shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर :आमच्याकडल्या पुढाऱ्यांचे नेमकं काय चाललंय..?


        हिंगोली सारख्या मागास भागातील संतोष बांगर सारखा आमदार स्वतःची ९० लाखाची बँक डिपाॕझिट मोडून लोकांच्या इंजेक्शन्स व उपचारासाठी वापरतो ; नगर सारख्या ओसाड भागातला पत्र्याच्या घरात राहणारा निलेश लंके सारखा आमदार ११०० बेडचे कोरोना हाॕस्पिटल उभारतो आणि स्वतः तेथे अहोरात्र राबून आपल्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडतो हे पाहून आम्ही प्रगत भागातल्या लोकांनी वर्षानुवर्षे पोसलेले धनदांडगे पुढारी किती कामाचे आहेत? नेमके कसल्या कामाचे आहेत? याची प्रचिती कोरोनाने आम्हाला दिली. दोष त्यांचा नाही तर दोष आमचाच आहे. आम्ही कर्तृत्व दातृत्व पाहून नेतृत्व निवडण्यापेक्षा घराणी निवडली आणि वर्षानुवर्ष मूठभरच लोकं पोसली. 

आज ते permanent सत्तेने सुस्तावलेले पुढारी हे निव्वळ घरबसे ठरले आहेत. कोरोनानं तसं एका दृष्टीनं बरंच केलं. आमच्या ज्या डोळ्यांत पुढाऱ्यांनी धूळफेक केली त्या डोळ्यात कोरोनाने आज अंजन घातलेलं आहे. लाखोंच्या गाड्या फिरवणारे व निवडणूकीत कोट्यानं खर्च करणारे पुढारी अशा काळात आम्ही पैसे दिले तरी साधे दोन हजाराचे इंजेक्शन देऊ शकत नाहीत ही शोकांतिका आहे आणि आणखी किती दिवस केवळ आपल्याच कुटुंबाचे कोटकल्याण व सुरक्षितता याचाच फक्त विचार करणारे पुढारी पोसायचे याचा विचार करायची संधी कोरोनाने दिली आहे. 

जसा कंसाला मारण्यासाठी कृष्णाला , रावणाला मारण्यासाठी रामाला , दुर्योधनाला मारण्यासाठी अर्जुनाला , हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंहाला जन्म घ्यावा लागला तसेच जनतेला जनतेच्या खऱ्या हिताचे पुढारी कळायला कोरोनाला यावं लागलं असंच म्हणावं लागेल. 

निलेश लंके अन् संतोष बांगर यांच्या रूपाने दूरदूरच्या लोकांचे डोळे नक्कीच  खाडकन उघडून गेले आहेत. 

आपल्या ईकडे सध्या कोरोनाने उपचारा अभावी रोज शेकडो लोक मरायला लागले आहेत. दवाखाने अपुरे पडायला लागले आहेत. बेड , आॕक्सिजन,  व्हेटिलेटर , रेमिडेसिव्हीर सगळं काही बेभरवशी झालं आहे. लोकांचा आक्रोश चालू आहे. या गोष्टींची पूर्तता करण्याचे सोडून  पुढारी नुसते  भोंग्याच्या गाड्यांचा पोलीस ताफा घेवून पेठेपेठेत जावून नुसता लाॕकडावून कसा चाललाय याची पाहणी करण्याची नौटंकी करताहेत. काय दुर्दैव आहे आमचं? 

वळीवाच्या वादळी पावसात मोठमोठी झाडं जशी उन्मळून पडताहेत तशी चांगली चांगली धडधाकट माणसं आॕक्सिजन किंवा इंजेक्शन न मिळाल्यानं धडाधड जायला लागल्यात अन पुढारी जाग्यावर बसून वृत्तवाहिन्यां वरून सूचना करताहेत आणि त्यांचे लाभार्थी हस्तक माध्यमांवर 'साहेबाचं काम लई भारी' असे म्हणून त्यांचा उदोउदो करताहेत. तसेच रस्त्यासाठी, देवळासाठी, दिड फूटाच्या पुलासाठी नेत्याने टाकलेल्या चार सहा लाखांच्या निधीच्या पुंग्या वाजवताहेत. जरा तरी काही वाटलं पाहीजे. 

