पिंपरी चिंचवड:-चौकशीसाठी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला असता त्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला 50 फूट फरफटत नेले. वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (दि.28) रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दुचाकी चालकाला अटक करण्यात आली आहे.
संजय एकनाथ शेडगे (वय 42, रा. आढाले, मावळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शंकर तुकाराम इंगळे (वय 47) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी आहे. याठिकाणी फिर्यादी पोलीस कर्तव्य बजावत असताना (एम एच 12 एफ जे 6156) या दुचाकीवरून आलेल्या आरोपीला चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला.
चालकाने गाडी बाजूला घेतली, त्याला लायसन्स, कागदपत्रांची विचारणा केली असता, तो धक्का देऊन पळ काढू लागला. फिर्यादी यांचा हात गाडीच्या कॅरेजमध्ये अडकला होता तरीही आरोपीने फिर्यादी यांना 50 फूट फरफटत नेले. यामध्ये फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली आहे.

