सावळीविहीर(प्रतिनिधी): लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांंचा उद्रेक झाला होता. जिल्ह्यातील आमदार रोहित पवार तसेच सत्यजीत तांबे तसेच राज्यातील इतर युवक नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली होती.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी या सर्व गोष्टींचा विचार करून शब्द दिल्याप्रमाणे आज शुक्रवारी MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे, 21 मार्चला ही परीक्षा होणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितलं होतं. मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. शुक्रवारी ही तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल.
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज शुक्रवारी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यासह राहाता तालुक्यातही अनेक विद्यार्थी या एमपीएससी परीक्षेसाठी बसले असून त्यांनी पूर्ण अभ्यास केला आहे. मात्र अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा संताप आला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन ही एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला होणार आहे, एमपीएससीने आता तसे जाहीर केले आहे, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे की, 27 मार्च रोजी होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तसेच 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा निश्चित दिनांकालाच घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचेही म्हटले आहे.

