हर्षवर्धन पाटील यांच्याकडे मराठा आरक्षण संदर्भात भाजपच्या वतीने सातारा जिल्ह्याची जबाबदारी
सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांची साधणार संवादय
इंदापूर प्रतिनिधी:
मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी भाजपाच्या वतीने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा नेता आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मोहीम सुरू झाली असून भाजप नेते व माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. हर्षवर्धन पाटील सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून मराठा आरक्षणावरील भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत तसेच मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा दौरे सुरु आहेत. भाजपचे खासदार नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र पाटील आदी नेते जिल्हा दौरे करणार आहेत. त्या त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाची सविस्तर भूमिका तसेच कोर्टात नेमकं काय घडलं , सरकार कुठे चुकले याविषयी ते मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
हर्षवर्धन पाटील हे अनुभवी आणि अभ्यासू नेते असून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी संसदीय कार्य मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. मंत्रिमंडळामध्ये वीस वर्ष मंत्री म्हणून त्यांनी अनेक खात्याचा कारभार पाहिला असून ते स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत. कार्यक्षम, अभ्यासू आणि सर्वांशी समरस असणारे नेते म्हणून तसेच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार जयकुमार गोरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर तसेच स्थानिक मराठा समाजाचे नेते व कार्यकर्त्यांची हर्षवर्धन पाटील मराठा आरक्षणा संदर्भात त्यांच्याशी सुसंवाद साधणार असून यातून मार्ग काढण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रयत्न करणार आहेत.

