प्रतिनिधी । आसावरी वायकर :
करमाळा (दि .२४ ) : शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल उपलब्ध करून दया . अशी 'शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह ' मध्ये २२ मे रोजी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या बातमीला आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे तसेच युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांच्या पाठपुराव्याला जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे .
मा.मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर
शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोल साठी अडवणूक करण्याच्या कोणत्याही सुचना दिलेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची पेट्रोल पंप चालक व पोलीसांनी अडवणूक करु नये . तसेच मी सर्वांना तात्काळ तशा सुचनाही करतो असे आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना दूरध्वनीवर बोलताना दिले आहे.
युवा सेनेचे तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन पाठवले होते .या अनुषंगानेच चिवटे यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणुन दिले .
अत्यावश्यक व शासकीय, वाहने,वैद्यकीय वाहने,अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या वाहना व्यतिरिक्त इतर वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल देवु नका असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला होता . मात्र यामुळे शेतकरी, कोविड सेंटर, हाॅस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड अडवणुक होत होती.
मोटर सायकलवर ड्रम बांधून ट्रॅक्टर जेसीबी साठी डिझेल आणावयास गेलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी डिझेल तर दिले नाही मात्र सालसे येथील एस्सार पेट्रोल पंपावर एका बिट हवालदाराने शेतकऱ्यांना प्रचंड दमबाजी करत पाचशे रु दंड ठोठावुन दोन ते अडीच तास आडकवुन ठेवले ,वडिलांच्या तेराव्या साठी फोटो घेऊन निघालेल्या एका व्यक्तीला दोन तास ताटकळत ठेवुन पाचशे रुपये दंड केला होता , शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरुद्ध युवा सेनेचे शंभुराजे फरतडे यांनी आवाज उठवला होता .
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसताना ज्या शेतकऱ्यांच्या मोटार सायकलला ट्रॅक्टर जेसीबी साठी डिझेल नेण्यासाठी ड्रम असेल किंवा ज्यांचे नातेवाईक रुग्णालयात अथवा कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत त्यांची पेट्रोल पंप चालक ,व पोलीसांनी अडवणूक केल्यास युवा सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे ,तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे ,शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी दिला होता .
पेट्रोल डिझेल उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनी सर्वांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

