प्लाझ्मा दान लोकचळवळ व्हावी - हर्षवर्धन पाटील
इंदापूर: प्रतिनिधी (दि.२८/४/२१)
कोरोना रुग्णांच्या गंभीर अवस्थेवरील उपचारांसाठी सध्या प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. सध्या रुग्णासाठी प्लाझ्माचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना जीवदान देणारी प्लाझ्मा दान ही लोकचळवळ व्हावी, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
प्लाझ्मा दान करून गंभीर कोरोना रुग्णांचा जीव वाचवलेल्या दिलीप दीक्षित व अमर निलाखे यांनी बुधवारी (दि.२८) हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी वरील आवाहन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या दोघांचे कौतुक केले.
कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे त्या व्यक्तीच्या शरीरात २८ दिवसात विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज रक्तातल्या प्लाझ्मा मध्ये असतात. एका प्लाझ्मा दानाने दोन कोरोना रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. प्लाझ्मा दान केल्याने कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे भीती न बाळगता प्लास्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे,असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
दरम्यान, दि. १ मे पासून वय १८ वर्षावरील युवकांसाठी केंद्र सरकारच्या वतीने मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. लसीकरण केल्यानंतर ६० दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरण कालावधीत रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने युवकांनी तत्पूर्वी रक्तदान करावे, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.

