शिर्डी । प्रतिनिधी ( तुषार महाजन ) :
कै.मुकेश सातपुते या एका तरुण आणि उमद्या शिवसैनिकाचे अकाली जाण्याने सातपुते कुटुंबासह संपूर्ण आशवी गटासह राहाता आणि संगमनेर तालुक्यातील सामान्य शिवसैनिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते मुकुंद सिनगर यांनी दिली.
नुकतेच शिर्डीतील साईआश्रया अनाथाश्रमात फळे वाटप करून सामाजिक जाणिवेतून कै. मुकेश भाऊंना श्रद्धांजली वाहताना उपस्थित सर्वजण भावुक झाले होते.यावेळी त्यांचे बंधू संगमनेर तालुका शिवसेनेचे गणेश सातपुते सर यांच्यासह राहाता तालुका शिवसेनेचे मिनिनाथ शिंदे, रिंकेश जाधव, विकास सुरासे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे खासदार आदरणीय सदाशिव लोखंडे साहेब यांनी शोकसंदेश पाठवत सातपुते कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. कै. मुकेश भाऊंचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 29 व्या वर्षी अकाली दुःखत निधन झाल्याने त्यांच्या परिवारावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांचे बंधू गणेश यांना नेहमीच सामाजिक कार्याची आवड असल्याने कै. मुकेश यांचा पहिला महिना अनाथ मुलांना फळे वाटून करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला.
खऱ्या अर्थाने माणूस गेल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सामाजिक जाणिवेतून सातपुते कुटुंबाने आजची केलेली सेवा समाजाला नक्कीच प्रेरणादायी असल्याचे मत युवानेते मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले. श्री साईबाबांनी आपल्या हयातीत संपूर्ण मानव जातीची निस्वार्थ सेवा केली, याच विचाराने प्रेरित होऊन साईआश्रया परिवाराचे चालक श्री.गणेश दळवी अतिशय कष्टातून एकूण 125 मुले आणि 25 वृद्धांसह परिवाराचे पालनपोषण करत आहेत.
यांना अन्नदान करण्यासारखे पुण्य नाही, म्हणूनच सातपुते कुटुंबाचा आदर्श घेऊन प्रत्येक माणसाने आपले सुख-दुःख या परिवारासोबत घालवले तर आपले दुःख नक्कीच कमी होण्यास मदत होणार असल्याची भावना साईभक्त मुकुंद सिनगर यांनी व्यक्त करत समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी सातपुते कुटुंबातील सदस्य श्री.रेवजी देवराम सातपुते, बाळासाहेब लहानु सातपुते, दत्तात्रय सिताराम सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

