भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय ) हे पूर्णतः व्यावसायीक असून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डात बीसीसीआयची गणना होते. बीसीसीआयकडे सध्या नऊ हजारापेक्षा जास्त खेळाडू रजिस्टर्ड आहेत. ३९ राज्य संघ, लाल चेंडूची रणजी स्पर्धा, गुलाबी चेंडूची दुलिप ट्रॉफी, टि-२० ची मुश्ताक अली स्पर्धा व वनडेची विजय हजारे करंडक राष्ट्रीय स्पर्धा आहे. यामधील केवळ अकरा खेळाडूच एका वेळी भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतात.
१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या या खंडप्राय देशात असंख्य मुलं क्रिकेट खेळतात. परंतु त्यातील सर्वांनाच भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळतं असं नव्हे. पूर्वीच्या काळी केवळ कसोटी क्रिकेट खेळले जायचे. त्यामुळे देशातील होतकरू मुलांची कुचंबणा व्हायची. शिवाय त्या काळात क्रिकेटही फारसे खेळले जात नसल्याने अनेक गुणवान खेळाडूंच्या प्रतिभा कोमजून जायच्या.
परंतु सुदैवाने एकदिवसीय क्रिकेट उदयास आले. त्यामुळे काही खेळाडूंसाठी कोणत्या तरी एका संघात जागा मिळविण्याच्या आशा निर्माण झाल्या. परंतु राजकारण व कोटा सिस्टममुळे बरेचसे खेळाडू कुजले गेले.
कालांतराने टि-२० या अति झटपट क्रिकेटने आपले पंख फैलावले. त्यामुळे अनेक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यास वाव मिळाला. भारतात प्रत्येक राज्यात लिग स्पर्धा सुरु झाल्या. त्याचबरोबर थेट आंतरराष्ट्रीय लौकीक असलेली भारताची प्रमुख स्पर्धा आयपीएल जोमात आली. त्यामुळे देशाच्या काना कोपऱ्यातील खेळाडू रातोरात जगासमोर आले. त्याचबरोबर भारतातील क्रिकेटचं स्ट्रक्चर खोलवर गेल्याने भारताकडे प्रतिभावान खेळाडूंची आवक मोठया प्रमाणात होऊ लागली.
नव्या व गुणवान खेळाडूंचे आलेले अतिरिक्त पिक बघता बीसीसीआयला विविध प्रयोग करायला वाव मिळाला. भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही प्रकारात आपला वरचष्मा सिध्द केला. सन २०२१ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीतही नवोदित खेळाडूंनी बलाढय ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत धुळ चारली. त्यामुळे खास करून बीसीसीआयचा आत्मविश्वास वाढला.
येत्या १८ जून पासून इंग्लंडमध्ये भारत न्यूझिलंड विरूध्द कसोटी विश्व अजिंक्यपदाची फायनल व त्यानंतर इंग्लंड विरूद्ध पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. न्यूझिलंड व इंग्लंड या दोन संघांविरूद्ध होणाऱ्या भारताच्या कसोटी मालिकांदरम्यान ४२ दिवसांचे मोठे अंतर आहे. परंतु सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रभाव आहे. शिवाय प्रत्येक देशात क्वॉरंटाईनचे वेगवेगळे नियम असल्याने संघ मायदेशी परतून पुन्हा इंग्लंडला जाणे त्रासदायक व गैरसोयीचे होणार आहे.
याच कालावधीत भारताने श्रीलंकेचा वनडे व टि-२० दौरा आयोजित केला आहे. इंग्लंड दौऱ्यावर दोन जून पासून जाणारा भारताचा संघ ताकवदान असला तरी श्रीलंकेला जाणारा संघही तितकाच तोलामोलाचा असणार आहे. भारताची बेंच स्ट्रेंग्थ अतिशय मजबूत असल्याने बीसीसीआय आजमितीला भारताचे कमीत कमी तीन तगडे संघ निवडू शकते.
यामुळे एक वेगळी विचारधारा चर्चिली जाऊ लागली आहे की, आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वनडे, टि -२० व कसोटीसाठी वेगवेगळे संघ बनविले जावे. जेणे करून तीनही प्रकारच्या संघात त्याच त्याच खेळाडूंना खेळविणे त्यांच्या आरोग्याच्या व तंदुरूस्तीच्या दृष्टीने धोकादायक होते. शिवाय देशातील क्रिकेटची लोकप्रियता बघून क्रिकेट मध्ये करियर बनवू पाहणाऱ्या उदयोन्मुख व गुणवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून देशाचे प्रतिनिधित्व करायचे स्वप्न साकार होईल व क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात त्या त्या प्रारूपांनुसार तज्ञ खेळाडू निवडले जातील व भारताला खऱ्या अर्थाने क्रिकेटची महासत्ता बनता येईल. त्याच बरोबर ठराविक खेळाडूंची मक्तेदारी बनलेली भारतीय संघातील जागा खऱ्याखुऱ्या गुणवान खेळाडूला मिळाविता येईल.
जर भारताने आपले तिन वेगवेगळे संघ बनविले तर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचे उत्थान होईल व जागतिक क्रिकेटला चालना मिळेल व कधीही संधी न मिळालेले खेळाडू व त्यांचे पालक बीसीसीआयला लाख लाख धन्यवाद देतील.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

