कोविड-१९ या नावाने कुप्रसिद्ध झालेल्या कोरोना व्हायरसने मागील दोन वर्ष संपूर्ण जगातील जन विस्कळीत करून टाकले आहे. जगभरातील सर्वच देशांचे सरकारे कोरोनाच्या उच्चाटनासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तरीही हा जीवघेणा आजार आटोक्यात येण्याचं नावंच घेईना. कोरोना व्हायरसच्या महाभयंकर प्रलयाने आतापर्यंत जगभरातील कोटयावधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. तर लाखो लोकांनी आपले अनमोल जीव गमावले आहे.
कोरोना व्हायरस हा असा आजार आहे की, याला जात, धर्म, लिंग, लहान, मोठा, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव चालत नाही. त्याच्या विळख्यात जो कोणी सापडेल त्याला संपविल्या शिवाय हा व्हायरस चैन घेत नाही. कोरोनामुळे आजपर्यंत राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, साहित्य, पत्रकारीता, छोटेमोठे व्यावसायीक, विद्यार्थी तसेच इतरही अनेक क्षेत्रातील लोकांना आपला झटका दाखविला आहे.
सन २०२० मध्ये जेंव्हा कोरोना व्हायरसची पहिली लाट आली तेंव्हा, इंग्लंड, इटली, अमेरीका, इराण, चीन व इतरही काही देशांमध्ये मोठया प्रमाणावर जिवीत हानी झाली होती. त्या पहिल्या लाटीचा भारतात विशेष प्रभाव न पडल्याने भारतीय लोकांनी कोरोना व्हायरसला हलक्यात घेतले. सरकारी यंत्रणांनीही शाळा, कॉलेज, बाजारपेठा, लग्न, सभा, संमेलने, मंदिरे सर्रास खुले करून दिले व त्याचा दुष्परीणाम असा झाला की भारतात न भूतो व न भविष्यती असा मृत्यूने तांडव घातला. मृत्यूच्या या तांडव नृत्यात अनेक जण चिरडले गेले. प्रत्येकाने आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबीयांचा विचार केला असता तर आज ही गंभीर वेळ आली नसती.
खास करून भारतीय लोकांमध्ये आपल्या घरातील कुणाला त्रास झाला तरच त्या गोष्टीचे गांभीर्य कळते. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकायलाच कोणी तयार नाही. जो तो स्वतःच अनुभव घ्यायला निघाला. त्याचा परिपाक असा झाला की आज आपल्याला कुटुंबचे कुटुंब उध्ववस्त होताना दिसत आहे.काही लोक अतिविशेष काळजी घेतात, सर्व नियमही पाळतात पण त्यांच्या संपर्कात कोरोना बाधीत रूग्ण आल्याने असे निष्पाप लोकही आपले जीव गमावून बसले आहेत.
चौदावी आयपीएल क्रिकेट स्पर्धा रंगात आली असताना या स्पर्धेत सहभागी संघ व इतर तत्सम लोकांसाठी असलेले जैव सुरक्षा कवच ( बायो बबल ) बर्स्ट झाल्याने काही खेळाडू व सपोर्टींग स्टाफचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने स्पर्धा अर्ध्यावरच सोडून देण्यात आली.कोरोनाचा कहर क्रिकेटसाठी इथेच थांबला नाही तर कोरोनामुळे भारतीय क्रिकेटमधील काही नामवंत क्रिकेटपटू, क्रिकेट अधिकारी, क्रिकेटपटूंचे आई, वडिल, बहिण या नातलगांनाही आपला जीव गमवावा लागला.
या मृतांमध्ये भारताच्या संघात इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेली महिला खेळाडू प्रिया पुनिया हिची आई. भारताच्याच महिला संघाची अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिची आई चेलवुंबादेवी व बहिण वत्सला, तसेच भारताची माजी खेळाडू एस. श्रवंती नायडू हिची आई एस.के.सुमन यांचाही समावेश आहे. याच एस.के. सुमन यांच्या इलाजासाठी भारतीय पुरुष संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याने ६.७७ लाख रुपये मदत म्हणून दिले होते.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचे वडिल, भारताचा लेगस्पिनर व सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळाणारा पियुष चावला याचे वडिल प्रमोद कुमार चावला तसेच भारताचा माजी जलदगती गोलंदाज आर.पी.सिंग याचे वडिल शिवप्रताप सिंग यांनाही कोरोना व्हायरस मुळे जीव गमवावा लागला.
राजस्थान रॉयल्सचा नवोदित वेगवान गोलंदाज चेतन सकारीया याचे वडिलही कोरोनाचे बळी ठरले. तसेच राजस्थानचा लेगस्पिन गोलंदाज विवेक यादव वय ३६ हा देखील कोरोनामुळे मृत्यू पावला.ओरिसा रणजी संघाचा माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा वयाच्या ४७ व्या वर्षी कोरोनाच्या पाशात अडकला. सौराष्ट्राकडून रणजी स्पर्धा खेळणारे माजी खेळाडू व बीसीसीआचे विद्यमान मॅच रेफ्री राजेंद्रसिंग जडेजा वयाच्या ६६ व्या वर्षी कोरोनामुळे मरण पावले.
बीसीसीआयचे माजी स्कोअरर (धावलेखक) दिनार गुप्ता वय ७६, तसेच माजी निवड समिती सदस्य व माजी क्रिकेट खेळाडू किशन रुंगठा वय ८८ यांनाही कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले.कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची यादी पुढे लांबू नये यासाठी आपण प्रत्येकाने सर्व प्रथम स्वतःची काळजी घ्या, आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन करा. हिच सर्व मृत व्यक्तींना खरी श्रध्दांजली ठरेल !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

