भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सध्या पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर सुरू असून या तिन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ६६ धावांनी जिंकला. भारताचा हा विजय कागदोपत्री मोठा व सरळ दिसत असला तरी भारताला यासाठी खूप कष्ट उपसावे लागले. रोहीत शर्मा व श्रेयस अय्यर हे भारताचे बिनीचे फलंदाज जखमी झाले आहेत. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय खेळाडूंचे जखमी होण्याचे प्रमाण काही होताना दिसत नाहीत.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन फॉर्ममध्ये परतल्याने संघाची चिंता कमी होतेय असे वाटत असताना दुसरा सलामीवीर रोहीत शर्मा जखमी झाल्याने काळजीचे कारण तसेच राहीले आहे. या सामन्यात रोहीत खेळला नाही तर त्याला पर्याय शोधावा लागेल. शिवाय श्रेयस अय्यर पुढील सर्वच सामन्यांना मुकणार असल्याने त्याच्या जागेवर फॉर्मात असलेला सुर्यकुमार यादव संघात येईल व तो वनडे सामन्यात पदार्पण करेल.
इंग्लंड विरूध्द खेळलेल्या दोन टि २० सामन्यात सुर्यकुमार यादवने नेत्रदिपक खेळ केला होता, शिवाय त्याची फलंदाजी विश्वसनीय असल्याने तो संघात येण्याचा पूर्ण हक्कदारही आहे. खरं बघितलं तर पहिल्या वनडेतच त्याला संधी मिळेल असे वाटत होते. परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. दुर्देवाने श्रेयस अय्यर जखमी झाला व यादव त्या जागेचा वारसदार बनला. आपल्याला आठवत असेलच दुसऱ्या टि२० सामन्यात त्याने पदार्पण केले होते परंतु एकही चेंडू न खेळवताच त्याला तिसऱ्या सामन्यातून वगळले होते. परंतु चौथ्या सामन्यापूर्वी ईशान किशन तंदुरुस्त नसल्याने त्याला संधी मिळाली व त्याने तिचे सोने करताना ५७ धावांची धुवाँधार खेळी केली व पाचव्या सामन्यातही बाद होण्यापूर्वी अवघ्या १६ चेंडूत ३२ धावा ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे दोन्ही वेळा तो दुर्देवीरित्या झेलबाद झाला होता. सुर्यकुमार यादवने संधी मिळाल्यानंतर मागील सामन्यातील खेळ असाच ठेवला तर तो वनडेच्या पदार्पणातच शतकी डाव खेळू शकेल. जर त्याने शतक ठोकलं तर भारताकडून एकदिवसीय पदार्पण करणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. आतापर्यंत भारताकडून वनडे पदार्पणात शतक ठोकण्याचा पराक्रम केवळ के.एल. राहुलनेच केला आहे.
कर्णधार कोहली फॉर्मात आला असल्याने त्याच्या फॉर्मची चिंता काहीसी दूर झाली आहे. शिवाय केएल राहुल मागच्या अपयशाच्या चक्रातून बाहेर निघाल्याचे त्याच्या पहिल्या सामन्यातील नाबाद ६२ धावांच्या खेळीतून जाणवले. नवोदित कृणाल पांडयाकडून पहिल्या सामन्यासारख्याच कामगिरीची अपेक्षा असेल, मात्र त्याला गोलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
हार्दिक पांड्या टि-२० मालिकेत व पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत अपयशी ठरल्याने त्यालाही खेळात सुधार करावाच लागेल. शिवाय तो नियमीतपणे गोलंदाजी करत नाही. हि काहीशी कर्णधार कोहलीची चिंता वाढवणारी बाब आहे.
फिरकी गोलंदाज कुलदिप यादवला बऱ्याच दिवसांनी मागच्या सामन्यात संधी मिळाली परंतु इंग्लिश फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर आरामात फटकेबाजी केली. त्यामुळे त्याला कदाचित दुसऱ्या सामन्यातून वगळले जाऊ शकते. परंतु मला वाटते त्याला आत्मविश्वास येण्यासाठी केएल राहुल, रिषभ पंतसारखी संधी देणे गरजेचे आहे. कुलदिप ऐवजी यजुवेंद्र चहल संघात येईल परंतु कुलदिप यादव सारखा गुणवान खेळाडू निराशेच्या गर्तेत जाऊ शकतो. त्यामुळे कुलदिपला एका संधीची नितांत गरज आहे.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, व पदार्पणातच शानदार कामगिरी करणारा प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात खेळताना पुन्हा दिसतील. पण रोहीत शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर त्याच्या ऐवजी रिषभ पंत निव्वळ फलंदाज म्हणूनही खेळू शकेल आणि के एल राहुल धवन सोबत सलामीला दिसेल. शिवाय भारताच्या सर्वच गोलंदाजांना सुरुवातीपासून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून इंग्लिश फलंदाजांना लगाम घालावा लागेल. कारण मागच्या वेळी इंग्लिश फलंदाजांनी सामना हातात असताना जी हाराकिरी केली तशी पुन्हा होईल याची कोणतीही शक्यता नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

