shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अंधश्रद्धेची किनार...!



                       
आजचं युग म्हणजे पूर्णपणे विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. जीवनाच्या प्नत्येक क्षेत्रात आपल्याला विज्ञानाच्या अविष्काराचाच अनुभव येतो. झोपेतून उठल्यापासून प्रत्येक गोष्ट आपण विज्ञानाच्या साह्याने निर्मित केलेलीच वापरतो. त्यामुळे विज्ञानाचा आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव आहे. इतकेच नाही तर आज आपण ज्या क्रिकेट विषयावर चर्चा करत आहोत यामध्ये प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीनेच बनविली जाते. त्यामुळे विज्ञानाचा प्रत्येक बाबीवर फार मोठा प्रभाव आहे.

क्रिकेट हा खेळ विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या मदतीने अद्यावत केला असला तरी यामध्ये खेळणारे काही खेळाडू, पंच व इतकेच नव्हे तर क्रिकेटचे खरेखुरे मायबाप असलेले प्रेक्षकही काहीसे अंधश्रध्दाळू असून बऱ्याच वेळा ते विज्ञानाला जुमानत नाहीत.क्रिकेटमधील सर्वच देशातील अनेक खेळाडू अंधश्रध्दा मानतात. विशिष्ट वस्तू जवळ ठेवल्यास यश मिळते. अमूक प्रकारचे लॉकेट गळ्यात घातल्यास फायदा होतो. खास रंगाचा रुमाल जवळ बाळगल्यास फळ मिळतं. मैदानात जाताना डाव्या पायाचा बुट अथवा पॅड प्रथम बांधायचा. असे नानाविध किस्से क्रिकेटमध्ये आपण बघितलेच आहे. क्रिकेटमध्ये खास करून १३ या अंकाला अशुभ समजले जाते.
                        
इतकेच नाही तर काही संघ ठराविक मैदानालाच लकी समजतात. एवढेच नाही तर कोणत्या सामन्यात कोणता पंच असला तर आपला संघ हमखास जिंकतो अथवा हारतो. असा अंधविश्वासही खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर रूजला आहे. याबाबत प्रेक्षकही मागे नाहीत. प्रेक्षकांचेही या बाबत अनेक तर्क वितर्क असतात. विशिष्ट सामन्यात अथवा स्पर्धेत ठराविक खेळाडूच संघाचा कर्णधार असावा की, ज्यामुळे संघ विजयी होतो अन्यथा हमखास जिंकणारा सामना त्यांचा संघ हारतो असा प्रेक्षकांचाही समज असतो.

                        
येत्या १८ जूनपासून इंग्लंडमधील साऊथॅम्पटन कौंटीच्या रोझ बाऊल या मैदानावर भारत व न्यूझिलंड या दोन अव्वल कसोटी संघात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार असून या सामन्यापूर्वी अश्याच काही श्रध्दा -अंधश्रद्धांना पेव फुटला आहे. मात्र त्या बाबीला क्रिकेटच्या मैदानातच घडलेल्या काही ऐतिहासीक घटनांचा पुरावा देखील आहे. त्यामुळे कधी कधी वाटतं लोक चर्चा करतात तेंव्हा त्या गोष्टी पुन्हा घडू शकतात. तेंव्हा पुन्हा त्याच गोष्टीचा आणखी एकदा प्रत्यय येऊ नये म्हणून सदर बाबी टाळायलाच हव्यात. परंतु त्यातील काही गोष्टी इच्छा असूनही आपण टाळू शकत नाही.
                        
भारताचा संघ ५२० तर न्यूझिलंड संघ ४२० गुण मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. कागदोपत्री भारताचे पारडे जड वाटते. तर न्यूझिलंडमध्ये इंग्लंडसारखेच वातावरण असते. शिवाय न्यूझिलंडचा संघ या महत्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने खेळणार असल्याने प्रत्यक्ष सामन्याच्या सरावाच्या दृष्टीने निकालाचे पारडे न्यूझिलंडच्या दिशेनेही झुकलेले दिसते.
                      परंतु तीन असे इसम या सामन्याशी सलंग्न असणार आहेत की त्यापैकी दोघांच्या  उपस्थितीने भारत शंभर टक्के हरेल व राहीलेल्या एकामुळे भारत हमखास जिंकेल असं पूर्व इतिहास सांगतो.या तीन व्यक्ती कोण आहेत हे जाणून घ्यायला आपलीही उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असेल. चला तर त्या तीन मॅजिक मॅन्स विषयी जाणून घेऊया.

यातील पहिली व्यक्ती आहे या सामन्याच्या संभावित पंचांपैकी एक असणारा इंग्लंडचा आयसीसी पॅनेल वरील पंच रिचर्ड कॅटलबरो. हे पंच महाशय भारताच्या ज्या ज्या महत्वाच्या सामन्यात पंच म्हणून उभे होते. ते सर्व सामने भारताने गमावले आहेत. त्यामध्ये सन २०१४ मध्ये श्रीलंकेविरूध्द झालेल्या टि-२० विश्वकरंडकाचा अंतिम सामना, सन २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द वनडे विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी, सन २०१७ च्या चँपीयन्स ट्रॉफीतील पाकिस्तान विरूध्दचा अंतिम सामना, तसेच सन २०१९ चा न्यूझिलंड विरूध्दचाच वनडे विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामना समाविष्ठ आहे.

दुसरा व्यक्ती आहे दस्तुरखुद्द भारताचा कर्णधार विराट कोहली ! कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार जरी असला तरी त्याला आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकता आली नाही. त्यामुळे कोहलीचे या महत्वाच्या सामन्यात कर्णधार असणे अंधश्रद्धा मानणाऱ्यांच्या दृष्टीने अपशकुनी ठरू शकते.भारतासाठी लकी ठरणारा व्यक्ती आहे याच संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहाणे. अजिंक्य संघा सोबत असणार आहे.  परंतु नेतृत्व तो करणार नाही. अजिंक्यने आजपर्यंत भारताचे पाच कसोटयांत नेतृत्व केले असून त्यातील चार सामन्यात विजय मिळविला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. अजिंक्यचे नेतृत्व भारतासाठी फलदायी ठरले असून या महत्वाच्या सामन्यासाठी तोच कर्णधार असावा जेणे करून भारत शंभर टक्के यशस्वी होऊ शकेल. असाही सूर बाहेर येत आहे. 

                          
भारताला खरोखरच कसोटीचं विश्वजेतेपद मिळवायचं असेल तर कोहलीने मोठया मनाने या सामन्यात अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात खेळावं. हिच तमाम भारतीयांची अपेक्षा असणार आहे. परंतु एवढे मोठे पाऊल उचलण्यास कोहली तयार होईल का ?

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close