देवळाली प्रवरा - २ मे २०२१
सोसिएल मीडियाच्या मदतीने मिळाला व्हेंटिलेटर बेड.. आणि काही खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची होणारी लूट हे दोन लेख आपण वाचले असतीलच. या दोन्हीही लेखातील त्या कोरोना रुग्णाचे वडिलांचा परवा रात्री घरामध्ये मृत्यू झाला व ही बाब काल दि. १ मे रोजी सकाळी १० वा. च्या जवळपास उघडकीस आली. त्यामुळे त्या कोरोना रुग्णाचे वडिलांचा मृत्यू हा व्यवस्थेचा बळी ठरला असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
देवळाली प्रवरा येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या एकुलत्या एक २५ वर्षे वय असलेल्या मुलाला कोरोनाची बाधा झाली. २३ स्कोर व ६५ ऑक्सिजन असलेल्या मुलाला त्याचे हवालदिल झालेले आई वडील पन्नास हजार रुपये हात उसने घेऊन २१ एप्रिल रोजी बेड मिळण्यासाठी देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर, विळद, संगमनेर असे खाजगी वाहनातून फिरत होते.. कुठेही बेड मिळत नसल्याने शेवटी ते २२ एप्रिल च्या पहाटे एक वाजता देवळाली प्रवरा मध्ये आले.
तो पर्यंत सोसिएल मीडियावर बेड साठी आवाहन केल्याने शेवटी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात बेड उपलब्ध झाला... आता औरंगाबाद येथे जानेसाठी ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिका आवश्यक होती.. ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिका सकाळी आठ वाजता उपलब्ध होणार होती.., तोपर्यंत रात्री एक ते सकाळी आठ वाजेपर्यंत देवळाली प्रवरा येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारतीत सुरू असलेल्या कोविड सेंटर मध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या मुलाला ठेवण्याचे ठरले... रात्री एक वाजता पंधरा हजार रुपये रोख डिपॉझिट भरून घेऊन त्या कोविड सेंटरने सकाळ पर्यंत रुग्ण ठेवणेसाठी सहकार्य केले.
तो पर्यंत दुसरीकडे कुठे रुग्णवाहिका किंवा बेड मिळतोका यासाठी आम्ही सातत्याने दिवस उजाडेपर्यंत प्रयत्न करीत राहिलो. शेवटी सकाळी आठ वाजता राहुरी येथून खासगी रुग्णवाहिका आली.., देवळाली प्रवरा येथून त्या रुग्णाला औरंगाबाद येथे हलविण्याची तयारी सुरू झाली .., तोपर्यंत त्या कोविड सेंटरने त्या रुग्णाचे रात्री एक ते सकाळी आठ वाजेपर्यंतचे तेरा हजार पाचशे रुपये बिल रुग्णाचे वडिलांचे हातात दिले.., व रात्री भरलेल्या पंधरा हजार रुपये डिपॉझिट मधून बिल वजा करून एक हजार पाचशे रुपये परत दिले..., ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आयुष्यभर नोकरी केली त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेतच्या इमारतीत सुरू असलेल्या कोविड सेंटर मध्ये मुलाला सात तास ठेवून झालेल्या सहकार्याबद्दल त्या कोविड सेंटर कडे आणि हातातील बिल आणि डिड हजार रुपयांकडे हताश नजरेने पाहत पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा माझेपासून लपवत त्या रुग्णाचे ते कर्मचारी वडील व आई औरंगाबाद ला जानेसाठी कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णवाहिकेत बसले.., एकतर रात्रभर जागरण.., आणि पोटात कालपासून अन्नाचा कण नसल्याने त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर थकवा स्पस्ट जाणवत होता.., माझी आणि त्या रुग्णाच्या वडिलांची ती शेवटची नजरानजर असेल असे मला स्वप्नातही वाटले नसते.
दि. २२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी आठ चे जवळपास देवळाली प्रवरा येथून मोठ्याने सायरन वाजवत ती रुग्णवाहिका औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात सकाळी दहा चे जवळपास पोहचली.., रुग्णवाहिका आली म्हणून घाटी रुग्णालयातून एक कर्मचारी धावत पळत स्ट्रेचर घेऊन आला. पण त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्ण गाडीतून खाली उतरवण्या अगोदरच त्या रुग्णाच्या वडिलांकडे चौदा हजार रुपये भाडे मागितले.., रुग्णाचे वडील काकुळतीला येऊन त्या रुग्णवाहिका चालकाला विनंती करीत होते की, मुलाला ऍडमिट करून मी तुमचे भाडे देतो.. मुलाला रुग्णवाहिकेतून खाली घेण्यासाठी मदत करा. पण त्या वाहन चालकाला कोणाचीही दया आली नाही.. निर्लज्जपणे तो म्हणाला की हे काम माझे नाही.., मला अगोदर माझें चौदा हजार रुपये भाडे द्या..!
