shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"वेदस्वरूप आई"



आई असते शाश्वत आभाळ
वेदनेच्या ढगांतूनही..
भिजवत राहते...
ओसाड माळरान
फुलवते आनंदाचे कारंजे
स्वतःच्या डोळ्यांतून ओतून
कारूण्याचा झरा...! 

आई, या शब्दाला अमृताचा लेणं
जसं, देवघरात वाजत राहतं गाणं
तिच्या शब्दाला देवऋषिचे आशीर्वाद
हातात मायेचा स्पर्श
अन श्वासांच्या लहरीत...
सामावलेले पृथ्वीचे बळ! 


आई, आई असते समईची तेवणारी वात
तेल संपल्यावरही मुकाटपणे जळत राहते
साऱ्यांना प्रकाशमान करत...
गरिबीचे चटके सोसत...
चंदनाचा लेप लेकरांच्या पाठीला लावत... 

तिची महती वर्णन करताच येत नाही
कारण ती वेदांहून तसूभरही कमी नाही
अन पुराण, उपनिषद तिच्याशिवाय अपुरे आहेत...
देवालाही जन्माला घालायला हवी असते आई 
आणि दही, दूध-लोणी भरवायला...
हवी असते ती एकमेवाद्वितीय आईच 

आई नजरेआड झाली ना जराशीही
अख्खं जग डंख मारायला सरसावते... 
आभाळ कोसल्याची होते तेव्हाच जाणीव
सर्वांगाला थरकाप सुटते 
आणि दशदिशाला टाहो फोडत...
शोधतो तिची आकृती...
मनात, हृदयात, काळजात कोरलेली
एक दीपस्तंभ आई...! 

- कांतीलाल कडू
९/ मे /२०२१
close