२० मार्च हा दिवस संपूर्ण जगभर " हॅपिनेस्ट डे " म्हणजे आनंदी राहाण्याचा दिवस साजरा केला जातो. नेमका याच दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यात पाच टि २० सामन्यांच्या मालिकेतला अंतिम सामना खेळला जाणार होता. दोन्ही संघ या मालिकेत २-२ विजय मिळवून बरोबरीत असल्याने या सामन्याला शब्दशः अंतिम सामन्याचे स्वरूप आले होते.
टि २० क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ आयसीसीच्या मानांकनात अव्वल स्थानी असून त्या पाठोपाठ भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन सर्वोत्तम संघातील सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागून होतं.
भारतात होऊ घातलेला टि-२० विश्वकप बघता आगामी इंग्लंड संघाची संघ बांधणी जवळ जवळ पूर्ण झाली होती. परंतु भारतीय संघ या चालू मालिकेकडे एक प्रयोग म्हणूनच बघत होते. त्याच अनुषंगाने भारताने प्रत्येक सामन्यात वेगवेगळे प्रयोग केले. त्याचं नुकसान दोन पराभवांच्या रूपात भारताला झालेही. परंतु काही फायदेही भारताला या मालिकेतून झालेले दिसले. त्याच सकारात्मक फायदयांवर आज आपण चर्चा करणार आहोत.
अनुभवी सलामीवीर शिखर धवन व के.एल राहुल या मालिकेत सपशेल फेल गेले. राहुलला खेळात सुधारणा करण्याच्या भरपूर संधी मिळाल्या परंतु त्याचं चिज करणं त्याला जमलं नाही. तर या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळालेल्या ईशान किशन व सुर्यकुमार यादवने दोन्ही हातांनी संधीचे स्वागत करून आपल्या विश्वसनिय व धडाकेबाज खेळाने स्वतःचे तसेच भारताचे भविष्य उज्वल असल्याचे शुभ संकेत दिले.
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात या दोघांनीही पदार्पण केले. परंतु फलंदाजी करण्याची संधी फक्त ईशान किशनला मिळाली. त्याने एक झंझावाती अर्धशतक ठोकून आपलं अस्तित्व सिद्ध केलं. दुर्देवाने त्याची ग्रोईन इंज्यूरी फोफावल्याने त्याला संघाबाहेर बसावे लागले.
दुसऱ्या सामन्याद्वारे पदार्पण केलेल्या सुर्यकुमारला तिसऱ्या सामन्यात संघाची गरज म्हणून वगळण्यात आले. परंतु चौथ्या सामन्यात त्याला संधी मिळताच एक वादळी खेळी त्याने केली. त्याचबरोबर तोच जोश त्याने दुसऱ्या सामन्यात दाखविल्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात त्याची वाहवा केली जात आहे.
पाठीच्या ऑपरेशन नंतर संघात आलेल्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही आपली उपयुक्तता सिध्द केली व भविष्यात भारतासाठी अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी त्याने तयार असल्याचे दाखवून दिले.
गोलंदाजीची अदभूत कला लाभलेला भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळला. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. अंतिम सामन्यात खेळपट्टी फलंदाजांना साथ देत असताना त्याने आपला २४ चेंडू ( ४ षटके ) च्या कोट्यातील १७ चेंडू निर्धाव टाकत केवळ १६ धावा देत मोक्याच्या क्षणी २ महत्वाचे बळी घेऊन भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.
गाबा कसोटीत ६७ धावांची झुंजार खेळी व ७ बळी घेऊन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शार्दूल ठाकूरला त्याच्या कारकिर्दीत एक संपूर्ण टि-२० मालिका खेळण्याची संधी प्रथमच मिळाली. त्या संधीचे त्याने खऱ्या अर्थाने सोने केले. दोन्ही संघात एका पेक्षा एक श्रेष्ठ गोलंदाज असताना सर्वाधिक आठ बळी त्यानेच मिळविले. विशेष म्हणजे शेवटच्या दोन सामन्यात इंग्लंड वरचढ ठरू पाहत असताना निर्णायक क्षणी एका षटकात २ बळी दोनदा घेण्याचा पराक्रम शार्दूलने केल्याने भारताचा विजय सोपा झाला.
शिवाय अंतिम सामन्यात भारताने रोहीत व कोहली ही नवी सलामी जोडी खेळवली. दोघांनीही आपल्या गुणवत्तेचा व अनुभवाचा फायदा संघाला करून देत जोरदार सलामी दिली व भेडसावू पाहणाऱ्या सलामी जोडीच्या प्रश्नाला चांगल्या पैकी उत्तर शोधून दिलं.
या मालिकेतही पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताने जोरदार पलटवार करत मालिका जिंकली. भारताने ही सलग सहावी टि २० मालिका जिंकली असून आगामी टि २० विश्वचषकाच्या दृष्टीने आपली तयारी योग्य दिशेने चालल्याचे दाखवून दिले.
भारतीय संघाला भविष्यात आपल्या यशाचा आलेख उंच करायचा असेल तर खेळात सातत्य व संघात एकजिनसीपणा राखणं गरजेचं आहे. खास करून कर्णधार कोहलीने आपला इगो बाजूला ठेऊन सामन्याच्या परिस्थितीनुरूप संघ निवड केली व प्रत्येक खेळाडूला योग्य न्याय दिला तर भारत आगामी विश्वचषकच नव्हे तर क्रिकेटची कोणतीही स्पर्धा कोणत्याही संघाला कुठेही हरवून जिंकू शकतो. मग भले नाणेफेकीचा निकाल काही लागलेला असो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

