प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- केंद्र सरकारने केलेल्या खत व बियाण्यांच्या दरवाढी ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दुष्काळात हर तेरावा महिना अश्या झाल्या आहेत. कोरोना महामारीने अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा जुलमी निर्णय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खताची वाढवलेली दरवाढ तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे पोहोचवण्याची सोय करावी अशी मागणी केज तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात आधीच शेतकरी वर्ग ग्रासलेला असताना केंद्रातील भाजप सरकारने केलेली ही दरवाढ म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असून ह्याचा तीव्र शब्दात निषेध आहे. सध्या शेतकरी वर्ग बी बियाणे व खते खरेदी करण्याचा घाईत आहे. मात्र भाववाढ झाल्याने आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे भाववाढ कमी करून खते व बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर मिळतील अशी सोय करण्याची मागणी श्री. ठोंबरे यांनी केली आहे.

