सन १९३२ मध्ये भारताने इंग्लंड विरूद्ध लॉर्डसवर आपला पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना खेळून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा श्रीगणेशा केला. त्यानंतर तब्बल ८९ वर्ष भारत मायदेशात नाहीतर परदेशात ज्या देशाविरूद्ध कसोटी आहे त्यांच्या भूमीवर कसोटी सामना खेळले आहे. मात्र कसोटी खेळणाऱ्या बारा पैकी कोणत्याही देशाविरूध्द तटस्थ देशात कसोटी खेळण्याचा योग भारत व बांगलादेश या दोन देशांना अजून आला नव्हता. परंतु येत्या १८ जून पासून विश्व कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन येथील रोझ बाऊल मैदानावर न्यूझिलंडविरूध्द भारत खेळणार आहे. या प्रकारे तटस्थ देशात कसोटी सामना खेळण्याचे भारताचे स्वप्नही साकार होणार आहे.
प्रस्तुत लेखात आपण तटस्थ ठिकाणी खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या इतिहासावर एक नजर टाकूया.सन १९१२ मध्ये म्हणजे १०९ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या तीन देशांदरम्यान तिरंगी कसोटी मालिका खेळली गेली. या तिरंगी मालिकेतील इंग्लंड व द. आफ्रिका या दोन संघात साखळीतील कसोटी सामना २७ व २८ मे १९१२ रोजी संपन्न झाला. दोन दिवसांत संपलेल्या मँचेस्टर येथील कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव व ८८ धावांनी फडशा पाडला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तटस्थ ठिकाणी खेळला गेलेला हा पहिला कसोटी सामना होता.
सन २००९ मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना लाहोर येथे गदाफी स्टेडीयम बाहेर श्रीलंकेच्या खेळाडूंच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात श्रीलंकेचे दोन खेळाडू जखमी झाले. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर कोणत्याही परदेशी संघांनी पाकिस्तानमध्ये कसोटी दौरा केला नाही. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी मार्च २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळला.
या बारा वर्षांच्या कालखंडात पाकिस्तान आपल्या हिस्स्याचे कसोटी सामने श्रीलंका व युएई मध्ये खेळले. त्यामुळे काही संघ तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये न्यूझिलंडचाही समावेश असून सन २०१४ ते १८ या कालखंडात ते सहा कसोटी सामने तटस्थ ठिकाणी खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात न्यूझिलंडला विजय मिळाला, दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला तर एक सामना अनिर्णित राहिला. सन २००७ नंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे कसोटी क्रिकेट पूर्णत: बंद असल्याने भारताला तटस्थ ठिकाणी कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही.
सन १९९९ मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश यांच्या दरम्यान आशियाई कसोटी अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाला. परंतु दुर्देवाने पाक व श्रीलंकेने अंतर्गत प्लॅन करून भारताचा गेम केला आणि अंतिम सामना खेळण्यापासून भारताला वंचित ठेवले. त्यामुळे भारताला तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळण्याची संधी गमवावी लागली.
पाकिस्तान मागील २० वर्षातील बरेचसे कसोटी सामने तटस्थ ठिकाणीच खेळले आहे. त्यामुळे तटस्थ ठिकाणी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तान तटस्थ ठिकाणी ३९ सामने खेळले असून त्यापैकी १९ सामने जिंकले, १२ हारले तर आठ सामने अनिर्णित राहीले.
तटस्थ ठिकाणी पाकिस्तान पाठोपाठ सर्वाधीक बारा सामने ऑस्ट्रेलियाने खेळले असून त्या पाठोपाठ श्रीलंका - नऊ, दक्षिण आफ्रिका - सात, न्यूझिलंड, वेस्ट इंडिज व इंग्लंड प्रत्येकी सहा कसोटी यांचा क्रम लागतो. नवखा अफगाणिस्तानचा संघही आपले चार सामने ( भारत व युएई मध्ये ) खेळले आहे. झिंबाब्वेनेही दोन कसोटी सामने अफगाणिस्तानविरूध्द अबुधाबी येथे खेळले तर आयर्लंड व आफगाणिस्तान यांच्यातील एक कसोटी सामना भारतात डेहराडून येथे खेळविण्यात आला होता.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com.

