" पडीक " लेखिका-स्वाति जाधव..!
"हे बघ हारवाल्याची ऑर्डर सुद्धा फायनल झाली आहे... आजीला मोगऱ्याची फुलं खुप आवडतात ना, मग त्याचाच सुंदर हार ठरवला आहे.. आणि डाळिंबी रंगाची फिकट गुलाबी पैठणी, ती देखील आज फायनल झाली.. एक तन्मणी... आज येईल ते कुरिअर... आजी एकदम खुश आहेत रे.. मला फार समाधान वाटतं त्यांना बघून.." असं म्हणत रेवाने डोळ्यांच्या कडांमध्ये आलेलं पाणी अलगद टिपलं.
तसा सर्वेशने तिचा हात हातात घेतला, "खरंतर तुझ्यामुळे हे सगळं छान होतंय. तू उभं केलंस आजीला, नाहीतर आम्ही हरलो होतो गं. म्हणून तर चिडचिड करून आई, काकु, वहिनी, सगळ्यांनी बोलणं सोडून दिलं होतं तिच्याशी. सांभाळून घेत होते तिला सगळे, पण उभं करू शकत नव्हते.
पडीक भिंतीसारखी झाली होती गं ती घरात. अस्तित्व तर होतं, पण ढासळलेलं. मनोरुग्ण म्हणून त्याही भरपूर गोळ्या झाल्या, पण काही गुण नाही. खरंतर जिच्या अंगा खांद्यावर खेळलो त्या आजीला असं बघून जीव कासावीस व्हायचा गं.
आपल्या लग्नानंतर तुला हे सगळं सांगायचं होतं, पण तुझ्या हातावरची मेंदी नाही गेली आणि मला ऑफिसचा कॉल आल्याने लंडनला जावं लागलं.
मला सतत वाटायचं तुला म्हणावं, 'तू बघ आजीशी बोलून', पण परत वाटलं, नवीन आहेस या घरात. थोडं रुळली कि सांगु.
पण रेवा चार महिन्यात तू तर सगळं बदललंस. तू आलीस आयुष्यात माझ्या आणि खुप काही दिलं आहेस. थँक्स हा शब्द अपुरा आहे त्यासाठी.."
तशी शुन्यात हरवत रेवा म्हणाली, "मला ना लहानपणापासून आजी हे घरातलं पात्र खुप आवडायचं, पण माझं दुर्दैव, दोन्हीकडे आजी नाही. वाड्यातल्या मैत्रिणीची आजी जीव लावायची, पण ते सुरकुतलेले हात, तो मायेचा स्पर्श, तो मात्र हवासा वाटायचा.
मला ना सर्वेश, अगदी असं भरलं घर मिळावं म्हणून मी हरतालिकेच्या महादेवाला कायम प्रार्थना करायचे. खुप शिक्षण, पदव्या असल्या तरी ह्या निसर्गनिर्मितीच्या मास्टरवर माझा विश्वास आहे. आपली प्रार्थना हि ह्या वातावरणात पोहचून कधीतरी आपल्याला त्याचे रिटर्न्स देते हे सुद्धा मी खूपदा अनुभवलं आहे.
तुझ्या घरातला प्रवेश हा माझ्या आयुष्यातलं फार सुंदर वळण होतं. प्रायव्हसीच्या नावाखाली एकट्यानेच जगायचे, आनंद लुटायचे, जीव लावणारी माणसं अंतरावर ठेवायची, तोंड देखला पाहुणचार करत पुन्हा नंतर साधा चौकशीचा फोन देखिल करायचा नाही, हे असलं तुटक वागणं मला नकोच होतं.
मला हवी होती माणसं... भरभरून प्रेम करणारी, चिडणारी, रागवणारी, परत समजावून जवळ घेणारी, खळखळून हसणारी, बरणीतल्या लोणच्याच्या फोडीसारखी एकमेकांच्या प्रेमाने खारवून जाऊन एकत्रच आयुष्यात मुरण्याचा आनंद घेणारी.. ती सगळी सापडली तुझ्या घरात. फक्त आजी मात्र खटकली.. अशी का झाली असेल?
प्रत्येकाकडून जाणून घेतलं. मग कळलं, आजोबांनी ह्या प्लॉटवर बांधलेलं हे अपार्टमेंट.. कारण कळलं, पण ह्यावर आजीशीच बोलायचं असं ठरवलं,..
एक दोन दिवस बळजबरी आजीच्याच खोलीत झोपले. आजी गप्प, सुन्न, नेहमीसारखी.. सासुबाई म्हणाल्या,"अगं नको नादी लागुस त्यांच्या. नाही बोलणार त्या. काय मनात घेऊन अश्या झाल्या कुणास ठाऊक,..?"
पण मी नाद सोडला नाही. आजीसारखी एकटक बघते तिकडे मी बघायला लागले आजीच्या त्या खिडकीतून, तर मला दिसलं ते मागचं जुनं घर, जिथे आयुष्य गेलं त्यांचं. मग मला लक्षात आला त्यांच्या मनाचा सल.
