प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई - ता.नेवासा येथील हनुमानवाडी परिसरातील शनि चौक येथे भर दिवसा युवकावर जुन्या वादाच्या कारणावरुन लाकडी दांडके तलवार, चाकू व कु-हाडीने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. या मारहाण प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका आरोपीस अटकही करण्यात आली आहे.
जुन्या वादाचा बदला म्हणून सागर रामचंद्र कुसळकर
(राहणार-हनुमानवाडी शिवार) या युवकावर तलवार, चाकू,कु-हाड व लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली आहे.या मारहाणीत कुसळकर यांच्या हातावर व पायावर खोलवर जखमा झाल्या आहेत.
कुसळकर यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन गुन्हा रजिस्टर नंबर १३६/२१ भा.द.वि.३०७,३२६,३२४,(४)२५ नुसार अमोल राजेंद्र शेजवळ,राहुल चांगदेव शिंदे,अमोल अशोक गडाख (सर्व राहणार-सोनई)अक्षय रामदास चेमटे (राहणार-घोडेगाव)या चार आरोपींवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल शिंदे यास अटक करण्यात आली असून अन्य आरोपी इतर गुन्ह्यात असल्याने अटक झालेली नाही.सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात सोनई हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत
सोनई पोलिसांनी प्राणघातक हल्ला घडल्यानंतर जाणीवपूर्वक उशिरा गुन्हा दाखल केला.या घटनेत आरोपत्रात प्रत्यक्ष नावे आलेल्या आरोपी पेक्षा घटनेत अधिक आरोपी असून सुद्धा रात्रीतून आपोआप काही आरोपींची नावे अर्थपूर्ण तडजोडीतून तपासी अधिकारी,ठाणे अंमलदार यांनी कमी केल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आरोपींची नावे संगनमताने पोलिसांनी व तपासी अधिकारी यांनी अर्थपूर्ण तडजोडीतून वगळले असल्याचे उघड बोलले जात आहे.
सध्या सोनई पोलीस स्टेशन परिसरात अवैध धंदे सुरू असताना त्यावर कारवाई करण्यासाठी कल्पना देऊन, विनंती करूनही कारवाई होत नाही परंतु एखादा गुन्हा घडला की त्यातून आरोपींना धाक दाखवुन काही नावे व कलम कमी करून मोठं मोठाल्या आर्थिक सेटलमेंट करून कायदा सुव्यवस्थेचे धिंडदवडे पोलीस प्रशासनकडूनच काढले जात आहेत ही चिंतेची बाब आहे घडलेला गंभीर स्वरूपाचा गुन्हा जाणीवपूर्वक उशिरा नोंदवुन व अर्थपूर्ण तडजोडीतून आरोपींचे नावे काढून त्यांना अभय देण्याच्या वृत्तीमुळे सोनई परीसरात जर एखादा अनुचित प्रकार घडला तर त्यास सर्वस्वी जबाबदार सोनई पोलीस स्टेशन व पोलीस राहतील. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत.सर्व सामान्य नागरिकांना अडवणुकीची भूमिका घेणाऱ्या व गुन्हेगार धार्जिण्या भूमिका घेणाऱ्या सोनई पोलीस व या गुन्ह्यात संशयास्पद भूमिका घेणाऱ्या कायमच वादग्रस्त असणाऱ्या तपासी अधिकारी,ठाणे अंमलदार यांचेवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अर्थपूर्ण तडजोडीतून जर आरोपींची नावे फिर्यादीतुन कमी करून गुन्हेगारास अभय देण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून व तपासी अधिकारी,ठाणे अंमलदार यांचेकडून होत असेल व रक्षकच जर भक्षक बनत असतील तर सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे.यापूर्वीही सोनई पोलीस स्टेशनच्या अधिकारी व पोलिस यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना दिला जाणारा त्रास याविषयी तक्रारी वरिष्ठांना करण्यात आल्या आहेत परंतु त्यावर कार्यवाही नाही यावेळेस तरी कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सोनई पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या गुन्ह्यांची पोलीस दरबारी नोंद झाल्यानंतर सदर माहिती वृत्तपत्र प्रतिनिधी यांना दिली जात नाही गुन्ह्यांची नोंद झालेल्या गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्र प्रतिनिधिंना न देण्यामागे व दिरंगाई करण्यामागे पोलीस प्रशासनाचे काय गौडबंगाल आहे हा प्रश्न अनुत्तरीतच आहे ?

