भौगोलिक दृष्टया भारताचा विचार केला तर भारतात उष्ण व दमट वातावरण असते. त्यामुळे भारतातील खेळपट्टयाही आपोआप शुष्क बनतात. त्यामुळे भारतात जलदगती गोलंदाजांना पोषक खेळपट्टया बनविल्या जात नसत. त्यामुळे वेगवान गोलंदाजीकडे भारतातील नवोदित मुलं फारसे वळत नव्हते. सन १९३२ मध्ये भारताने आपला अधिकृत कसोटी सामना खेळला.
तेंव्हापासून भारताकडे उत्कृष्ठ दर्जाच्या फिरकी गोलंदाजांची फौज होती. भारतात सामने असले तर फिरकी गोलंदाज वेगवान गोलंदाजांची उणीव जाणवू देत नसत. मात्र परदेशात जेंव्हा भारताचा संघ जायचा तेंव्हा तेथे जलदगती गोलंदाजांना मदत करणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टया मिळत असे. मात्र त्या काळी व नंतरही खास करून कपिलदेवच्या उदयापर्यंत भारताकडे दर्जेदार वेगवान गोलंदाजच नव्हते. भारतीय संघाचा प्रत्येक कर्णधार चार - चार फिरकी गोलंदाज घेऊन संघाचा भार वाहायचे. नवा चेंडू वापरण्यासाठी त्यावेळी एखाद्या कामचलाऊ मध्यमगती गोलंदाजांचा उपयोग केला जायचा.
हे काम अगदी अबिद अली, एकनाथ सोलकर, मोहिंदर अमरनाथ इतकेच नव्हे तर अगदी सुनिल गावस्करचाही उपयोग केला जायचा. भारताकडे प्रभावशाली वेगवान गोलंदाज नसल्याने भारताच्या फलंदाजांनाही वेगवान गोलंदाजीवर खेळण्याचा सराव मिळत नसे. त्यामुळे खास करून परदेशात भारताची फलंदाजी वेगवान माऱ्यासमोर ढेपाळायची व भारताला मानहानीकारक पराभव पत्करावे लागायचे.
सन १९७८ मध्ये पाकिस्तान दौऱ्याच्या माध्यमातून कपिलदेवचे भारतीय संघात आगमन झाले आणि भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांची पहाट झाली. कपिलने आपल्या धारदार व भेदक गोलंदाजीने जगभरातल्या नामांकीत संघांच्या नामवंत फलंदाजांची भंबेरी उडवायला सुरूवात करताच भारतीय संघात नवीन चैतन्य आले. कपिलने देशातच नव्हे तर परदेशातही लक्षवेधी कामगिरी केली. कपिलच्या प्रेरणादायी गोलंदाजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अनेक नवोदित खेळाडूही वेगवान गोलंदाजीकडे वळायला सुरुवात झाली.
सन १९८३ मध्ये कपिलसह रॉजर बिन्नी, मदनलाल, बलविंदरसिंग संधू या मध्यम जलदगती गोलंदाजांच्या धारदार माऱ्यामुळे भारताला क्रिकेटचा विश्वकरंडकही पटकविता आला. त्यानंतर मात्र भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला. कपिलदेव जेंव्हा निवृत्त झाला तेंव्हा त्याच्या खात्यावर ४३४ इतके जगभारातील सर्व गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी नोंद झाले होते.
चेतन शर्मा, मनोज प्रभाकर, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मीपती बालाजी, मुनाफ पटेल, शांताकुमारन श्रीशांत, आर पी सिंग, इरफान पठाण व झहीर खान यांनी भारतीय वेगवान गोलंदाजी योग्य मार्गाने जात असल्याचे दाखवून देत परदेशी फलंदाजांच्या मनात भारतीय जलदगती गोलंदाजांविषयी दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली.
कपिलदेव नंतर झहीरखान ३११, ईशांत शर्मा ३०३, जवागल श्रीनाथ २३६ यांनी भारतीय वेगवान गोलंदाजीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या गोलंदाजांच्या शानदार कामगिरी व नावलौकीकामुळे भारतातील अनेक नवयुवक जलदगती गोलंदाजीकडे वळायला लागले. बीसीसीआयने त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलत सन १९९० च्या दशकात ऑस्ट्रेलियाचा ख्यातनाम वेगवान गोलंदाज डेनिस लिलीच्या मदतीने वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षित करण्यासाठी मद्रास येथे एमआरएफ पेस फौंडेशनची स्थापना केली. त्यानंतर बंगलोर येथेही राष्ट्रीय क्रिकेट अकाडमी स्थापन करून वेगवान माराच नव्हे तर भारतीय क्रिकेटलाच जोरदार चालना दिली.
सन २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारताने टि -२० क्रिकेटचा विश्वचषक याच जलदगती माऱ्याच्या जोरावर पटकविला तर सन २०११ मध्ये एकदिवसीय सामन्यांचा विश्वकप जिंकला. यामध्ये संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक २१ बळी घेणारा गोलंदाज होता झहीर खान !
कपिलदेवने सुरू केलेली वेगवान गोलंदाजांची परंपरा आजच्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर हे प्रभावी पणे पार पाडत असून या गोलंदाजांनी आपल्या भेदक, धारदार व वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या बळावर जगभरातल्या तमाम फलंदाजांच्या काळजात निव्वळ भितीदायक वातावरणच निर्माण केले नसून परदेशात जाऊन आपले नाणेही खणखणीत वाजवून गेल्या पाच वर्षात भारताला आयसीसीच्या कसोटी मानांकनांत अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे.
इतकेच नाही तर वनडे व टि-२० या सफेद चेंडूंच्या खेळातही भारत पहिल्या तीन क्रमांकावर आहे. यामध्ये या जलदगती गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. हेच वेगवान गोलंदाज येत्या जून महिन्यात इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन येथे न्यूझिलंड विरुद्ध भारताला कसोटी विश्व अजिंक्यपदाची फायनल जिंकून देण्याचा दमखम बाळगून आहे.
एवढेच नाही तर या गोलंदाजांशिवाय टि नटराजन, दिपक चहार, नवदिप सैनी, आवेश खान, चेतन सकारीया, कार्तिक त्यागी, हर्षल पटेल, अर्शदिप सिंग, अरझान नागवसवाला व इतरही नवोदित वेगवान गोलंदाज भारतीय तेज आक्रमणाची धुरा सांभाळण्यास तयार झाले आहेत.
त्यामुळे जगभरातील तमाम संघांच्या वेगवान गोलंदाजांच्या ताफ्याकडे बघितले तर भारताचे वेगवान गोलंदाज जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी होण्याची क्षमता बाळगून आहेत. एवढेच नव्हे तर ते त्यांनी वेळोवेळी सिद्धही केले असून भारताचा वेगवान मारा इतर संघांच्या तुलनेत काकणभर सरसच वाटतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com.

