पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर भारत व इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना संपन्न झाला. या सामन्यात भारताने नेत्रदिपक विजय मिळविला. कृणाल पांडयाने पदार्पणातच विक्रमी अर्धशतक ठोकले, तर प्रसिद्ध कृष्णाने ४ बळी घेवून पदार्पणातच विक्रमी कारनामा केला. पण हा सामना सर्वात जास्त राहील तो या सामन्यात खेळणाऱ्या चार सख्ख्या भावांमुळे.
या सामना भारताकडून कृणाल पांड्याने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. तर त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांडया भारतीय संघाचा नियमीत सदस्य आहे. विशेष म्हणजे कृणालला त्याचा धाकटा भाऊ हार्दिकच्या हस्तेच भारताची मानाची ब्ल्यू कॅप देण्यात आली. भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ही तिसरी सख्ख्या भावांची जोडी ठरली.
पांड्या बंधूंशिवाय याच सामन्यात विरोधी इंग्लंडकडूनही सॅम करन व टॉम करन हे सख्खे भाऊ खेळत होते. जागतिक क्रिकेटच्या इतिहास एकाच सामन्यात दोन्ही संघांकडून भावांची जोडी खेळण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला.एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात कृणाल व हार्दिक प्रथमच या सामन्यात एकत्र भारताकडून खेळले. तत्पूर्वी ६ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यूझिलंडविरूध्द टि २० सामन्यात हे दोघे भाऊ एकत्र खेळले होते. सन २०१६ पासून हार्दिक भारतीय संघाकडून नियमितपणे खेळत आहे. परंतु कृणाल भारतीय संघात अजून स्थिरावला नाही. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून ते नियमितपणे खेळत आहेत.
सन २००७ मध्ये भारताने जिंकलेल्या टि२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युसुफ पठाण व इरफान पठाण हे दोन भाऊ भारताकडून एकाच टि २० सामन्यात खेळणारे पहिले भाऊ भाऊ होते.स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांचे सुपुत्र सुरिंदर अमरनाथ व मोहिंदर अमरनाथ या भावांची जोडी भारताकडून खेळणारी पहिली सख्ख्या भावांची जोडी होती. विशेष म्हणजे सन १९८३ मध्ये भारताने विश्वकप जिंकला त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मानकरी मोहींदर अमरनाथच होता.
या व्यतिरिक्त जागतिक क्रिकेटमध्ये न्यूझिलंडकडून यष्टीरक्षक फलंदाज व कर्णधार ब्रेंडन मॅक्लम व अष्टपैलू खेळाडू नाथन मॅकलम एकत्रितपणे खेळले आहेत.ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जेफ मार्श याचे दोन मुले सलामीवीर शॉन मार्श व वेगवान गोलंदाज मिचेल मार्श हेही ऑस्ट्रेलियासाठी एकत्रपणे खेळले आहेत.
द. आफ्रिकेचे मॉर्नेने मॉर्केल व एल्बी मॉर्केल वेगवान गोलंदाज असलेले सख्खे भाऊ बराच काळ एकत्रपणे आंतरराष्ट्रीय सामने खेळले.डावखुरा मायकेल हसी व उजव्या हाताने खेळणारा डेेव्हीड हसी हे शानदार फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी एकमेकांसोबत खेळले आहेत.
पाकिस्तानचे दोन विस्फोटक फलंदाज व यष्टीरक्षक कामरान अकमल व उमर अकमल ही पाकिस्तानसाठी एकत्र खेळले आहेत.निल ओब्रायन व केविन ओब्रायन या भावांनी आयर्लंडसाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात जोडीने फलंदाजी केली आहे.
इंग्लंडकडून क्रेग ओवरटन व जेमी ओावरटन हे इंग्लंडकडून वनडे खेळणारे पहिले जुळे भाऊ आहेत.ऑस्ट्रेलियाकडून इयान चॅपेल, ग्रेग चॅपेल व ट्रेव्हर हे तिन भाऊ एकाच वेळी बऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना आढळले. ऑस्ट्रेलियाचे जगविख्यात अष्टपैलू खेळाडू स्टीव्ह वॉ व मार्क वॉ हे जुळे भाऊ क्रिकेट इतिहासातील महान खेळाडू गणले जातात.
न्यूझिलंडचे जेफ क्रो व मार्टीन क्रो हे जगप्रसिध्द फलंदाज संघासाठी एकाच वेळी बरेच सामने खेळले.
झिंबाब्वेचे अँडी फ्लॉवर व ग्रँट फ्लॉवर हे महान खेळाडू सख्खे भाऊ होते. झिंबाब्वेचे ब्रायन स्ट्रँग व पॉल स्ट्रँग हे सख्खे भाऊ अनेक आंतरराष्ट्रीय सामन संगतीनेच खेळले. गाय व्हिटॉल व अँडी व्हिटॉल या भावांनी देखील झिंबाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
केनियाकडून मार्टिन सूजी व टोनी सूजी यांनी आयसीसीच्या अनेक स्पर्धा एकत्रपणे खेळल्या आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

