shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शार्दूल ठाकूरला अष्टपैलूत्व सिद्ध करण्यास संधी मिळेल का ?


                        शार्दूल नरेंद्र ठाकूर याचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्राच्या कोकण विभागाच्या पालघर येथे झाला. क्रिकेटचा कोणताही वारसा नसलेल्या कुटुंबात जन्मलेल्या शार्दूलने जबरदस्त इच्छाशक्ती व कठोर मेहनत करत भारतीय संघात प्रवेश केला. एक वेगवान गोलंदाज म्हणून संघात आलेला शार्दूल आपल्या नजाकतदार व धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघात रिकामी असलेली अष्टपैलू खेळाडूची गरज भागविण्याच्या अगदी उंबरठ्यावर आला आहे.            

                       भारताला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या दमदार फलंदाजाची गरज आहे आणि ती पूर्ण करण्याची क्षमता शार्दूल बाळगून असून त्याला योग्य ती संधी मिळाल्यास कपिलदेव इतकी नाही तर हार्दिक पांडयासारखी अष्टपैलू कामगिरी तो करू शकतो. हार्दिक पांडया पाठीच्या दुखापतीमुळे नियमितपणे गोलंदाजी करण्यास असमर्थ ठरत असताना शार्दूलला बॉल बरोबरच चेंडूनेही कर्तबगारी दाखवून संघात स्थान पक्के करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
                           सन २०१९ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती, परंतु त्यावेळी नियती त्याच्यावर रुसली असावी. त्या सामन्यात अवघे एक षटक व ४ चेंडू टाकून झाल्यावर त्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने घेरलं. अवघ्या १० चेंडूच्या खेळानंतर त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तब्बल दोन वर्ष त्याला कठोर मेहनत व जवळ जवळ दोन वर्षांची मोठी प्रतिक्षा करावी लागली. म्हणतात ना, " सब्र का फल मिठा होता है " हे शब्द शार्दूलसाठी तंतोतंत खरे ठरले.
                            सन २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. संघात जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, नवदिप सैनी हे गोलंदाज असल्याने त्याच्या संघातील समावेशाचा प्रश्नच येत नव्हता. परंतु संघाला दुखापतीने चांगलंच घेरलं. एक एक करून संघातील प्रमुख गोलंदाज संघाबाहेर गेल्याने ब्रिस्बेनच्या वुलन गाबा मैदानावरील चौथ्या कसोटीत संघाचा कोरम पूर्ण करण्यासाठी तंदुरूस्त खेळाडू मिळणं मुश्किल झालं होतं. अशा वेळी शार्दूलला संधी चालून आली. मग शार्दूलनेही त्या संधीचे दोन्ही हातानी जोरदार स्वागत करत आपल्या अद्वितीय गुणवत्तेच्या बळावर भारताला अवर्णनीय विजय मिळवून देताना चमकदार अष्टपैलू कामगिरी केली.
                            सन १९८८ पासून यजमान ऑस्ट्रेलियाला जगातला कोणताच संघ गाबावर पराभूत करू शकला नव्हता. अशात भारताचा संघ कमजोर वाटत होता. अगदी तसेच झाले. भारताचे पहिल्या डावात प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताचा डाव संकटात सापडला होता. त्यावेळी पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदरला साथीला घेत आपला पहिलाच कसोटी डाव खेळताना शार्दूलने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सैरभैर करताना १२३ धावांची भागिदारी करत स्वतःही ६७ धावांची झुंझार खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. शिवाय गोलंदाजीतही पहिल्या डावात ३ व दुसऱ्या डावात चार असे एकूण सात बळी घेऊन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर भारताला मालिका विजय मिळवून देण्यात शुभमन गिल,रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, वॉशिंग्टन सुंदर यांच्या पेक्षाही उजवा खेळ केला. शार्दूलने पहिल्या डावात ती खेळी केली नसती तर भारताला तो ऐतिहासिक विजयही मिळाला नसता. 
                            भारतीय खेळाडूंच्या नेत्रदिपक कामगिरीवर प्रभावित होऊन आनंद महिंद्रा या मोटार उत्पादकाने संघातील सहा खेळाडूंना " महिंद्रा थर " ही गाडी भेट दिली. त्या खेळाडूंमध्ये शार्दूलचाही समावेश आहे.
                             त्यानंतर भारतात इंग्लंडविरूध्द झालेल्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. परंतु त्यानंतर पाच टि-२० व तीन वनडे सामन्यात त्याने अतिशय प्रभावशाली गोलंदाजी करत भारताला अव्वल क्रमांकाच्या इंग्लंडविरूद्ध मालिका विजय मिळवून दिले.
                               या दोनही मालिकेत त्याने बॅटनेही चमकदार कामगिरी केली. पुण्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शार्दुल ठाकूरनंबेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर फ्रंट फूटवर येऊन एक खणखणीत षटकार ठोकला. शार्दुलनं लगावलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक् झाला आणि नॉन स्ट्राइकवर शार्दुल येताच मिश्किलपणे त्याची बॅट स्टोक्स तपासून पाहू लागला. शार्दुलनंही स्मित हास्य करत स्टोक्सच्या हातात त्याची बॅट देऊ केली.
                             शार्दूलमध्ये असलेली अष्टपैलू खेळाडू बनण्याची उर्मी लक्षात घेवून संघ प्रबंधन त्याला पाठींबा देत असल्याचे चित्र सध्या दिसत असून इंग्लंडमधील सहा पैकी जास्तीत जास्त सामन्यात त्याला आपला जोर दाखविण्याची संधी मिळेल असा सध्या तरी अंदाज वाटतो.
                             शार्दूल आतापर्यंत दोन कसोटी असून त्यामध्ये ७३ धावा बनविताना १ अर्धशतक लगावले आहे. शिवाय गोलंदाजीत ७ बळी व २ झेल अशी भविष्यासाठी आशादायक कामगिरी केली आहे. १५ वनडेत १०७ धावा, २२ बळी व ४ झेल तर २२ टि २० सामन्यात ७५ धावा, ३१ बळी व ४ झेल अशी शानदार कामगिरी केली आहे.
                                     शार्दूलने अशीच भरीव कामगिरी करत मिळालेल्या संधीचे सोने केले तर भारताला चांगले विजय तर मिळतीलच शिवाय अष्टपैलू खेळाडूची असलेली गरजही भागेल. त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने शार्दूलला शुभेच्छा देऊ या !
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close