shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची अक्षरशः लूट..!


देवळाली प्रवरा - २४ एप्रिल
काही खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची सध्या अक्षरशः लूट सुरू असल्याचा अनुभव येथील कोरोना रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना सध्या येत आहे. 


पेशंट एकदा रुग्णवाहिकेत घातला की मन मानेल ते भाडे आकारले जात असून ते वसूल केल्या शिवाय ही मंडळी रुग्णाला  सोडत नसल्याचा दुर्दैवी अनुभव देवळाली प्रवरा येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना रुग्णाचे आई वडिलांना आला आहे. 

सोसिएल मीडियाच्या मदतीने मिळाला व्हेंटिलेटर बेड* ही बातमी आपण नुकतीच वाचली असेल. त्या बातमीतील देवळाली प्रवरा येथील त्या २३ स्कोर व ६५ ऑक्सिजन असलेल्या पेशंटला औरंगाबाद येथे पोहच करण्यासाठी त्या रुग्णाच्या आई वडीलांनी एक रुग्णवाहिका (मारुती ओम्नी) बोलावली व पेशंटला देवळाली प्रवरा येथून औरंगाबाद (१०० की.मी. अंतर)  येथे हलविले.

औरंगाबादला निघणेपूर्वी जवळ काही रक्कम असावी म्हणून त्या पेशंट च्या आई वडिलांनी नातेवाईकांकडून पन्नास हजार रुपये हात उसने घेतले व ते त्या पेशंट सोबत औरंगाबादला गेले. 

औरंगाबाद येथील रुग्णालयासमोर रुग्णवाहिका उभी केल्याबरोबर रुग्ण खाली उतरवण्या अगोदरच रुग्णवाहिका चालकाने त्या रुग्णाच्या आई वडिलांकडे चौदा हजार रुपये भाडे मागितले. हे ऐकून त्या रुग्णाच्या वडिलांना चक्करच आली. तरी त्यांनी मुलाला  हॉस्पिटलमध्ये दाखल करून भाडे देतो अशी विनवणी करून सुद्धा त्या रुग्णवाहिका चालकाने रुग्णाचे देखत त्याच्या वडिलांसोबत भाड्या साठी  हुज्जत घातली.

पेशंट अत्यंत क्रिटिकल अवस्थेत असतांना सुद्धा त्या रुग्णवाहिकाच्या चालकाने रुग्णाला गाडीतून खाली घेण्यासाठी मदतही केली नाही. ते आमचे काम नाही असे उर्मट उत्तर देऊन नाही हो करता करता दहा हजार रुपये रुग्णाच्या वडिलांकडून घेतले व माझा चार हजार रुपयांचा तोटा झाला अशी निर्लज्जपणाची भाषा वापरून तिथून निघून गेला. 

म्हणजे तुमचा पेशंट जगो की मरो यांना त्याचे काही एक देने घेणे नाही. यांना यांचा नफा महत्वाचा झाला आहे. त्या आई वडिलांना ही धास्ती पडली असेल की उसन्या घेतलेल्या पन्नास हजार रुपयांमधून चौदा हजार भाडेच द्यावे लागले तर उर्वरित उपचार कसे करावे या चिंतेने त्यांना ग्रासले असणार हे त्या नफेखोर चालकाला काय समजणार. त्याला केवळ त्याचा नफा तोटा दिसत होता. 

 मला स्वतःला सुद्धा या अनुभवातून जावे लागले आहे. श्रीरामपूर ते संगमनेर (अंतर अंदाजे ५० की.मी.) या अंतराचे रुग्णवाहिका भाडे चार हजार रुपये मला द्यावे लागले आहे. शिवाय ही मंडळी बिलही देत नाहीत ते वेगळेच. त्या काळात पेशंट आणि नातेवाईक टेन्शन मध्ये असल्याने या गोष्टीकडे लक्ष जात नाही. परंतु यांच्या अश्या लुटमारीच्या प्रवृत्तीमुळे पेशंट आणि नातेवाईक यांचा रक्तदाब वाढतो हे नक्की.

त्यासाठी दानशूर मंडळींनी समोर येऊन प्रत्येक गावात अल्प दरात रुग्णवाहिका सेवा सुरू करणे आवश्यक आहे त्याशिवाय कोरोना रुग्णांची काही खाजगी  रुग्णवाहिका धारकांकडून सुरू असलेली ही लूटमार थांबणार नाही. 🙏
- आप्पासाहेब ढुस, 
  देवळाली प्रवरा
close