shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथील‌ दूध भेसळप्रकरणी तब्बल पाच महिन्यांनी गुन्हा दाखल...!

राहुरी : तालुक्‍यातील चंडकापूर येथील जयभवानी दूधसंकलन केंद्रातील दूधभेसळ प्रकरणी अन्न व औषध प्रशासनातर्फे (गुरुवारी) तब्बल पाच महीन्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दूध केंद्राच्या चालकाविरोधात अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Milk adulteration case filed against one)

राजेंद्र चांगदेव जरे (वय 31, रा. चंडकापूर) असे आरोपीचे नाव आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे व अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांच्या पथकाने पाच महिन्याअगोदर 31 डिसेंबर 2020 रोजी चंडकापूर येथे जय भवानी दूधसंकलन केंद्रावर छापा घातला होता. त्यात भेसळीसाठी साठविलेली 25 किलो व्हे पावडर, 152 किलो लिक्विड पॅराफिन व भेसळयुक्त 532 लिटर दूध, असा 30 हजार 24 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करून, दूधसंकलन केंद्राचा परवाना निलंबित केला होता.


आरोपी जरे गाईचे 800 लिटर दूध शेतकऱ्यांकडून रोज खरेदी करून, त्यात 200 लिटर कृत्रिम दूध मिसळून त्याची विक्री करीत होता. छाप्यात जप्त केलेले रसायनांचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात मानवी शरीराला अत्यंत घातक असलेल्या लिक्विड पॅराफिन या रसायनाची दुधात भेसळ असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ तपास करीत आहेत.

या तपासासाठी पाच महिने का लागले..? तपासादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे दिसते.अन्न व औषध प्रशासनाचा इतका ढिसाळ कारभार कसा..? काय या छुप्या गोष्टिंना अन्न व औषध प्रशासन बळ देते का ? जेव्हा संबंधित ठरल्याप्रमाणे चिरीमिरी देत नाही,तेव्हाच कार्यवाही होते का?अजून किती ठिकाणी सर्रासपणे दुध भेसळ होत असेल .? यापुढे दुधभेसळ थांबणार की थातूरमातूर कारवाई करून दुध भेसळ चालकांना पुन्हा बळ  दिले जाईल..? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून आहेत.

भेसळीसाठी रसायने कुठून आणली, या साखळीत किती जण आहेत, याची माहिती आरोपी राजेंद्र जरे सांगत नव्हता. मानवी आरोग्यास घातक दूधभेसळ मुळापासून नष्ट करण्यासाठी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, नगर.
close