प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी :-
केज पासून जवळच असणाऱ्या युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानेगाव येथे एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह घराच्या बाजूला आढळून आल्याने खळबळ माजली आहे. तिचा दगडाने ठेचून खून केला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.२५ मार्च गुरुवार रोजी जानेगाव ता. केज येथील अनिल चटप यांचे कुटुंब गावच्या बाजूला शेतात वास्तव्यास आहे.
दरम्यान गुरुवारी ( दि .25 ) रोजी रात्री ८:०० वा. च्या दरम्यान आशा अनिल चटप ही महिला घरी एकटीच होती. तिचे पती अनिल चटप हे दूध घालण्यासाठी गावात गेले होते. परंतु ते जेंव्हा घरी आले तेंव्हा पत्नी घरात दिसून न आल्याने त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला असता घरापासून जवळच आशा यांचा मृतदेह आढळून आला. शरीरावर दगडाने ठेचल्याच्या खुणा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून नेमका प्रकार काय घडला हे स्पष्ट झाले नसून युसुफ वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

