शिर्डी । प्रतिनिधी :-
4 मे रोजी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकलेले तीन महिन्याचे पगार येत्या दोन ते तीन दिवसात करणार असल्याचं आश्वासन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दिलं होतं. परंतु या घटनेला पंधरा दिवस होत आले असून,अजूनही शिर्डी शहराची अत्यंत प्रामाणिकपणे स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचा आणि घाम गाळून केलेल्या मेहनतीचा पगार दिला गेलेला नाही.
याचा महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्याचबरोबर येत्या गुरुवारपर्यंत जर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकविले संपूर्ण वेतन अदा केले नाही तर शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री काकासाहेब डोईफोडे यांच्या दालनात कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत महाविकास आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आय शिर्डी शहर.

