परिचर महिलांना कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता व किमान वेतनानुसार वेतन वाढ (मानधन) मिळण्याची मागणी..!
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
प्रशासनातील आजवरचा सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे अर्धवेळ स्त्री परिचारिका होय.या कोरोना काळाच्या महामारीत सुद्धा सरकारी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी आरोग्य विभागात साफसफाई तसेच पडेल ती कामे करणारी हक्काची बाई म्हणजे अर्धवेळ परिचारिका होय.
केवळ नावाने अर्धवेळ असणारी ही परिचारिका सुमारे 7 ते 8 तास रोज काम करते परंतु तिचा पगार हा मागील तीस वर्षांपूर्वी 50 रुपये महिना ते आज मात्र 3000 रुपये महिना एवढाच वाढलेला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने 2900 रुपये आणि राज्य सरकारच्या वतीने 100 रुपये असे मानधन मिळते. या महागाईच्या काळात 100 रुपये रोजाने कुणी काम करणारं दुसरं मिळणार नाही. परंतु आज ना उद्या "या मायबाप सरकारला जाग येईल आणि आपला उद्धार होईल" या धोरणाने ते आजपर्यंत रात्रंदिवस राब-राब राबत,आहेत. कुठल्याही मोठ्या इमारतीच्या पायाचा प्रत्येक दगड जसा महत्वाचा असतो,त्याचप्रमाणे अर्धवेळ परिचारिका या शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करत आहेत.त्यांची आजची अवस्था ही "आई जेवू घालीना, आणि बाप भीक मागू देईना"अशी झालेली आहे.
मागील वर्षीच्या कोरोना काळात देखील अनेक परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता,अद्याप ही मिळालेला नाही, आणि आजही त्या,या कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या परिचर महिलांना यावर्षीचा तसेच मागील वर्षीचाही, प्रोत्साहन भत्ता देण्याची उपाययोजना करावी.
तसेच आपण किमान वेतनानूसार त्यांना लवकरात लवकर पगारवाढ करावी,आणि यापुढील सर्व वेतन (मानधन)हे त्यांना ऑनलाइन पध्दतीने देण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी शहर अध्यक्ष शहानवाज शेख कल्पना महाडिक शालन जाधव लता कांबळे सुरेखा जाधव उषा केदारे संगीता बोडखे प्रतिभा सोनवणे कुमुदिनी वंजारे आदी परीचारिका महिला उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

