shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे आज दिल्लीत निधन झाले.…! जगमोहन यांचा अल्पपरिचय..!


जन्म. २५ सप्टेंबर १९२७ जगमोहन मल्होत्रा हे त्यांचे पूर्ण नाव. पण राजकीय जगतात ते जगमोहन या नावानेच ओळखले गेले.  

स्वातंत्र्योत्तर काळात भारताने जे सर्वोच्च प्रतीचे सनदी अधिकारी दिले. त्यात जगमोहन यांचा नक्कीच समावेश होईल.जगमोहन यांनी 1996 साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी नगरविकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सांभाळली होती. दिल्लीचे ते सर्वात तरुण उपराज्यपाल होते आणि दोन मुदती या पदावर राहिलेले ते एकमेव राज्यपाल आहेत.

दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून आपल्या दुसऱ्या कारकिर्दीत त्यांनी एशियाड, चोगम (CHOGM) आणि अलिप्त राष्ट्रपरिषद या कार्यक्रमांचे स्पृहणीय आणि यशस्वी आयोजन केलं. तत्पूर्वी, त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर अलौकिक कामगिरी बजावली. त्यात दिल्ली विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्याधिकारी हे पद उल्लेखनीय. या पदावर ते सात वर्ष होते. नंतर ते गोवा, दीव आणि दमणचे उपराज्यपाल राहिले. भारत सरकारने त्यांचा पद्मपुरस्कारांनी दोनदा गौरव केला होता. एकाच व्यक्तींचा दोनदा असा गौरव होणं, हा एक दुर्लभ सन्मान आहे.

'दिल्लीची महाविकास योजना तयार करुन ती अमलात आणल्याबद्दल आणि इतर योजनांची आखणी उभारणी व अंमलबजावणी फार उत्तम केल्याबद्दल आधी त्यांना 'पद्मश्री' हा किताब देण्यात आला. 'देशासाठी अद्वितीय अशी गुणसंपन्न सेवा बजावल्याबद्दल त्यांना २०१६ मध्ये 'पद्मविभूषण' देऊनही गौरविण्यात आलं होते. १९७५ मध्ये श्री. जगमोहन यांना ऑस्ट्रेलिया सरकारनं सांस्कृतिक पुरस्कारही दिला. 

सहाव्या दशकाच्या मध्यात त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (नवी दिल्ली) या संस्थेने एक फेलोशिप दिली. तिच्या अंतर्गत त्यांनी जगभर प्रवास केला. 'मानवी वसाहती' आणि 'हॅबिटाट' या संयुक्त राष्ट्रांच्या दोन परिषदांना अनुक्रमे तेहरान आणि व्हॅन्कुवर इथं ते भारताच्या वतीने हजर होते. जगमोहन यांनी विविध प्रमुख नियतकालिकं व वृत्तपत्रातून ७०० वर लेख लिहिले आहेत. त्यांची 'बिल्डिंग शहाजहानाबाद', 'द वॉल्ड सिटी ऑफ देहली', 'आयलंड ऑफ ट्रुथ', 'द चॅलेंज ऑफ अवर सिटीज', 'सोल अॅण्ड स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नस इन इंडिया', 'शेपिंग इंडियाज न्यू डेस्टिनी’, ‘रिफॉर्मिंग वैष्णोदेवी ...... पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. ' इत्यादी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
त्यांनी १९८४ ते १९८९ आणि जानेवारी ते मे १९९० अशा दोनवेळेला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भुषविले होते. त्या वेळी त्यांनी 'माता वैष्णोदेवी मंदिर प्रतिष्ठानात' ऐतिहासिक सुधारणाही घडवून आणल्या.

या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त होती. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या टीकेनंतर जगमोहन यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावरून हटवण्यात आले होते.
जगमोहन यांनी 'My Frozen Turbulence in Kashmir' हे  इंग्रजी पुस्तक पण लिहिले असून यात ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर केले आहे. याचा 'काश्मीर धुमसते बर्फ'  या नावाने मराठी अनुवाद मो. ग. तपस्वी व सुधीर जोगळेकर यांनी केला आहे.
जगमोहन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

माहिती संकलन:-
अनिल पोवार ( पत्रकार )
close