भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी दाखल करण्याची सरकारने परवानगी द्यावी :- *माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांची मागणी.
इंदापूर .प्रतिनिधी:-( दि.२५ )इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता तसेच लातूर विभागाचे विभागीय समाज कल्याण अधिकारी श्री.राठोड यांचे विरोधात सी.आर.पी. सी.197 अन्वये न्यायालयात फौजदारी दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे (दि.२५) इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार लातूर विभागाचे विभागीय समाज कल्याण अधिकारी राठोड यांना वि.जा.भ.ज. मार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांची सखोल तपासणी करण्याबाबत आदेश दिले होते, त्यावरून आश्रमशाळांच्या तपासण्या करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील माझ्या प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची तपासणी श्री.राठोड यांनी केली. या तिन्ही विभागाची तपासणी फक्त ५ ते ७ मिनिटात करून राठोड निघून गेले. चांगला शेरा देण्यासाठी पैशांची मागणी तपासी अधिकारी राठोड यांनी माझ्याकडे केली.परंतु मी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने राठोड यांनी जाणून बुजून माझे तिन्ही विभाग क आणि ड श्रेणीत टाकले.असे मखरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
श्रेणी बाबत माझ्या संस्थेला, शाळेला लेखी नोटिसा काढून विचारणा केल्यानंतर आम्ही त्यासंदर्भात सबंधिताना सर्व कागदपत्राच्या पुराव्यासह उत्तर दिले आहे. प्रत्यक्ष पुन्हा पाहणी करणे विषयी सविस्तर कळवले होते. परंतु इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे कोणीही अधिकारी पाहणी / तपासणी करण्यासाठी आले नाही. असे मखरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी माझ्या संस्थेच्या आश्रमशाळांना २ वेळा भेटी दिल्या आणि त्यांनी स्वतः शाळेची भव्य इमारत पाहून,विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, शालेय परिसर,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहून भरणे यांनी समाधान व्यक्त केले. कौतुक केले.
राज्यात ज्या ठिकाणी आश्रमशाळा बोगस आहे,जेथे आश्रमशाळा अस्तित्वात नाही, विद्यार्थी नाही, अशा आश्रमशाळा सरकारने जरूर बंद कराव्यात. परंतु ज्या ठिकाणी आश्रमशाळा अस्तित्वात आहेत, शाळेला इमारती आहेत,त्यात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विद्यार्थी निवासाला आहेत.तेथे सर्व सुखसोयी उपलब्ध आहे, अशा आश्रमशाळांना अभय देण्याची गरज असताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी.गुप्ता व लातूरचे विभागाचे विभागीय समाज कल्याण अधिकारी राठोड हे संस्थाचालकांकडून पैसा मिळावा म्हणून जाणीवपूर्वक त्रास देत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी प्रधान सचिव गुप्ता व राठोड ह्या निर्ढावलेल्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आपल्या निवेदनात मखरे यांनी केली आहे.
प्रधान सचिव जे.पी गुप्ता आणि तपासी अधिकारी राठोड हे पैशासाठी संस्थाचालकांना ब्लॅकमेल करत असून सरकारची बदनामी करत आहे. ह्या दोघांनी संगनमताने पैसे काढण्याच्या उद्देशाने खोटे कागदपत्र, तपासणी अहवाल,रिपोर्ट,इ. खोटे बनवले आहे. माझ्या आश्रमशाळांना क आणि ड श्रेणीत ढकलले आहे. जे.पी गुप्ता हे तपासी अधिकारी श्री.राठोड यांना पाठीशी घालत आहे. जे.पी गुप्ता यांना वस्तुस्थिती कळूनही जाणीवपूर्वक सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता आणि तपासी अधिकारी राठोड यांच्या विरोधात सी.आर.पी.सी 197 खाली न्यायालयांमध्ये फौजदारी खटला दाखल करण्याची परवानगी मला मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मखरे यांनी केली आहे .