मग मीच मागे गेले आपल्या कामवाल्या मावशींना घेऊन. त्यांच्याकडून दारासमोर वाढलेलं गवत काढून घेतलं. ओटा स्वच्छ केला आणि आजीला बळजबरी तिथे घेऊन गेले. चहाचे कपही नेले आधी.
क्ष आजी गप्पच होत्या. मग मीच बडबड करत सुटले. त्या पडक्या घराच्या खिडकीतुन डोकावत म्हंटल, "इथे देवघर होतं का? शेंद्री कोनाडा दिसतोय.."
तसं त्या बोलायला लागल्या.. "हो, तिथे माझ्या विठुची मूर्ती होती, काळीभोर.. घराची वाटणी झाली. हि खोली आपल्या वाट्याला आली तेंव्हाच ह्यांना म्हंटले होते, मला इथे छोटंसं विठुचं मंदिर करू द्या.. पण फार नास्तिक होते. मला म्हणाले, "तुझा विठूच देऊन टाक कोणाला तरी,.."
मला फार वाईट वाटलं गं. कष्टात दिवस काढून ह्यांच्या संसाराला हातभार लावला, आणि माझी मेलीची मागणी ती काय फक्त एवढी.. कारण घराचे बाकी सगळे डिझाईन बिल्डर आणि पुढची पिढी त्यांना सोपं जाईल तसं करणार. मला त्याचं काही वाटत नव्हतं गं.. पण माझ्या विठूवर का एवढा राग..?
खरंतर सगळ्यांनी समजावलं. लेक, सुन सगळे म्हणाले " बांधु छोटसं देऊळ" पण नाहीच ऐकलं. हि जागा जी कधीकाळी शेण सडा करून मी प्रसन्न करायचे. जिथं मिणमिणता दिवा मनाला प्रकाशित करायचा, तिथं हळूहळू सगळं पडीक झालं गं,.. अंधार पसरला.
हे गेले, पण जाईपर्यंत एकदा सुद्धा म्हटले नाही कि 'मी तुझी हि ईच्छा पूर्ण केली नाही'.. वाईट वाटलं. ज्याच्यासोबत आयुष्य गेलं त्याला एवढीही खंत कधी वाटू नये... विठ्ठल मात्र माझ्या जवळ तसाच आहे जपलेला. छोटी रखुमाई पण आहे त्याची, ट्रंकेत बसलेली.."
आजी परत शुन्यात गेली. त्या जागेची हि जादू होती का,..? असं मला वाटलं.. मग मी रोजच आजीला तिथे नेत होते. आजी उलगडत गेली,..
फार छोट्या अपेक्षा घेऊन ह्या बायकांनी संसार केलेले असतात रे, आणि मग त्याचे सल असे उतारवयात येत असतील मनात..
आजीला माहेरवरून आलेला 'तन्मनी' आजोबांच्या एका उद्योगात विकावा लागला म्हणे.. 'तुला डाळिंबी पैठणी घेऊ' असं नुसतंच म्हणत राहिले, अशी तक्रारही होती आजीची..
बऱ्याच गंमती सांगितल्या, पण एक मात्र आजी खरं बोलली.. 'जोडी विरुद्ध होती आमची. ते नास्तिक तर मी देवभोळी.. त्यांचा कष्टावर विश्वास होता, पण काही उद्योग करायला गेले तर मी नामस्मरण सोडत नव्हते.. विरुद्ध असलो तरी संसाराला पुरक होतो म्हणुन इथपर्यंत आलो.. आज हे वैभव पाहायला मिळालं..' म्हणत आजी गोड हसली...
मला म्हणाली,"तुला दाखवते माझे विठ्ठल रुखमाई. आजीने ट्रंक उघडली. त्यात आजीचा त्याकाळी दुसरी पास झाल्याचा दाखला दिसला. त्यावर जन्मतारीख दिसली. आजीचा एक्यांशीवा वाढदिवस....
मग ठरवून टाकलं, सगळी हौस करू.. सगळ्यांशी बोलले. सगळे खुशीत तयार झाले. बाबा तर म्हणाले, "माझ्या बाबाने नाही दिलेलं गिफ्ट मीच देतो तिला." म्हणून तर तू सकाळी मागे जाऊन बघ, मस्त छोटसं देऊळ बांधलं आहे. आजीला वाढदिवसाला हे मोठं सरप्राईज आहे.
सध्या तिची खिडकी मीच बांधकाम करण्यापूर्वी बंद केली. म्हंटलं, 'पलीकडे नवीन इमारत होतेय, त्याची धुळ येईल खोलीत.' रोज म्हणतात 'खिडकी कधी उघडायची'.. मला तर फार छान वाटतंय आजीला आनंद देताना.
