२५ ते २८ जून १९३२ या कालावधीत भारताने लॉर्डस विरूध्द आपला पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड विरूध्द खेळला. त्यानंतर सन २०२१ च्या ४ ते ६ मार्च या कालावधीत इंग्लंडविरूध्दच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. या ८९ वर्षांच्या प्रदिर्घ कालखंडात भारत एकूण ५५० कसोटी खेळले असून त्यातील १६२ सामने जिंकले, १६९ गमावले, २१८ सामने अनिर्णित राहीले तर एक सामना टाय झाला. या सर्व सामन्यात भारताने एकूण ३०२ खेळाडूंना कसोटी कॅप देऊन मैदानात उतरवले. भारताचा पहिला खेळाडू बनण्याचा मान तत्कालीन कर्णधार सी.के. नायडू यांना मिळाला तर शेवटचा खेळाडू अक्षर पटेल ठरला.
भारताने या ८९ वर्षात क्रिकेटच्या मैदानावर अनेक कडू - गोड अनुभव घेतले. अनेक ऐतिहासिक विजय मिळविले तर काही नामुष्कीजन्य पराभवही पत्करले. या दरम्यान अनेक विक्रम - पराक्रमही भारतीय खेळाडूंकडून घडले व मोडलेही ! भारताने मागील पाच वर्षात आयसीसीच्या कसोटी मानांकनाची अव्वल क्रमांकासाठीची गदा ( मेस ) जास्तीत जास्त काळ आपल्याकडेच राखली. शिवाय येत्या १८ ते २२ जून २०२१ पासून इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन येथे कसोटी विश्व अजिंक्यपदाचा सामना होणार असून त्या सामन्यात भारत व न्यूझिलंड हे संघ आमने सामने उभे ठाकणार असून या सामन्याद्वारे कसोटी क्रिकेटचा खरा बादशहा कोण हे ठरणार आहे.
भारताच्या कसोटी क्रिकेटच्या लांबलचक व यशस्वी प्रवासात अनेक रथी महारथी खेळाडूंनी रक्ताचे पाणी करून आपले योगदान भारतीय क्रिकेटसाठी दिले आहे. भारताच्या या ३०२ पैकी सर्वोत्तम अशा अकरा खेळाडूंचा सर्वकालीन श्रेष्ठ संघ निवडण्याचा मोह जागतिक क्रिकेटचे बायबल म्हणून ओळखले जाणाऱ्या इंग्लंडस्थित " विस्डेन " या क्रिकेट ग्रंथ बनविणाऱ्या समुहालाही आवरता आला नाही.
विस्डेनने निवडलेला सर्वकालीन भारतीय संघ असा : -
सलामीवीर - सुनिल गावस्कर, राहुल द्रविड.
मधली फळी - चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली ( कर्णधार )
यष्टीरक्षक - रिषभ पंत.
फिरकीपटू - रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा व अनिल कुंबळे.
वेगवान गोलंदाज : - कपिलदेव निखंज व जसप्रित बुमराहा.
भारतीय क्रिकेटचा ८९ वर्षांचा इतिहास बघितला तर या फार मोठया प्रवासात वेगवेगळे कालखंड होते. सुरुवातीच्या काळात सर्वच संघ नवशिखा होता. शिवाय त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी भारताचे बरेचसे सामने इंग्लंडविरूध्दच व्हायचे. त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी भारतीय खेळाडू इंग्रजांच्या दबावाखालीच खेळायचे.
स्वातंत्र्यानंतर भारत व पाकिस्तानचे संघ विभागले गेले. भारताचे काही खेळाडू पाकिस्तानात स्थायिक झाले. त्यामुळे संघाच्या संतुलनात फरक पडला. आजच्या इतके तंत्रज्ञान विकसीत नसल्याने त्या काळी खेळाडूंना विशेष सुरक्षा साधनेही नव्हते. इतकेच नाही तर त्यावेळच्या खेळाडूंना मानधनही फार कमी मिळत असे. आजचे खेळाडू लाखो - कोटीने पैसे कमावतात.
