प्रतिनिधी । अनिल पवार :-
सोलापूर: "कर्तव्यनिष्ठ सरकारी कर्मचारी, ५० पेक्षा अधिक वय मधुमेहाचा त्रास असताना देखील त्याने आपले कर्तव्य पार पाडले.”
पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा करोनामुळे मृत्यू ..!
करोनाच्या दुसऱ्या लाटेत पार पडलेली पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक पंढरपूरकरांसाठी चांगलीच महागात पडली आहे. निवडणुकीनंतर पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक झाला.
अनेक गावांमध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. करोनाकाळात पार पडलेल्या या निवडणुकीचा फटका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील बसला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या कर्तव्यावरुन घरी परतल्यानंतर काही दिवसांपूर्वी *सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील ५२ वर्षीय शिक्षकाचा करोनामुळे मृत्यू झाला होता.
त्यांनतर कुटुंबातील आणखी तीन सदस्यांचा देखील करोनामुळे मृत्यू झाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रमोद माने यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या आई वडील आणि काकीला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर एकाच आठवड्यात त्यांचेही निधन झाले. एकाच आठवड्यात कुटुंबातीला चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने माने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
“पहिले माझ्या भावाचे निधन झाले त्यावेळी आई वडील आणि मावशीला आयसीयुमध्ये दाखल केले होते त्यांना याबद्दल काही सांगितले नाही”, अशी माहिती नवी मुंबई परिसरात रुग्णालय चालवणाऱ्या डॉ. प्रवीण मानेंनी दिली.
“१७ एप्रिल रोजी प्रमोदला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या कामासाठी बोलविण्यात आले होते. दोन दिवसांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील घेरडी गावी घरी परतल्यानंतर प्रमोदला ताप येऊ लागला. त्यानंतर करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने स्वतःला सांगोलाच्या रूग्णालयात दाखल करून घेतले. माझ्या भावाला सांगोला रुग्णालयात मिळत असलेल्या उपचाबाबत मी खूष नव्हतो. म्हणूनच मी त्याला माझ्या नवी मुंबईच्या रुग्णालयात आणण्याचे ठरवले. त्यानंतर आई-वडिल आणि काकूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना देखील नवी मुंबई येथे हलवले,” असे प्रवीण यांनी सांगितले.
“निवडणुकीच्या कामासोबत माझा भाऊ आपल्या भागातील कॉन्टॅक्ट ट्रेसींगचे ही काम करत होता.
निवडणुकीच्या ड्युटी दरम्यान किंवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दरम्यान नेमके कोठे करोनाची लागण झाली याची खात्रीदायक माहिती नाही,” असे डॉ. माने यांनी सांगितले.
“प्रमोद जो आपल्या कामासाठी ओळखला जात होता त्याला त्याच्या कुटुंबाने कॉन्टॅक्ट ट्रेसींगचे काम न करण्याचा सल्ला दिला होता. सरकारी कर्मचारी, ५० पेक्षा अधिक वय मधुमेहाचा त्रास असताना देखील त्याने आपले कर्तव्य पार पाडले.”
डॉ. माने म्हणाले की, माने यांच्या कुटुंबातील चारही सदस्यांना आधीपासून काही विकार होते. कोणाला हृदयविकाराचा तर कोणाला मधुमेहाचा त्रास होता. सुरुवातीला उपचारांना त्यांनी योग्य साथ दिली, परंतु त्यांच्या ऑक्सिजन पातळी अचानक खाली गेल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. सर्व प्रयत्नानंतरही चौघांना वाचवण्यात अपयश आल्याचे माने यांनी सांगितले. “सलग चार दिवस मी माझे चार सदस्य गमावले”, असे माने यांनी सांगितले.
“भावाच्या मृत्यूसाठी निवडणूकीला जबाबदार ठरवणे मला आवडणार नाही. मला राजकारण करण्याची इच्छा नाही. माझ्या माझ्या आपले कर्तव्य पार पाडले पण त्यामुळे माझ्या आई वडिल आणि काकूला करोनाची लागण झाली,” असे डॉ. माने म्हणाले.
.

