साहित्याच्या मुकूटामधला,
मणीच निखळून गेला...
असंख्य चहाते कोंदण ज्यांचे
हिराच तो निखळला...!!१!!
शब्दांचे भांडारची सारे
उधळोनीया गेले..
साहित्याचे विश्व कसे हो
रीते आज झाले..!!२!!
शब्दप्रभूने कशी आज हो
हुलकावणी दिधली...
ज्योतीरामचा निरोप ऐकूनी
हृदये आक्रंदिली...!!३!!
मनामनाला सदैव ज्यांनी
साहित्यिक केले...
राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूनी
संघटीत केले...!!४!!
नाट्य-काव्य आणि प्रबोधनात्मक
रचना अगणित केल्या..
नवोदितांना देऊन स्फूर्ती
संस्थाही जगविल्या...!!५!!
देवाघरी तुम्ही ज्योतिराम हो
लवकर का गेला?...
संस्कृती आणि साहित्याचा
रंगच पुसोनी गेला...!!६!!
आठवणीतून, कर्तृत्वातून
दिगंत आपली कीर्ती...
राष्ट्रहितास्तव जगला आपण,
पावन केली धरती...!!७!!
मुक्यामनाची, हृदयापासून
श्रद्धांजली अर्पितो...
ज्योतिराम आम्ही सारे आपुल्या,
चरणी लीन होतो...!!८!!
आमचे मार्गदर्शक, लेखक, कवी, नाट्य दिग्दर्शक, गायक, सर्वांना हवेहवेसे वाटणारे, महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य स्व.ज्योतिराम कदम नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले.
या अत्यंत दु:खद घटनेने आम्हा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, अपेक्षा मासिक परिवार, सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान, पर्वती नागरी कृती समितीचा आधारवाडच हरपलाय.
राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या तीन संमेलनात ज्योतिराम कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहभाग इतका प्रभावी लाभला की ज्योतिराम कदम आमच्या हृदयसिंहासनाचे स्वामी कधी झाले ते कळलेच नाही. त्यांच्या निधनाने राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाची चळवळ पोरकी झालेली आहे.
आम्हा सर्व राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या कार्यकर्त्यांकडून स्व.ज्योतिराम कदम यांना विनम्र श्रद्धांजली.
चंद्रकांत शहासने, ह.भ.प. रंगनाथजी नाईकडे, सौ.ऊर्मिलाताई कराड, डॉ.शरदश्चंद्र दराडे पाटील, डॉ.जयश्री तोडकर, दत्तात्रेय ऊभे, चंद्रशेखर कोरडे. पुणे.

