकर परतला. त्यावेळी इंग्लंड वरचढ ठरला होता. इंग्रंज गोलंदाजांनी तोपर्यंत अतिशय शिस्तबध्द गोलंदाजी करून भारताच्या भक्कम फलंदाजांना खिंडीत पकडले.
सहा बाद १४६ अशा संकटात भारत सापडला असताना रिषभ पंत व नवख्या वॉशिंग्टन सुंदरने ११३ धावांची सामन्याला कलाटणी देणारी भागीदारी केली. रिषभ पंत सुरूवातीला सयंमी खेळला. मात्र अर्धशतकानंतर इंग्लिश गोलंदाजांचे त्याने पुरते धिंदवडे काढले. शतकी खेळी करून त्याने भारताला मजबूत स्थितीत आणले. तर आपली चौथी कसोटी खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ६० धावा करत तिसरे कसोटी अर्धशतक झळकविले.
पंत व सुंदरच्या शानदार खेळामुळे इंग्लंडकडे झुकलेला सामना परत एकदा भारताच्या बाजूने वळला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल भारताच्या सुरूवात करतील तेंव्हा त्यांच्याकडून ५० ते ६० धावांची अपेक्षा भारतीयांना नक्की असेल. सुंदरने आपला हाच सुंदर खेळ पुढे नेला त्याला पहिले कसोटी शतक झळकविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
भारताची गिल, पुजारा, कोहली, राहाणे हेअग्रमी फलंदाज अपयशी ठरत आहेत त्यामुळे खालच्या फलंदाजांवर लोड येत आहे. या मालिकेतील प्रत्येक डावात भारताला रोहीत, पंत, आश्विन व सुंदर यांनी सावरले आहे. वरील चौकडीने तातडीने खेळात सुधार आणण्याची गरज आहे. कारण समोर कसोटी विश्व अजिंक्यपदाचं मोठं आव्हान उभे आहे.
इंग्लंड संघाला आज उष्णता, जोफ्रा आर्चरला संघात न निवडणे, फिरकी गोलंदाज अरिपक्वता व खास करून रिषभ पंतची धडाकेबाज खेळी चांगलीच त्रास देऊन गेली, शेवटी वॉशिंगटन सुंदरनेही इंग्रजांच्या जखमांवर मिठ चोळले.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