सर्वेशने परत तिला जवळ घेतलं. मला पण अशीच बायको हवी होती, माझ्या आजीपासून सर्व माणसं जपणारी.. मी हरतालिका नव्हतो करत, पण आजी जवळची ती रुखमाई मला वाटायचीच कौतुकास्पद, खांद्याला खांदा लावून उभी असलेली. मग मी ही प्रार्थना करायचो, विठ्ठलाचे भक्त सांभाळणारी त्याची रखु, तशी आपल्याला मिळावी आपली माणसं सांभाळणारी, आणि मग तुझ्या प्रार्थना रिटर्न्सचा फॉर्म्युला चालला की गं मस्त, म्हणुन तर तू आलीस जिवणात" म्हणत त्याने तिला कुशीत ओढलं तशी लाजत ती म्हणाली,.. "चल, मला आणखी खुप कामं आहेत.."ती पळाली.
सकाळपासुन जरा जास्तच गडबड जाणवली तसं आजी म्हणाली, "रेवा, अगं आज काही कार्यक्रम आहे का? फुलांचे सुवास येत आहेत.. बारिक सनईचा आवाज येतोये गं.."
रेवा म्हणाली, "हो, आहे कार्यक्रम, आणि त्यासाठी मी तुम्हांला माझ्या हाताने आवरून देणार,.." म्हणत डाळिंबी पैठणी तिने समोर धरली.. आजी हरखलीच अगदी. तिला हवी तशी ती पैठणी, नऊवारी..
रेवाने सगळं छान आवरून दिलं.. रेवाची सासु मदतीला आली.. 'तन्मनी' घातल्यावर तर आजी सारखी त्याला हातात घेऊन निरखत होती.. आजी कशालाच 'नाही, नको' म्हणत नव्हती..
आजीला हॉलमध्ये आणलं. सगळ्यांनी 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' म्हणत फुलं उधळली आजीच्या डोक्यावर.. रेवाचे सासरे म्हणाले, "आई, नात सुनेने केलेला थाट आवडला का,..?"
आजी अगदी भरभरून म्हणाली, "हो खुप आवडला,.."
सर्वेश म्हणाला, "आजी, अगं खरं गिफ्ट तर बघ अजुन.." म्हणत सगळे मागच्या पडीक घराकडे निघाले. आजी हसत म्हणाली, "अगं रेवा, आपली चहा पिण्याची जागा सगळयांना सांगितली का? तिथेच सगळ्यांनी चहा घ्यायचा का आज..? कशाला चाललो आपण पडीक घराकडे..?"
तेवढ्यात समोरचं दृश्य बघून आजी स्तब्ध झाली.. डोळे झरझर वाहायला लागले.. पडीक जागा हरवली होती. तिथे उभं होतं टुमदार देऊळ, आणि त्यात आजीचे विठू रुखमाई,.. बाजुला चकचकीत पितळी समई, तिच्या ज्योतीचा प्रकाश काळ्याभोर विठूवर प्रसन्नता आणणारा, अगदी तसाच, जसा आता आजीच्या चेहऱ्यावर...
रेवा म्हणाली,"आजी, हे तुमच्या आवडीचे मोगऱ्याचे दाट हार.. घाला त्यांना."
वाढदिवस झाला खरा साजरा,.. आजी आनंदाने इतकी रडत होती कि मध्येच सगळं धूसर होत होतं,... सावळा विठू तिच्याकडे पाहून हसतोय असा तिला भास झाला.. तिने थरथरत हार घातले..
सर्वेशला आठवली आपल्या लग्ना आधीची पडीकआजी आणि आजची आजी, अगदी ह्या विठ्ठलासारखी प्रसन्न झालेली.. मोगऱ्याने दरवळणं सुरू केलं होतं.. जसं पडीक जागेने आणि पडीक माणसानं..
रेवा सर्वेश जवळ येऊन म्हणाली, "नक्कीच आजी विठूला ह्या देवळाची प्रार्थना नेहमी करत असेल म्हणून तर युनिव्हर्सने तिची प्रार्थना पूर्ण केली.."
सर्वेश म्हणाला," मी ही प्रार्थना केली आहे, तुला या क्षणी मिठी मारण्याची,.."
रेवा एकदम हसली. त्याला एक धक्का देत पळाली. सर्वेश तिला बघतच राहिला. मनात म्हणाला.. 'तू अशीच उत्साही राहा, अगदी पडीक जागाही चैतन्यमयी करणारी....'
त्याला या विचारा क्षणी जाणवलं, विठ्ठला जवळची रुखमाई त्याला बघुन हसत होती.... मोगऱ्याची दरवळ आता जास्तच जाणवत होती...
मित्रांनो, विचार करा, आपल्या घरी आपली आजी, आई, अर्धांगिनी, आजोबा, वडील, यांची कोणती छोटी अपेक्षा आपल्याकडून नकळत राहिली आहे का? विचार करा व कृती करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य मिरवू यात, त्यांचे क्षण सुखकर करू यात..!!
लेखिका-स्वाति जाधव.
माहिती संकलन:
मेघःशाम सोनवणे 9325927222)
माजी वायु सैनिक श्री. तानाजी कदम, पुणे यांच्या सौजन्याने.

