राहूरी साखर कारखाना कामगार वसाहतीत शिवतेज मंडळ आयोजित नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने कणखर आवाजातून छत्रपती शिवरायांचा पराक्रम श्रोत्यांच्या मैफिलीत गर्जन्यास सुरू होते, प्रत्येकजण शिवछत्रपतीच्या विचारांची मेजवानी लुटण्यास तयार होता, लहानशी बाल गोपाल तर मोठया आनंदाने आस्वाद घेत होते, तानाजी, बाजी, मुरार बाजींच्या प्रसंगात तर शिवछत्रपतींच्या नामघोष श्रोते मोठ्या उत्साहाने करत होते, हे सर्व पहात असताना, एक-एक अनोखे प्रसंग उलगडून सांगण्यास आमच्या अंगात प्रचंड आवेश चढत होता.
त्याचवेळी श्रोत्यांमध्ये नजर खेळत असताना अचानक मंचापासून शंभर फुट अंतरावर असलेल्या चौकात, एका कुंडीवर, मंद उजेडात एक श्रोता बसलेला होता.
भरदार शरीर यष्टी, अंगात पांढऱ्या रंगातील तीन गुंड्याचा सदरा, पायजामा,डोक्यावर पांढरी गांधी टोपी, कपाळावर भगवा अष्टीगंध असलेले एक रुबाबदार, साधारण 55 वर्षांचे गृहस्थ बसलेले होते.
अत्यंत साधी राहणीमान परंतू विचारपक्व अभ्यासपूर्णता श्रोता, हातात पेन घेऊन एका छोट्या डायरी मध्ये काही तरी नोंद करत, पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन चेहऱ्यावर कुठलेही हावभाव न दाखवता प्रत्येक प्रसंग हा मन लावून ऐकत होते व हातात असलेल्या आपल्या डायरीत या प्रसंगातील अर्धविराम, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उदगारवाचक, यासर्व बाबीला स्पर्श करून पुन्हा व्याख्यान ऐकण्यास सज्ज होत होते.
आम्ही आमचे व्याख्यान तसेच पुढे चालू ठेवले पण एक नजर नकळत त्यागृहस्थांकडे जात होती.
मनात शंकेचे नुसते काहूर माजले होते, की नेमकं काय लिहीत असेल हा माणूस, व्याख्यान करताना आपल्याकडून काही चुकलं तर नसेल ना असे ना ना तर्हेचे प्रश्न आमच्या मनामध्ये घोंगावत होते.
तो काळ म्हणजे मी शिवरायांच्या चरित्रावर नवीनच व्याख्यानास श्रीगणेशा करण्याचा काळ होता, अगदी नवखा, आपण विचार मांडावे म्हणून केलेला सुरवातीच्या केलेला प्रयत्न होता
बघता-बघता एक एक प्रसंगातून आम्ही पुढे जात असताना, माझी श्रोत्यांवर खिळणारी नजर पुन्हा पुन्हा समोरच्या कुंडीवर बसलेल्या त्या अभ्यासू व्यक्तीचा मनातील प्रश्नाचा ठाव घेऊन पुढील वाक्यावर लक्ष साधीत होती, अश्या या तासाभरातील व्याख्यानात मला आलेला हा अनुभव जणू शिवछत्रपतींनी माझ्यासाठी धाडलेले जणू एक सुयोग्य मार्गदर्शकच असावे, क्षणभरासाठी आलेले हे विचार लवकरच सत्यात अवतरणार होते, हे मला काही वेळेनंतर समजणार होते, आणि व्याख्यानाच्या शेवटी आव्हान करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम दिले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय... असे म्हणून मी मंचावरून खाली उतरलो, तेवढ्यात कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचे जवाबदारी व तो कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आयोजकांनी पार पाडल्यानंतर समोरच कुंडीवर बसलेले ती व्यक्ती अचानक लगबगीने मंचा जवळ येऊन उभी राहिली आणि आयोजकांना विनंती करून आपले दोन शब्द व्यक्त करण्यास अनुमती त्यांनी मागीतली
त्यांनी हातात माईक घेऊन बोलण्यास सुरवात केली, हे सर्व दृश्य माझ्या समोर घडत असताना माज्या काळजाचे ठोके वाढण्यास सुरवात झाली होती, नेमकं काय बोलणार हा माणूस असा विचार करत असतानाच त्या गृहस्थाने बोलण्यास सुरवात केली.
