shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुशिलकुमारने कमावलेली इज्जत गमावली ; गैरकृत्यांची मालिकाच सजविली...!!


४ व ५ मे २०२१ च्या मध्यरात्री छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनियर सुवर्णपदक विजेता पहिलवान सागर धनकर याची हत्या झाली. सकृत पुराव्या नुसार सन २००८ बिजिंग व सन २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये भारताला अनुक्रमे ब्राँझ व सिल्व्हर पदक मिळवून देणारा पहिलवान सुशिलकुमार सदर खून प्रकरणात पोलिसांना दोषी आढळला. त्यानंतर सुशिलकुमार फरार झाल्याने त्याच्या विरूध्द संशयाचे ढग आणखी घट्ट झाले होते. अनेक प्रयत्न करूनही पोलिसांना तो सापडत नव्हता तेंव्हा पोलिसांना त्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयांचा इनाम जाहीर करावा लागला. दुर्देवाची गोष्ट म्हणजे २३ मे या जागतिक कुस्ती दिनाच्या दिवशीच हा ऑलिंपिक विजेता पहिलवान पोलिसांच्या कचाटयात सापडला.

 दोन ऑलिंपिक पदकांशिवाय सुशिलने कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई स्पर्धामध्येंही देशासाठी सुवर्णपदके मिळविली असल्याने भारत सरकारने त्याच्या उल्लेखनीय खेळाची दखल घेत त्याला अर्जुन अवॉर्ड, भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तसेच भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरव केला होता. 

सागर धनकर हत्या प्रकरणात न्यायालयात त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास भारताचे महामहिम राष्ट्रपती पद्मश्री किताब परत घेण्याचे अधिकार बाळगून आहेत. मात्र ऑलिंपिकमध्ये त्याने मिळविलेले पदक काही तांत्रिक बाबींमुळे अबाधीत राहू शकते.सुशिल कुमार सध्या खुनाच्या आरोपाखाली गजाआड गेला आहे. परंतु सुशिलचा हा पहिला अपराध नसून त्याच्या दुष्कृत्यांची मालिकाच प्रस्तुत लेखात आपणास सादर करत आहे

 सन २०१६ रियो ( ब्राझिल ) ऑलिंपिकसाठी सुशिल कुमार व महाराष्ट्राचा नरसिंह यादव हे दोघे ( ७४ किलो वजन गट ) एका जागेसाठी दावेदार होते. सदर जागेच्या पात्रता फेरीत सुशिलने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे नरसिंह यादवला क्वॉलिफायर ट्रायलसाठी पाठविले. नरसिंहने आपल्या प्रतिभा व खेळाच्या बळावर ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली. नॅशनल रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ( WFI ) च्या नियमानुसार जो खेळाडू विशिष्ट वजन गटाची पात्रता मिळविल तो ऑलिंपिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतो. 

मात्र सुशिल कुमारला वाटत होतं की त्याने दोन वेळा ऑलिंपिक पदक मिळविल्याने त्यालाच रिओला पाठवावे. सदर गटाची पात्रता फेरी पुन्हा घ्यावी यासाठी न्यायालयात अपिलही केले होते. मात्र न्यायालयाने ते फेटाळले आणि येथेच या नायकातील खलनायक जागा झाला.त्यानंतर सोनिपत येथील स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडिया ( साई ) येथे प्रशिक्षणासाठी नरसिंह सहभागी झाला. परंतु ऑलिंपिकच्या दहा दिवस अगोदर नॅशनल अँटी डोपिंग एजंसी (नाडा) ने घेतलेल्या डोपिंग चाचणीत तो दोषी सापडला. नाडाने त्याला क्लिनचिट दिली, मात्र वाडा ( वर्ल्ड अँटी डोपिंग एजंसी ) ने त्याला ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास मज्जाव केलाच, शिवाय त्याच्यावर चार वर्षांची बंदिही लादली. 