शिवाय जुन्या खेळाडूंना आजच्या सारखे सामनेही खेळायला मिळत नव्हते. त्या काळीही अनेक गुणवान खेळाडू होते. त्यांनीही आपले कौशल्य सिद्ध करुन दाखविले आहे. परंतु सर्वकालीन सर्वश्रेष्ठ अकरा जणांचा संघ निवडताना काही खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो. मात्र विस्डेनने निवडलेला संघ हा फारसा सखोल अभ्यास न करता आजच्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंकडे बघून निवडलेला दिसतो. त्यामुळे निवडीस पात्र अशा काही खेळाडूंवर सफसेल अन्याय झाला आहे.
विस्डेनच्या संघात निवडलेला सलामीवीर सुनिल गावस्करच्या निवडी विषयी कुणाचेही दुमत नाही. मात्र राहुल द्रविडला दुसरा सलामीवीर बनविणे योग्य वाटत नाही. कारण राहुल त्याच्या कारकिर्दीत ज्यादा तर तिसऱ्या क्रमाकांवर खेळला आहे. त्याच्या ऐवजी सर्व जगभर ख्याती मिळविलेला दुसरा सलामीवीर म्हणून विरेंद्र सेहवागची निवड करायला हवी होती. सेहगाव एक आक्रमक स्लामीचा फलंदाज म्हणून भारतासाठी अनेक सामन्यात मॅचविनर ठरला असल्याने सेहवाग हाच त्या कामासाठी योग्य आहे.
विस्डेनने तिसऱ्या क्रमांकासाठी चेतेश्वर पुजाराला पसंती दिली असली तरी त्या क्रमाकांसाठी दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड हे देखील दावेदार आहेत. मात्र राहुल द्रविड हाच या जागेवर चपखल बसतो. चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे सचिन तेंडुलकर व विराट कोहली हे योग्य आहेत. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला विस्डेनने निवडले हे जरा अतिच वाटतं. कारण मागच्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन मालिका सोडून त्याचा खेळ नजरेत भरणारा नाही. तो अजून तरूण असून त्याला अजून खूप सिद्ध करायचे असून त्या जागेसाठी महेंद्रसिंग धोनी हाच योग्य पर्याय आहे.
अष्टपैलू खेळाडू व वेगवान गोलंदाज म्हणून कपिलदेवच्या नावाला कोणतीही हरकत नाही. कपिलदेव सह वेगवान गोलंदाज म्हणून कसोटीत ३११ बळी घेणारा डावखुरा झहीरखान तसेच २३६ बळी व जिगरबाज गोलंदाजी करणारा जवागल श्रीनाथ यांची निवड विस्डेनने करायला हवी होती. विस्डेनने निवडलेला जसप्रित बुमराहा आतापर्यंत केवळ १९ कसोटी खेळला असून त्यालाही अजून मोठ्या सत्वपरीक्षा द्यायच्या आहेत.
विस्डेनने आपल्या संघात फिरकी व वेगवान गोलंदाज निवडताना मोठी गल्लत केल्याचे दिसते. वास्तविक संघात तीन वेगवान व दोन फिरकी गोलंदाज निवडायला हवे होते. परंतु त्यांनी याच्या उलट समिकरण जुळवले.
फिरकी गोलंदाज म्हणून अनिल कुंबळे व रविचंद्रन आश्विन यांची निवड योग्य असून फिरकीपटू रवींद्र जडेजा ऐवजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हा या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भारतीय संघात असायला हवा.
सर्वात महत्वाची म्हणजे कर्णधाराची निवड जरा वादग्रस्त वाटते. विस्डेनने विराट कोहलीला कर्णधार नेमलं. विराटने अजून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. शिवाय वरील संघातील मातब्बर खेळाडू बघता त्यांना हाताळणे कोहलीसाठी सोपे नसेल. त्यामुळे कर्णधारपदी शांत व संयमी स्वभावाचा व तीन वेळा आयसीसी करंडक पटकविणारा व सर्वांना घेऊन चालू शकणारा महेंद्रसिंग धोनी हाच योग्य ठरतो.
सर्वांना अभिप्रेत असलेला सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भारतीय संघ असा असायला हवा : -
सलामीवीर - सुनिल गावस्कर, विरेंद्र सेहवाग.
मधली फळी - राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली
यष्टीरक्षक - महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार )
फिरकीपटू - रविचंद्रन आश्विन व अनिल कुंबळे.
वेगवान गोलंदाज : - कपिलदेव निखंज, झहीर खान व जवागल श्रीनाथ.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