ओम गुरुदेव...
आत्मामालिक..!
मी जगन्नाथ धोंडिराम जाधव.. कार्यक्रमाच्या सुरवातीपासून आम्ही हा व्याख्यानाचा कार्यक्रम ऐकला ... अतिशय सुंदर कार्यक्रम शिवतेज मंडळाणे आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मंडळाचे आभार तसेच आपल्या साखर कामगारांच्या वसाहतीत राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणाकडून शिवछत्रपतींचे व्याख्यान आज व्याख्याते हसन सय्यद यांच्याकडून ऐकण्यास मिळाले त्याबद्दल त्यांचे पण मनस्वी आभार
मुस्लिम असून तरीदेखील शिव छत्रपतींचा इतिहास इतक्या अभ्यासपूर्ण भाषेत आपल्यासमोर मांडणे, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असला पाहिजे, म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुस्लिम शिवभक्त हसन सय्यद याला भविष्यातील प्रत्येक कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो व श्री. जाधव यांनी माईक संयोजकाकडे सुपूर्त केले, या शुभेच्छा म्हणजे माझ्यासाठी जनू यशवंत हो... किर्तीवंत हो.. असा एक आशिर्वादच होता,
ते माझ्याकडे आले त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून मला माझे मार्गदर्शक भेटले यांची खात्री होण्यास अजून थोडा अवकाश जाणार होता, श्री. जाधव माझ्या समोर येऊन माझ्याशी बोलू लागले व म्हणाले कार्यक्रम छान झाला बरं... कुठे राहतो तू... तुझ्या वडिलांचे नाव काय... कुठे काम करतात ते... हे सर्व प्रश्न माझ्यासमोर एकाच वेळी जसे पंच पक्वांनाचे ताट तयार करून समोर ठेवावे अगदी तसेच सर्व प्रश्न श्री. जाधव यांनी माझ्यासमोर ठेवले... तेवढ्यात मी म्हणालो... मी... इथे.. याचं चाळीत राहतो, आणि मी तुम्हाला ओळखतो, श्रीकांत माझा मित्र आहे तुम्ही त्याचे वडील व रामा जाधव सरांचे थोरले बंधू आण्णा आहात,
माझे वडील वेल्डर म्हणून कारखान्यात इंजिनियर खात्यात आहे... त्यांचे नाव श्री. मासुम भाई सय्यद आहे.. तेवढ्यात वडील आले,
वडिलांचे व अण्णांचे संवाद सुरू झाले...
भाई खूप भारी बोलतो... खूप पुढे जाईल हा... याला सपोर्ट करा... आणि मला माहित नव्हते तुमचा चिरंजीव आहे हा...
आणि माझ्याशी बोलू लागले, तू भारुड सम्राट हमीदभाईंना ओळखतो का... ते हभप शिवशाहीर कल्याण महाराज काळे पाटील भातकुड गाव येथे राहतात व हमीद भाई पण कायम त्यांच्या बरोबर असतात, तुझ्या सारखेच आहेत हमीद भाई खूप छान कार्यक्रम असतात त्यांचे.. हे घे त्यांचा नंबर त्यांना फोन कर... कल्याण महाराजांचा नंबर घे.. त्यांना फोन कर... नाहीतर मी भेट घालून देतो तुमची...
असे बोलता-बोलता त्यांनी हमीद भाई व कल्याण महाराज यांना दोघांनाही फोन लावले व माझे बोलणे करून दिले... कल्याण महाराज व हमीद भाईं यांच्याशी बोलताना मला खूप आनंद होत होते... कारण दूरदर्शन वर ज्यांना मी पहात होतो, त्यांच्याशी मी अण्णांच्या फोनवरून मी हभप शिवशाहीर कल्याण महाराज यांच्याशी बोलत होतो.. व ते मला सांगत होते हमीद जसे आमच्या सोबत कार्यक्रमाला यायचे तसेच तुम्ही पण या...
आणि खरंच त्यादिवशी मला छत्रपतीनी एक पितासम मार्गदर्शक गुरू म्हणून आण्णा यांच्याशी भेट घडवली.....