यामुळे नरसिंहची कारकिर्द बरबाद झालीच शिवाय ऑलिंपिक समितीने यादव ऐवजी बदली खेळाडू देण्यास भारताची विनंतीही फेटाळली. यामुळे भारताचे हमखास पदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले.या प्रकरणानंतर नरसिंह यादवने स्पष्ट आरोप केले होते की, सोनिपत येथील प्रशिक्षण कालावधीत सुशिलच्या सांगण्यानुसार नरसिंंहच्या खाद्य पधार्तात कोणीतरी उत्तेजक पदार्थ मिसळलेे. यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेशही दिले होते.

 दुसरे प्रकरण असे की, सन २०१८ मध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोर स्टेडियममध्ये राष्ट्रकुल खेळांसाठी संघ निवडीसाठी कुस्तीचे पात्रता सामने आयोजित केले होते. त्या सामन्यात सुशिलचा सामना प्रविण राणा या उदयोन्मुख पहिलवानाशी होणार होता. परंतु त्या सामन्यापूर्वीच प्रविणला मारहाण झाली. या प्रकरणातही सुशिलचे नाव आले होते. सदर मारहाण सुशिलच्या समर्थकांनी केल्याचा दावा प्रविण व त्याच्या भावाने केला होता. त्या प्रकरणी त्यांनी पोलिसांत केसही दाखल केली होती.

योगेश्वर दत्त या मल्लाने देखील सन २०१२ च्या लंडन ऑलिंपिक मध्ये कास्यंपदक जिंकले होते. योगेश्वर व सुशिल चांगले मित्र होते. योगेश्वरही छत्रसाल स्टेडियम मध्ये प्रशिक्षण घेत होता. याच योगेश्वरशीही सुशिलने भांडण केले होते. याच कारणामुळे योगेश्वरने लंडन ऑलिंपिकनंतर छत्रसाल स्टेडीयममध्ये सराव करण्याचे सोडून दिले होते. इतकेच नाही तर सुशिलचे निकटवर्ती मल्ल मित्र जितेंद्र कुमार व प्रविण कुमारने छत्रसाल स्टेडियम प्रशिक्षणाला बाय बाय केले होते.

सन २०१९ च्या वर्ल्ड चॅॅंपीयनशिप साठी पात्रता फेरी खेळली जात होती. त्या पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात सुशिलचा मुकाबला जितेंद्र कुमारशी होता. त्या सामन्या दरम्यान सुशिलने जितेंद्रचे बोट पिरगळले व डोळ्यावर बुक्का मारला होता. सामन्यानंतर जितेंद्रने प्रसिध्दी माध्यमांना हे सांगितले होते.

 सुशिलचे फक्त पहिलवानांशीच वाद होत नव्हते तर त्याला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिकांशीही भांडण करायचा. सुशिलच्या चुकीच्या वागण्याला वैतागून त्याचे प्रशिक्षक रामफल छत्रसाल स्टेडीयम सोडून गेले व त्यानंतर सुशिलचे खास जवळचे गणले जाणारे प्रशिक्षक विरेंद्रसिंग हे देखील सुशिलच्या वर्तणाला कंटाळून निघून गेले.

सुशिलने दिल्ली - गाझीयाबाद बॉर्डरवर टोल टॅक्स वसूलीचा ठेका घेतला होता. ते टोल वसुलीचे काम सुशिलने उत्तर प्रदेशातील कुप्रसिध्द गुंड सुंदर भाटी याला दिले होते. त्यामुळे सुशिल संशयाच्या भोवऱ्यात आला होता. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक पहिलवानांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या सुशिलचे नजरेत आलेले हे निवडक दुष्कृत्ये आहेत. परंतु प्रकाशझोतात न आलेले असे अनेक प्रकरणंही असतील. देशाचे नाव बदनाम करणाऱ्या सुशिल नावाच्या या अश्लिल माणसाला कायद्याने कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.
 
लेखक -डॉ. दत्ता विघावे.
close