आत्ता माणसं जगणं महत्वाचं आहे का असली ढोंगे महत्वाची आहेत? एखाद्या वर्षी ही कामे थांबली म्हणून काय बिघडेल का? नायतर वर्षानुवर्षे हीच ठेकेदारी चाललीय की! तो पैसा काय त्यांच्या खिशातला आहे का? आमच्याच करातला असतो ना! मग त्याचे एवढे उदोउदो कशाला पाहीजे? आणि ते त्यांचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तर त्यांना निवडून दिलेलं असतं. ती काय मेहेरबानी आहे काय? सध्या नेमकी कशाची गरज आहे? या साऱ्या गोष्टींचा विचार करण्याची तसेच ही सुस्तावलेली व्यवस्था आता बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे. संतोष बांगर व निलेश लंके हे निव्वळ मागास भागातले सर्वसामान्यातले आमदार आहेत म्हणूनच हे करू शकताहेत. शिराळ शेठ काय कामाचे नसतात हेच यातून सिद्ध झालेले आहे. 

कोरोनाने धुमाकूळ घातल्यावर एक एक करत आम्ही सातारला दोनतीन कोव्हिड सेंटर सुरू केली. त्यामुळे दिड दोन महिन्यांपासून दर मिनिटागणीक दूरदूरहून पेशंटच्या नातेवाईकांचे बेडसाठी फोन ,औषधासाठी फोन ,जगण्यासाठीची आर्जव, धडपड या गोष्टी नित्याच्या झालेल्या आहेत. लोकांचे हाल बघून आमचीही झोप उडालेली आहे, आज मी माझे गांवी सुपणे गांवी बरे झालेल्या काही पेशंटना सोडण्यासाठी गेलो होतो. तिथेही सध्या भेसूर चित्र आहे. कारण गांवात कोरोनाचे रूग्ण खूपच वाढलेत व रोज त्यात भर पडतेच आहे. गांवातील लोक एकत्र येवून बऱ्यापैकी उपाययोजना करत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे.आजतर लोकांनी काही वेळातच दहा लाखावर वर्गणी गोळा करून गांवातच आरोग्य उपकेंद्राच्या सहाय्याने एखादे कोव्हिड सेंटर उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

राजकारण गटतट बाजूला ठेवून सारेजण मोठ्या मनाने या कामी जुटले आहेत. पण प्रश्न एकच पडतो की शेवटी लोकांनाच अशा आणीबाणीत पुढे यावे लागत असेल तर निवडून दिलेले पुढारी नेमके कोणत्या कामासाठी आम्ही निवडून दिले आहेत? शिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांनी वर्गणी काढली किंवा अजून देतील म्हणून सगळे व्यवस्थित होईल असेही नाही. कारण त्यास शासकीय मान्यताही त्वरित मिळणे तेवढेच गरजेचे आहे.

ती नाही मिळाली तर मग पैसे तरी काय कामाचे? शेवटी केवळ पैसेच महत्वाचे नाहीत. तसे असते तर पत्र्याच्या घरात राहणारा फाटका आमदार निलेश लंके ११०० बेडचे हाॕस्पिटल सुरूच करू शकला नसता. निःस्वार्थी तळमळीच्या माणसाच्या मागे लोक यथाशक्तीने उभे राहतात. फक्त इच्छाशक्ती पाहीजे आणि राजकारण आडवे येवू नये एवढेच महत्वाचे असते. 

तुम्हाला काय वाटतं! 
काही चुकलं असल्यास क्षमस्व..!

धनाजी पाटील सुपने
7038575553
close