आणि प्रवास सुरु जहाले शिवकार्याचे बघता-बघता मार्गदर्शक रुपी गुरुवर्य आम्हास लाभले... *गुरु पारस को अन्तरो, जानत हैं सब संत, वह लोहा कंचन करे, ये करि लये महंत..* संत कबीर यांच्या उक्तीप्रमाणे आण्णा व आमचे दररोज नवनवीन विषयास अनुसरून शिवचरित्रावर चर्चा होत, दरम्यान अण्णांना मी प्रसंग संवाद रुपी सादर करून दाखवायचो... तसे तसे आण्णा आम्हाला दाद देत... व्वा... क्या बात है... खूप छान... भैय्या अजून थोडा आवाज कणखर आला तर.. जबरदस्त होईल... छान... असे आण्णा दाद द्यायचे...
आण्णा जिथे जायचे तिथून नवनवीन काही ना काही आमच्यासाठी वाचण्यास घेऊन यायचे... हे बघ भैया... हे वाच... हे ऐक... आण्णा ज्यांना भेटायचे त्यांच्या समोर सर्वप्रथम माझे नाव अधोरेखित करायचे, असे करता-करता काही दिवस उलटले व तो योग आलाच एकदा कल्याण महाराज यांचे श्रीहरी कीर्तनाचे आयोजन कोल्हार येथे होते. आण्णा व मी महाराजां सोबत किर्तनास जाणार होतो, व गाडीत जाता जाता आण्णा महाराजाना म्हणाले; महाराज तुमचे कीर्तन समाप्त झाल्यानंतर हसन ला दहा मिनिटे द्या... तेवढ्यात कल्याण महाराज म्हणाले आण्णा हसनला दहा मिनिटे नाही तो आता कायमच माझ्या सोबत असणार, जसे भारुडसम्राट हमीद भाई तसेच शिवव्याख्येते हसन भाई... महाराजानी हे उदगार काढल्यावर सहज हश्या पिकला.. आणि आण्णा महाराजाना म्हणाले; महाराज आता मी हसनला तुमच्याकडे सोपोवतो इथून पुढे त्याची सर्व जवाबदारी तुमची असेल... त्याला कुठे, कसे संधी द्यायची ते तुम्ही ठरवा पण याला तुमच्या सोबत राहू दया... आणि तेव्हा पासून तब्बल तीन वर्षे आदरणीय गुरुवर्य ह.भ.प शिवशाहीर कल्याण महाराज व आण्णा सोबत महाराष्ट्राची भ्रमंती केली. कीर्तन झाल्यावर दहा मिनिटे आमच्यासाठी राखीव असलेले ते आता कीर्तनाच्या सुरवातीला कधी अर्ध्या तासांवर गेले हे आम्हाला समजले नाही, महाराज व अण्णांचे प्रचंड विश्वास आमच्यावर जडला व आण्णा म्हणाले हसन, जो पर्यंत मुंबई पुणे या शहरामध्ये तुझा स्वतंत्र व्याख्यान होत नाही तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, आणि अखेर तो दिवस आला १९ जून शिवसेना वर्धापन दिवस मुंबई येथे कार्यक्रमास उपस्थित असलेले शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते मंडळी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार होता.. प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरवातीला आण्णा व माझे संभाषण जरूर होत होते व कार्यक्रम झाल्यावर पूर्ण कार्यक्रमाचा आढावा आण्णा जाणून घेत होते.. असे अण्णांचे प्रत्येक वेळी मिळालेले मार्गदर्शन हे माझ्यासाठी शिवछत्रपतींनी दिलेले साक्षात एक आशीर्वाद होते, सुरवातीच्या काळात अण्णांनी शेवगाव, बोधेगाव, कुकाणा, पाथर्डी, औरंगाबाद गंगामाई कारखाना, अनेक ठिकाणी व्याख्याने आयोजित केली, अण्णांसोबत असलेला हा जिव्हाळा व त्याचे वर्णन करणे कठीणच
