shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय क्रिकेटला जगज्जेते बनविण्याचं स्वप्न बघणाऱ्या रवी शास्त्रीला वाढदिनानिमित्त अनंत कोटी शुभेच्छा...!


२७ मे १९६२ रोजी जन्म झालेल्या रवी शंकर शास्त्रीने आयुष्याचे ५९ वर्ष पूर्ण करून साठीत प्रवेश केला. रवी शास्त्री भारताचा निव्वळ सिनियर सिटीझन बनला असे नाही. तर भारताला क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रात विश्वविजेता बनविण्याचं त्याचं स्वप्न आहे. 
                    
सन १९८१ मध्ये न्यूझिलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील फिरकी गोलंदाज सुरू नायक जखमी झाल्यानंतर कर्णधार सुनिल गावस्करने भारतातून १९ वर्षीय रवी शास्त्रीला पाचारण केले. फिरकी गोलंदाज म्हणून कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या शास्त्रीने स्वतःच्या पहिल्या कसोटीत अकराव्या क्रमाकांवर फलंदाजी केली. परंतु त्यानंतर त्याने फलंदाजीत अशी काही सुधारणा केली की, तो भारताचा सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावारूपाला आला. इतकेच नव्हे तर आपल्या डावखुऱ्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना जेरबंदही केले. त्यामुळे त्याच्या नावापुढे लावलेले अष्टपैलू हे बिरूद खऱ्या अर्थाने शोभून दिसते.
                       
रवी शास्त्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ८० कसोटी खेळताना ११ शतके व १२ अर्धशतकांसहीत ३८३० धावा ठोकल्या व गोलंदाज म्हणून १५१ बळीही टिपले. तसेच १५० एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना ४ शतके व १८ अर्धशतकांसह ३१०८ धावाही बनविल्या. शिवाय गोलंदाजीत १२९ फलंदाजांना तंबूचा रस्ताही दाखविला.

                      
सन १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो संघात नसला तरी त्या स्पर्धेत त्याने काही सामने खेळले होते. त्यामुळे विश्वविजेता म्हणून टॅग त्याला मिळाला होता. त्यानंतर सन १९८४-८५ च्या रणजी सत्रात वानखेडेवर बडोद्याच्या तिलकराजला सलग सहा षटकार ठोकताना ११२ चेंडूत द्विशतक ठोकण्याचा प्रथम श्रेणीतील विश्वविक्रमही स्वतःच्या नावे केला होता.
                      

सन १९८५ च्या ऑस्ट्रेलियात झालेल्या " मिनी विश्वकप " बेन्सन अँड हेजेस या स्पर्धेत भारताच्या विजेतेपदात हिरो ठरलेल्या रवीने महागडी " ऑडी " कार पटकविली होती. रवीचे नेतृत्व गुणही वाखाणण्यासारखे होते. कपिलदेव कर्णधार असताना तो बराच काळ संघाचा उपकर्णधार होता. काही वनडे सामन्यात त्याने भारताचे नेतृत्त्व केले होते. परंतु सर्वात जास्त लक्षात राहील असे एकमेव कसोटीतील त्याने नेतृत्व उठावदार होते. जानेवारी १९८८ मध्ये मद्रास येथे विंडीज विरूध्द त्या सामन्या भारताने बलाढय विंडीजला लिलया लोळवले होते. शास्त्रीने त्या सामन्यात नरेंद्र हिरवाणीला पदार्पणाची संधी दिली. हिरवाणीने त्या संधीचे सोने करताना दोन्ही डावात ८ + ८= १६ बळी घेत रवी शास्त्रीचा निर्णय योग्य ठरविला. जबरदस्त नेतृत्वगुण असूनही पूर्ण वेळ कर्णधार पद न मिळणं ही एक खंत शास्त्रीला कायम सतावत असेल.
                          
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर तो टिव्ही समालोचक म्हणून ख्यातनाम झाला. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, धारदार शब्दफेक, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्याच्या खास शैलीमुळे त्याने केलेले सामन्यातील प्रसंग जीवंत होतात. सन २००७ च्या पहिल्या टि २o विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूवर ६ सलग षटकार ठोकले. त्यावेळी शास्त्रीच समालोचक होता. एवढेच नाही तर त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मिळविलेल्या विजयी क्षणाच्या वेळीही शास्त्रीने केलेले वर्णन अद्वितीय होते. सचिन तेंडुलकरने वनडे इतिहासातील पहिले द्विशतक ठोकले त्या प्रसंगाचे भावभरीत वर्णनही त्यानेच केले होते. शिवाय २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने नुवान कुलशेखराला षटकार मारून मिळविलेला विश्वकरंडक शास्त्रीच्या ओघावत्या वर्णनाने आणखीच अवर्णनीय बनला होता. 
                         
सन २०१४ ते १६ या काळात  भारतीय क्रिकेट संघासोबत क्रिकेट डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या रवी शास्त्रीने सन २०१७ मध्ये चॅपीयन्स करंडका नंतर प्रशिक्षक म्हणून सुत्रे हाती घेतले. काही अपयशाचे डोस पचवून संघाला विजयी पथावर आणत सध्या संघाला कसोटी विश्वविजेते  पदाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. ऑस्ट्रेलियात  सलग दोन मालिका जिंकणारा तो जगातील एकमेव प्रशिक्षक आहे. 
                        
एक खेळाडू, समालोचक, स्तंभलेखक व प्रशिक्षक म्हणून खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रवी शास्त्रीला चंदेरी वाढदिनाच्या सोनेरी शुभेच्छा ..!!
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close