shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेन्नई सुपर किंंग्जला यावेळीही सोपे काम नसणार.



                  सन २०२० हे वर्ष कोरोना बाधीत व्यक्तींपेक्षा भयंकर जर ते कोणाला गेले असेल ते चेन्नई सुपर किंग्जला. सन २००८ पासून सन २०१५ पर्यंत सीएसकेचा संघ आयपीएलमध्ये नियमीत खेळत होता. परंतु सीएसकेचा सीईओ व चेन्नई सुपर किंग्जचे सर्वेसर्वा व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मैय्यपन मॅच फिक्सींग प्रकरणात अडकल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला शिक्षेखातर दोन वर्षांसाठी आयपीएलमधून निलंबीत करण्यात आले होते. सन २०१६ व सन २०१७ हे दोन वर्ष त्यांच्या बंदिवासाचा काळ होता. हा वाईट कालखंड सोडला तर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये आपला वेगळाच वचक निर्माण केला होता. विशेष म्हणजे सन २०१८ च्या सत्रात पुनरागमन करताना त्यांनी विजेतेपद मिळविले होते.

                 डॉ.दत्ता विघावे

                       आतापर्यंतच्या तेरापैकी ११ सत्रात खेळताना सीएसकेने १० वेळा प्लेऑफ फेरी गाठली असून  ८ वेळा अंतिम सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांनी विजेतेपद मिळविले व पाच वेळा उपविजेतेपदावर समाधान मानले. सन २०२० या वर्षी त्यांना कोरोना बरोबरच महत्वाच्या खेळाडूंच्या गैरहजेरीने चांगलंच सतावलं. त्यामुळे खरोखरच आयपीएलचा राजा असलेला हा संघ या स्पर्धेची प्लेऑफ फेरी गाठण्यात पहिल्यांदाच अपयशी ठरला. यंदा मागील सर्व दु:ख बाजूला ठेऊन सीएसकेचा संघ या स्पर्धेत नव्याने उभा राहाणार आहे.
                        सन २००८ पासून चेन्नईचे नेतृत्व एमएस धोनी करत असून त्याच्या सुपिक डोक्यातून अनेक  कल्पक योजना बाहेर येत असतात. धोनीचा शांत व संयमी स्वभाव त्याच्या नेतृत्वगुणांना वेगळीच झळाळी देऊन जातो. धोनीचे प्रेरणादायी नेतृत्व हीच चेन्नईची जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असल्याने त्याला आता चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या जडणघडणी कडे लक्ष द्यायला पूर्ण वेळ मिळत असल्याने त्याने पुन्हा एकदा संघाची जोरदार पुनर्बांधनी केली आहे.
                   चेन्नई सुपर किंग्जची जमेची बाजू म्हणजे त्यांच्याकडे असलेला अनुभवी खेळाडूंचा भरणा हे होय. मागच्या सत्रात वैयक्तीक कारणास्तव न खेळलेला सुरेश रैना संघात परतल्याने सीएसकेला मजबूती प्राप्त झाली आहे. रैना व्यतिरिक्त फाफ ड्यू फ्लेसिस, स्वतः महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, सॅम करन, मोईन अली व ऋतूराज गायकवाड यांच्या उपस्थितीमुळे चेन्नईची फलंदाजी भक्कम वाटत आहे.
                    चेन्नईची गोलंदाजांची फळीही चांगली असून वेगवान गोलंदाजात दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एंगीडी, इंग्लंडचा सॅम करन, सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेला भारताचा शार्दूल ठाकूर व दिपक चहर तर फिरकी गोलंदाजात ऑस्ट्रेलियात दौऱ्यात जखमी झालेला रविंद्र जडेजा दुखापतीतून सावरून परतला आहे. तर अनुभवी द. आफ्रिकन गोलंदाज इमरान ताहीर फिरकीचा भार वाहण्यास सक्षम आहेत.
                     चेन्नई सुपर किंग्ज संघात वयस्कर खेळाडूंचा मोठा भरणा असून टि-२० सारख्या वेगवान खेळात ती त्यांची कमजोरीसुध्दा सिध्द होऊ शकते.एमएस धोनी, सुरेश रैना, अंबाती रायडू, इमरान ताहीर व फाफ ड्यू फ्लेसिस हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले असून ते देशांतर्गत स्पर्धातही खेळत नाहीत. त्यामुळे त्यांना मॅच प्रॅक्टीस मिळत नाही. शिवाय धोनी पहिल्या सारखी मॅच फिनिशरची भूमिका योग्य प्रकारे पार पाडू न शकल्याने संघाला मोठे नुकसान मागच्या स्पर्धेत झाले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड याने ऐनवेळी संघातून माघार घेतल्याने सीएसकेला मोठा झटका बसला आहे. त्याच बरोबर दुखापतीनंतर ३ महिन्याने सक्रिय क्रिकेटमध्ये परत येत असलेला रविंद्र जडेजा किती लवकर आपली जुनी लय पकडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विंडीजचा ड्वेन ब्राव्हो हा सुद्धा दुखापतीनंतर संघात थेट सामील होत असल्याने त्याच्या कामगिरीबाबतही सांशकता निर्माण होते.
                             यापूर्वी भारतात झालेल्या आयपीएल स्पर्धात प्रत्येक संघाला त्याच्या होम ग्राऊंडवर निम्मे लिग सामने खेळायला मिळायचे, त्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीच्या खेळपट्टया बनविता येत होत्या. यंदा मात्र कोरोना संक्रमणामुळे सामन्याच्या स्थळांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला तटस्थ ठिकाणीच आपले सर्व सामने खेळावे लागणार आहे. चेन्नईचे एम.ए चिदंबरम स्टेडीयम फिरकीला साथ देत असल्याने चेन्नई सुपर किंग्जचे आजवर फिरकी गोलंदाजीच प्रमुख अस्त्र होते. परंतु आता त्यांना त्यांच्या ध्येयधोरणात बदल करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वेगवान गोलंदाजीकडेही बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे.
                      सीएसकेला मागच्या सत्रात त्यांच्या कमजोर फलंदाजीने दगा दिला होता. त्यामुळे त्यांना या वर्षी जर विजेतेपद मिळवायचे असेल तर त्यांना फलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागेल. शिवाय गोलंदाजांनाही आपली कामगिरी उंचवावी लागेल. शिवाय क्षेत्ररक्षण देखील त्यांना सुधारावे लागेल. या सर्व बाबी जर त्यांनी साधल्या तर विजेतेपद पुन्हा एकदा त्यांच्या झोळीत पडू शकेल.
                      सीएसकेचा संघ या खेळाडूंमधून निवडला जाईल. महेंद्र सिंह धोनी (कप्तान), सुरेश रैना, अंबाती रायुडु, के एम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदिशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड़, शार्दुल ठाकुर, सॅम करन, आर साई किशोर मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरि निशांत.
close