त्यांचा स्वभाव हा धार्मिक वृत्तीचा, परखड व स्पष्ट होता, आयुष्यभर कष्ट, त्यागमय समर्पण जीवन जगणारा या अष्टपैलू व हाडांच्या कला जाणकाराने अनेक कलाकाराच्या कलेतील पंखांमध्ये बळकटी निर्माण करून त्यांना उंच भरारी घेण्यास शिकवले त्यांना घडवले, त्यापैकीच बाळासाहेब वाईकर, संतोष कुलट, प्रति सुरेश वाडकर तान्हाजी जाधव, शेखर दरवडे असे अनेक कलाकारा सोबत अण्णांचे जिव्हाळ्याचे सबंध होते,
अण्णा हा आदरयुक्त अवकाशा समान शब्दाचे वर्णन शब्दात कसा मांडावा हेच एक मोठा प्रश्न आज माझ्यासमोर आहे. दगडाचा देव होण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही त्यासाठी फक्त चार पाच रूपयांचा शेंदूरच खूप झाला असे मला वाटते पण सामान्य माणसाचा मार्गदर्शक होतानी मात्र अत्यंत यातना, अत्यंत कष्ट, त्यागमय जिवन, निर्भयता, मनाची पवित्रता, स्थिर मन, सात्विक विचार आणि सात्विक दान, इंद्रीयाचे नियंत्रण, त्यागमय जिवन, अभ्यास तसेच महापुरुषांचे विचार प्रबोधनात्मक पुस्तकांचे मनन, कर्तव्य करत असताना सतत केलेले कष्ट म्हणजेच तप, शरीर मन आणि इंद्रीयांची सरळता त्याचप्रमाणे सरळपणे वागण्याची पध्दत , अहिंसा , सत्याच्या बाजुने ऊभे राहणे, मुक्या प्राण्या बद्दल मनात दया, भाव या विचारा बरोबरच त्यांच्या जिवनात तेज, क्षमा, धैर्य, अंतर्मुख आणि बहीर्मुख स्वच्छता, मनात कपटी भाव नसणे, मीपणाचा त्याग, अहंकार रहित वृत्ती हे सर्वच गूण म्हणजे एक महापुरुषांचे विचारांची संपदाच आहे, असे म्हणतात; की अशा या विचारांची संपदेने परीपूर्ण व्यक्तिमत्व जन्माला यावा यासाठी अनेकदा हवन यज्ञ, तप, ऊपवास केले जातात तेव्हा कुठे अशा माणसाला सर्वसामान्य माणसाच्या हृदयात गुरुजींचे रूप येते. ज्या व्यक्तीचे जिवन कष्ट, त्याग, समर्पण, या विचारांनी सजलेले आहे त्याच माणसाला मोठेपण प्राप्त होते. अंगी मोठेपण असून लहानात "लहान" असल्यासारखे वागणे, मोठ्यात "मोठे" असल्यासारखे वागणे, नुसते माणसाच्या चेह-याकडं पाहीले तरी त्याच्या मनातील भाव ओळखण्याची कला, अशा माणसाचे नुसते नाव घेतले कींवा दर्शन घेतले तरी सार्थक होते, म्हणून अण्णांनी स्वतःसाठी नाही, जे काही ईश्वराला मागायचे ते केवळ दुस-यासाठीच मागायचे परहितासाठीच जागणे आणि दुस-यासाठीच जगणे, असा ज्या दगडावर हात ठेवतो त्या दगडाचा देव होतो , ज्या जागेवर पाय ठेवतो त्या जागेला तिर्थाचे रूप येते आणि ज्या कलाकरावर नजर टाकतो त्या कलाकाराचा ऊध्दार होतो.
आज अण्णां प्रति या लेखाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करत असताना प्रचंड दुःख होत आहे की कलेची कदर करणारा कदरदान कला जाणकार मार्गदर्शक रुपी गुरू ईश्वराने आमच्याकडून हिरावून घेतले याचे प्रचंड शोक आहे.
असे व्यक्ती जन्माला यावे म्हणजे ईश्वराने कलाक्षेत्राला दिलेले खूप मोठे वरदानच होय..
आण्णा या लेखाच्या माध्यमातून आपणांस शतशः वंदन.
ओम गुरुदेव..🙏🏻
आत्मामालिक🙏🏻
जय शिवराय..🙏🏻
गुरुचरण सेवक शिवचरित्रकार
हसन सय्यद

