मराठा समाजाचे आरक्षण टिकणेसाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी : माजी आमदार जयवंतराव जगताप..!
प्रतिनिधी । संजय वायकर :-
करमाळा (दि.५):- समाजा - समाजात आर्थिक समता, सौख्य व सौहार्द टिकणेसाठी मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण टिकणे अत्यंत गरजेचे असून यासाठी राज्य शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले आहे . मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर श्री जगताप बोलत होते.
माजी आमदार जयवंतराव जगताप
याविषयी पुढे बोलताना श्री .जगताप यांनी सांगितले कि, मराठा आरक्षण हा विषय राजकारणाचा , श्रेयवादाचा अथवा एकमेकांवर खापर फोडणेचा नाही . काळाच्या ओघात जसजसा कुटुंब विस्तार होत गेला तसतसा मराठा समाज हा अल्प भुधारक अथवा भूमीहीन होत गेला आहे . तसेच शैक्षणिक व नोकरीच्या संधी पासून वंचित झालेला आहे .
आपल्या देशात अठरा पगड जाती गुण्यागोविंदाने नांदत आहेत . याठिकाणी आर्थिक विषमतेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये व सर्वांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण टिकणे व मिळणे अत्यावश्यक आहे.
यासाठी केंद्र व राज्य सरकार, राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोग यांनी समन्वयाने काम करून मराठा आरक्षण टिकणे कामी काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून व्यापक राष्ट्रहीत डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेव्दारे मराठा आरक्षण टिकवावे अथवा मिळवून द्यावे अशी अपेक्षा श्री . जगताप यांनी व्यक्त केली .

