इंदापूर तालुक्यातील शेतकरी संतापले, काळया फिती बांधून निमगाव केतकीत आक्रोश.

इंदापूर प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील गावांना शासनाने पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी हा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रचंड संतापले असून त्यांनी बुधवारी निमगाव केतकी, बेलवाडी, हिंगणगाव, इंदापूर शहर व आपापल्या परिसरात शासनाच्या विरोधात आमच्या हक्काचे पाणी पाच टीएमसी आम्हाला मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत संताप व्यक्त केला.
इंदापूर तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव केतकी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळया फिती बांधून शेतकऱ्यांनी इंदापूर - बारामती रस्ता रोको करत, झालेल्या निर्णयाचा जाहीर निषेध केला.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच टीएमसी उजनी धरणातून पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हा निर्णय रद्द झाला ही गोष्ट अत्यंत शेतकऱ्याच्या मनाला दुःख देणारी आहे. तरी देखील पाणी संघर्ष कृती समिती तालुक्याच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची भूमिका अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केले
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, समितीचे उपाध्यक्ष गणेश झगडे, बाळासाहेब करगळ , बाजार समितीचे माजी सभापती हनुमंत वाबळे ,दत्तात्रय शेंडे ,डॉक्टर शशिकांत तरंगे, युवा नेते किरण बोरा, अभिजित रणवरे ,एडवोकेट लक्ष्मण शिंगाडे, सागर मिसाळ, निमगाव चे सरपंच प्रवीण डोंगरे,माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे , रासपचे किरण गोफने, संतोष राजगुरू, भजनदास पवार, बाबासाहेब भोंग , संदीप भोंग अतुल झगडे सुरेश शिंदे ,विरसिंह रणसिंग,नंदकुमार रणवरे, मार्केट कमिटी चे संचालक सचिन देवकर,युवक तालुकाध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर,नवनाथ रूपनवर, इत्यादी अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न.
राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी इंदापूर तालुक्याला उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी दिले जाणार नाही. अशी घोषणा केली या निषेधार्थ एका शेतकऱ्याने कृती समितीच्या बैठकीत अक्षरशा जीवाची तमा न करता, अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांनी प्रसंग अवधान राखून तात्काळ हालचाल केल्यामुळे अनर्थ टळला.