त्या रुग्णाच्या वडिलांचे डोळे भरून आले.., डोक्यात मुलाच्या वैद्यकीय खर्चाचे अर्थकारण फिरू लागले.., हात उसने घेतलेले पन्नास हजार.., त्यातून देवळाली प्रवरा येथील कोविड सेंटरमध्ये अर्ध्या रात्रीचे भरले साडे तेरा हजार .., आता या रुग्णवाहिका चालकाला द्यायचे चौदा हजार.., अजून तर मुलगा ऍडमिट व्हायचा आहे.., तेही औरंगाबाद मध्ये.., या सर्व विचारांचे काहूर त्या वडिलांच्या डोक्यात माजले आणि चक्कर आल्याने घाटी रुग्णालयाच्या पायरीचा आधार घेऊन ते वडील खाली बसले.., तो पर्यंत त्या निर्लज्ज रुग्णवाहिका चालकाने भाड्याच्या रकमेवरून हुज्जत घालायला सुरुवात केली.., वाद नको म्हणून त्या वडिलांनी त्याला दहा हजार रुपये दिले.. व बाकी मी देवळालीला आल्यावर पाहू अशी हात जोडून विनवणी केली.., तरीही माझे चार हजार रुपयांचे नुकसान झाले अशी भाषा वापरून तो भावनाशून्य रुग्णवाहिका चालक तेथून चालता झाला...!
घाटी येथे रुग्णाला दाखल केल्यानंतर अगदी परवा दि. २९ एप्रिल सकाळ पर्यंत त्या रुग्णाचे वडील दिवसातून किमान दोन वेळा माझेसी संपर्कात होते. प्रत्येक फोनच्या सुरुवातीला व शेवटी त्या आई वडिलांना कोविड चाचणी करून घेण्याची विनंती मी करीत होतो.., पण कदाचित आर्थिक कारणास्तव त्यांनी आम्हाला कोणतेही लक्षण नाहीत आम्ही घरी आल्यावर पाहू असेच उत्तरे दिली...
दि. १ मे रोजी सकाळी ०९.१७ वा. मला त्या रुग्णाच्या वडिलांच्या फोनवरून फोन आला.., फोनवर रुग्णाची आई बोलत होती..., त्या म्हणे की यांचा (नवऱ्याचा) फोन येथेच विसरला आहे..., व ते परवाच संध्याकाळी चार वाजता रिक्षात बसून घरी आले आहेत..., शेजारच्या लोकांच्या म्हणण्या नुसार त्यांना बरे वाटत नाही. तेंव्हडे घरी जाऊन पाहता का..? असे विचारले. मी पाहतो काय करता येईल ते असे म्हणून मी फोन ठेवला..., ते नक्की कोविड पॉझिटिव्ह झाले असावेत असा मनात संशय व्यक्त करून व त्यांचेकडे मोबाईल नसलेने काय करावे सुचेना..., म्हणून मी तात्काळ देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत साहेब यांना फोन करून घटना सांगितली व तात्काळ गावातील कोविड सेंटर मधील डॉक्टर, रुग्णवाहिका व नगरपालिकेचे पीपीई किट असलेले कर्मचारी तिकडे पाठवून ते पेशंट गावात हलविण्याची विनंती केली. मुख्याधिकारी साहेबांनी विनंती मान्य केल्याने मी फोन बंद करून त्यांचे शेजारचा नंबर मिळविला.., आणि मला धक्कादायक वृत्त समजले...!
औरंगाबाद च्या त्या रुग्णाचे वडील घरात एकटेच पडलेले आहेत..., दार आतून बंद आहे..., हाकेला कोणतीही प्रतिक्रिया नाही.., खिडकीतून बांबू घालून हलवून पाहिले तर कोणतीही हालचाल नाही अशी धक्कादायक माहिती त्या वडिलांच्या पुतण्याने फोनवर दिल्याने माझे डोळ्यासमोर प्रथम काजवे चमकले..., मी खाली बसलो., काही समजेना.., शेवटी धीर धरून त्या पुतण्याला दार तोडा, तोपर्यंत मी आलोच असे सांगून मी घरून निघालो.
