" वैशाख पौर्णिमा " अर्थात् " बुद्ध पौर्णिमा
हिमालयाच्या उतरणीवर वसलेल्या, प्राचीन अशा ' कपिलवस्तू ' नगरात राज्य करीत असलेल्या, तितकाच प्राचीन अशा ' शाक्य ' राजवंशातील राजा ' शुद्धोदन ' व राणी ' महामाया ' यांच्या पोटी ,आजपासून बरोबर २५८१ वर्षांपूर्वी " वैशाख पौर्णिमे " च्या दिवशी ' म्हणजेच इ. स.पूर्व ५६३ व्या वर्षी, 'लुंबिनी ' वनात, एका शालवृक्षाखाली, आकाशात चंद्रोदय होत असतांना, रात्रीच्या पहिल्या प्रहरी राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या पाचव्या दिवशी बाळंतरोगाने महामाया मृत्यूमुखी पडली , आणि लहानग्या सिद्धार्थाचा सांभाळ तळहातावरच्या फोडाप्रमाणे, त्याची मावशी महाप्रजापति गौतमी हिने केला, म्हणून त्याचे नांव ' गौतम ' असे रुढ झाले.
मानवी जीवन हे संघर्ष व दु:खयुक्त असून , पृथ्वीतलावरील एकही मानव या दु:खापासून मुक्त नाही, या सत्याची , आतापर्यंतच्या मानव जातीच्या इतिहासात कोणालाही न झालेली , अशी जाणीव त्याला झाली, आणि त्याने दु: खाची कारणमिमांसा केली. तेव्हा त्याला असे जाणवले, की मानवी जीवन दु:खी करण्यास अनेक तृष्णा कारणीभूत ठरत आहेत. तेव्हा या तृष्णा नष्ट करण्यासाठी त्याने आतापर्यंतचे आपले ऐशोआरामी जीवन सोडून गृहत्याग करण्याचा धाडशी निर्णय घेतला. त्यावेळी त्याचे वय अवघे एकोणतीस वर्षांचे होते. व तो ' यशोधरा ' नामक , सतावीस वर्षीय सुंदर राजकन्येचा पति , तर ' राहुल ' नामक नवजात बालकाचा पिता होता.
गृहत्याग केल्यानंतर. एक-दोन.नव्हे, तर तब्बल सात वर्षे,सात महिने, व सात दिवस त्याने मानवी जीवनात दु:ख उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरलेली तृष्णा नाहीशी करणाऱ्या कारणांचा शोध घेण्यात वाया घालवली. या नादात एकेकाळी धष्टपुष्ट असणारे त्याचे बलदंड शरीर , या प्रयत्नात शरीराला नाना तऱ्हेच्या यातना दिल्याने, व उपासमारीने खंगल्याने ,आता मात्र अस्थिपंजर झाले होते. श्रेणिकपुत्री ' सुजाता ' हिने त्याच्या अस्थिपंजर झालेल्या देहालाच ' पृथ्वीवर अवतरलेली वनदेवता ' समजून, वनदेवतेच्या नवसपूर्तीसाठी आणलेली ' खीर ' जवळच्या एका मृत्तिकापात्रात त्यालाच दान केली.
अनेक दिवसांच्या उपासमारीनंतर प्रथमच अन्नलाभ झाल्याने, त्याने ते खीरपात्र घेऊन नेरंजना नदीचा तीर गाठला, व तेथे त्याने ती खीर खालली.त्यामुळे त्याला जरा ताजेतवाने वाटू लागले व तो पुन्हा तृष्णा नाहीसे करणाऱ्या उपायांवर एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसून चिंतन , मनन करु लागला. अखेर तब्बल चाळीस दिवसांनतर त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसला असता, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी त्याला सर्व तृष्णांना नाहीसे करणारा, दु:खमुक्तिचा मार्ग सापडला , आणि अनेक अडथळे पार केल्यानंतर त्यास ' संबोधि ' प्राप्त होऊन तो जगद् वंदनीय असा " बुद्ध " ठरला. हाही दिवस " वैशाख पौर्णिमे " चाच होता. वयाची पस्तीस वर्षे त्याने पुर्ण केली होती. म्हणजेच आजपासून बरोबर २५४६ वर्षांपूर्वी, इ. स.पूर्व ५२८ व्या वर्षी सिद्धार्थाला ' बुद्धत्व ' प्राप्त झाले. त्यानंतर आपणास प्राप्त झालेला दु:खमुक्तिचा मार्ग लोकांना माहिती करून देण्यात, त्यांना उपदेश करण्यात आपल्या आयुष्यातील पुढची पंचेचाळीस वर्षे त्या तथागत सम्यक संबुद्धाने अविरत अशी घालवली यातच वयाच्या ऐंशीव्या वर्षी पोटदुखीच्या व्याधीने ' कुशिनारा ' नगरीत दोन शालवृक्षांच्या मध्ये, रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. ती घटना देखील " वैशाख पौर्णिमे " च्याच दिवशी, आजपासून बरोबर २००१ वर्षांपूर्वी,म्हणजेच इ. स. पूर्व ४८३ व्या वर्षी घडली. तथागतांच्या आयुष्यातील " जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण " या अति महत्वाच्या घटना या " वैशाख पौर्णिमे "च्याच दिवशी ' शालवृक्ष ' अर्थात ' पिंपळवृक्षाच्याच सानिध्यात घडल्याने घडल्याने प्रत्येक बुद्धानुयायाच्या दृष्टीने ' पिंपळवृक्ष ' अर्थात, ' बोधिवृक्ष ' आणि " वैशाख पौर्णिमा " या दोनही गोष्टींना संपूर्ण जगामध्ये.खूपच महत्त्व आहे....
" राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांच्या २५८१ व्या जयंती दिनानिमित्त, त्यांस बुद्धत्व प्राप्ती च्या २५४६ व्या दिनानिमित्त व तथागत बुद्धांच्या २५०१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण जगतील सर्व बौद्ध बांधवांना " वैशाख पौर्णिमा " अर्थात् " बुद्ध पौर्णिमे " च्या खूप खूप हार्दीक मंगल कामना.....!!!
" सब्बे सत्ता सुखि होन्तु......भवतु सब्ब मंगलं....!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

