महाराष्ट्र राज्याला वैभवशाली परंपरा - हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र राज्याला एक मोठी वैभवशाली परंपरा असून महाराष्ट्राने देशात आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले नाव उंचावले असल्याचे मत व्यक्त केले आहे.
१ मे१९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतो. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा दिवस आपण गेल्या वर्षी आणि यावर्षी साजरा करीत आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात आपले नाव उंचावले असून आज देखील देशात व राज्यात कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र या संकटावर मात करीत पुढे वाटचाल करीत आहे. आज कामगार दिन असून श्रमप्रतिष्ठा प्रती असणारे महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस कामगारांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करणारा दिवस आहे.
आज कोविड-१९ पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना योद्धे ज्यामध्ये डॉक्टर्स, नर्स, पोलीस, प्रशासन, कर्मचारी मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना करीत राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या कोरोना योद्ध्यांच्या कार्याला सन्मान करून राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