त्या ठिकाणी पोहचलो तर घरात वाघ असल्या प्रमाणे खूप अंतरावर उभे राहून लोक त्या घराकडे पाहत होते. मी सरळ त्या पुतण्या जवळ जाऊन माहिती घेतली, पोलीस आणि डॉक्टर आल्याशिवाय दार तोडायला त्यांनी असमर्थता दाखविलेने मी लगेच देवळाली प्रवरा येथे कार्यरत पोलीस श्री फाटक यांना फोन केला तर ते लाख जातप शिवारात काही कामानिमित्त गेलेची माहिती देऊन १५ ते २० मिनिट लागतील येथून निघायला असे सांगितले. म्हणून मी थेट राहुरीचे पोलीस निरीक्षक श्री दुधाळ साहेब यांना फोन करून घटनेचे गांभीर्य समजावून तात्काळ पोलीस पाठविणेची विनंती केली. दुधाळ साहेबांनी माणसे पाठवितो तोपर्यंत दार तोडा म्हणून सांगितले.., दार उघडल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिका लागेल म्हणून मी पुन्हा मुख्याधिकारी निकत यांना फोन लावला. पण गावातीलच एक अंत्यविधी सुरू असल्याने रुग्णवाहिका आणि आपले कर्मचारी १० मिनिटात पोहचतील असे निकत साहेबांनी सांगितले.., तो पर्यंत दुसरे कोणी डॉक्टर येतील या आशेने मी देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मासाळ यांना फोन केला.., ते म्हणाले मी बाहेर गावी असल्याने माझे असिस्टंट श्री शेख यांना पाठवितो. त्यांना राहुरीहून येनेसाठी अर्धा तास तरी लागेल. म्हणून मी देवळाली प्रवरा येथील खासगी डॉ प्रवीण कोठुळे यांना फोन लावला.., त्यांनी लगेच एक डॉक्टर ला पाठवितो ते पाच मिनिटात येतील असे सांगितले.., आत्तापर्यंत दुपारचे साडेबारा वाजले होते.., फाटक पोलीस आले.., त्यांचे समोर दरवाजा तोडला.., तोपर्यंत डॉ कोठुळे यांनी पाठविलेले डॉक्टर आले .., स्वयंपाक खोलीत दरवाजातच त्या वडिलांचे शरीर निपचित पडले होते.., कोणतीही हालचाल नाही.. डॉक्टरांनी पल्स तपासली.., आणि नाही अशा अर्थाने त्यांची मान हलताच माझे मनात धस्स झाले..., डॉक्टरांनी त्याच्या छातीवर असलेला हात पल्स पाहण्यासाठी खाली करायचा प्रयत्न केला पण शरीर कडक झालेने हात सरळ झाला नाही..!
शरीर कडक झालेचे पाहून माझे डोळे भरून आले.., केवळ मोबाईल औरंगाबाद येथे विसारल्याने ते मला संपर्क साधु शकले नाहीत.., मरताना त्यांना माझी आठवण नक्की आली असणार या जाणिवेने मन व्यथित झाले...,
तोपर्यंत नगरपालिकेचे सॅनिटायझर फवारणी चे ट्रॅक्टर व अग्निशमन वाहनासह नगरपालिकेचे पीपीई किट घातलेले कर्मचारी हजर झाले.. आणि त्यांचे पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारीही..
तोपर्यंत त्या पुतण्याकडून मी अधिक माहिती घेतली असता समजले की आधल्या दिवशी त्रास जाणवू लागल्याने त्यांना सकाळी श्रीरामपूर येथे नेले.., एच.आर.सी.टी. करून आम्ही घरी आलो.., तोपर्यंत मोबाईलवर १५ स्कोर व ८२ ऑक्सिजन रिपोर्ट आला.., देवळाली प्रवरा व राहुरी येथे त्यांना घेऊन रात्री नऊ वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटात व भर पावसात बेड पाहत फिरलो.., पण कुठेही बेड मिळाला नाही.., म्हणून आम्ही पावसात रात्री नऊला घरी आलो, व सकाळी १० वाजता राहुरी फॅक्टरी येथे एक बेड खाली होणार होता.. मग सकाळी दवाखान्यात जाऊ म्हणून मी त्यांना रात्री घरी सोडले.., सकाळी उठवायला गेलो तर आतून कोणतीही प्रतिक्रिया मिळेना.. असे त्या पुतण्याने मला सांगितले.
अद्याप पर्यंत दुपारचे दिड वाजून गेले होते. राहुरीहून डॉ शेख पोहोचले.., त्यांनी त्या बॉडीची तपासणी करून शेवटी औरंगाबाद येथे असलेल्या त्या रुग्णाचे वडील मयत झाल्याचे डॉक्टरांनी अधिकृत घोषित केले..., तदनंतर प्लास्टिक मध्ये लपेटून तो मृतदेह अंत्यसंस्कार साठी रुग्णवाहिकेत घालून देवळाली प्रवरा येथील अमरधाम येथे हलविणेत आला.., आणि आम्ही विषण्ण मनाने घरी परतलो.
केवळ मोबाईल त्यांच्या जवळ असता तरी आपण त्यांना वाचवू शकलो असतो या जाणिवेने मन गहिवरून येते. १ मे या कामगार दिनाचे दिवशी एका कामगाराचा असा मृत्यू झाल्याने ही घटना मनाला खूप खोलवर वेदना करून गेली. शेवटी त्या कोरोना रुग्णाच्या वडिलांचा मृत्यू नव्हे तर तो व्यवस्थेचा बळी ठरला असे या ठिकाणी नमूद केल्यास वावगे ठरू नये असे मला वाटते.
पुन्हा अशी वेळ कोणावर येऊ नये, सर्वांनी यातून काहीतरी बोध घेऊन स्वतःच्या कुटुंबासाठी योग्य ती खबरदारीची उपाययोजना करावी म्हणून हा घटनाक्रम लिहिनेचा छोटासा प्रयत्न... यातून बोध घेवून जर काही रुग्ण आपण वाचवू शकलो तर तीच खऱ्या अर्थाने या मित्राला श्रद्धांजली ठरेल.
आपला नम्र,
आप्पासाहेब ढुस,
देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर.
मो. ९८२३०३५९३६

